scorecardresearch

‘अर्था’मागील अर्थभान: कामे करण्याची आदर्श पद्धती (स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर – एसओपी)

कंपन्यांमध्ये कामकाजास सुलभरीत्या व्हावे यासाठी कित्येक प्रकारच्या आदर्श पद्धती बनवलेल्या असतात.

( प्रतिनिधिक छायाचित्र )

डॉ. आशीष थत्ते
कंपन्यांमध्ये कामकाजास सुलभरीत्या व्हावे यासाठी कित्येक प्रकारच्या आदर्श पद्धती बनवलेल्या असतात. म्हणजे मोठय़ा कंपन्यांचे कामकाज त्याशिवाय चालूच शकत नाहीत. जसे की, आयात किंवा निर्यात करण्याच्या आदर्श पद्धती किंवा कोठारामध्ये वस्तू ठेवण्याच्या आदर्श पद्धती. म्हणजे व्यवस्थापनमध्ये आपण आधी बघितल्याप्रमाणे या गोष्टी लिहून ठेवाव्या लागतात, नुसत्या एकमेकांना सांगून होत नाहीत. मनुष्यबळ किंवा वित्त विभागामध्ये आदर्श पद्धती लिहून ठेवल्या असतात. मुलाखतीला आलेल्या उमेदवाराची आधी मुलाखत कोण घेणार आणि नंतर कोण घेणार? नंतर घेणारा मनुष्य आज आला आहे, पण आधी घेणारा मनुष्य गैरहजर आहे, तर घेऊन टाका मुलाखत असे होत नाही. कच्चा माल खरेदी करणाऱ्या विभागाचीदेखील एक आदर्श पद्धती असते त्यानुसारच खरेदी केली जाते. संशोधन व विकास विभागामध्ये तर याला अनन्यसाधारण महत्त्व असते.

कंपन्यांमध्ये आदर्श पद्धती फक्त लिहून ठेवल्या जात नाहीत तर विशिष्ट अधिकाऱ्याने त्यावर शिक्कामोर्तबदेखील करावा लागतो. कंपन्या आदर्श पद्धती बदलायला तत्परदेखील असतात. पण पूर्ण विचार करूनच ते केले जाते. कुठल्याही बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करायला गेलात की त्याठिकाणी प्रथम आदर्श पद्धती वाचायला देतात किंवा आधीचा नोकरीचा कालावधी पूर्ण करणारा किंवा ती जागा सोडून जाणारा कर्मचारी तुम्हाला सांगतो व शिकवतो. दैनंदिन जीवनात आपण आदर्श पद्धती अमलात आणण्याचा प्रयत्न करतो. नुकत्याच दूरचित्रवाणीवर प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमामध्ये डोसा बनवताना पहिले कुठली कृती कराल व शेवटी कुठली असा प्रश्न होता त्यावरून या विषयाची प्रेरणा मिळाली. नुसते पदार्थ असून चालत नाहीत तर योग्यवेळेला योग्य कृती करावी लागते तेव्हा पदार्थ रुचकर होतो. सातच्या आत घरात येऊन अथर्वशीर्ष/ शुभंकरोती म्हणायचे किंवा अंघोळ झाल्यावर देवाचे स्मरण करायचे ही आदर्श पद्धती पूर्वी होती. अगदी व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर स्मशानात घेऊन जाताना अंतिम क्रिया करायला लागतात. त्या सगळय़ा आदर्श पद्धती असतात. त्या कुठे तरी लिहून ठेवल्या असतील पण वाचतो कोण? आधीची पिढी जे शिकविते त्याच पद्धती आपण अनुसरतो. अगदी कंपन्यांमध्ये आधीच सोडून जाणारा माणूस जे सांगतो ते केले जाते. मात्र त्या पद्धतीची माहिती घेण्याची तसदी फारशी कुणी घेत नाही आणि मग काहीतरी भलतेच होत राहते.

अंघोळ झाल्यावर ओला पंचा धुवायला टाकणे ही झाली आदर्श पद्धती. मात्र तो जागेवर ठेवत नसल्याने दुसऱ्या दिवशी मिळत नाही. मुलांनी शाळेतून आल्यावर त्यांची दप्तरे कपाटात किंवा नेमलेल्या जागेत वर ठेवावीत ही झाली आदर्श पद्धत. मात्र मुलांकडून ती हमखास खुर्चीवर ठेवली जातात. मंगल कार्यात आधी ताक वाढले आणि नंतर भात किंवा मुख्य जेवण वाढले तर? आपली तशी सवय नाही कारण आपल्याला आदर्श पद्धतीने जेवणाची सवय असते. घराबाहेर पडताना ‘पेरूचा पापा’ (पेन, रुमाल, चावी, पास, पाकीट) सोबत घेणे म्हणजे घरातील अलिखित पण एकमेव उद्घोषित आदर्श पद्धतीच.
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट
अकाउंटंट म्हणून कार्यरत
ashishpthatte@gmail. com

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त ( Arthvrutant ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Economic standard operating procedure sop management companies import export amy

ताज्या बातम्या