समीर नेसरीकर

महिना आणि ऋतूच्या समीकरणातून सण-व्रते आपण परंपरेने साजरी करतो. त्याचप्रमाणे करबचतीचा ऋतू म्हणजेच पौष, माघ, फाल्गुन हे महिने. करबचतीचे सर्वात फायदेशीर साधन ‘इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्स स्कीम (ईएलएसएस)’मधील गुंतवणुकीच्या सध्याच्या ऋतूविषयी सारांशात..

The story of Dordarshan’s iconic logo
दूरदर्शनच्या लोगोने कसे बदलले रंग? टॅगलाईन अन् चिन्हात काय बदल झालेत?
This fan’s reaction after seeing Shubman Gill at hotel is viral Relatable much
“दिल मे बजी घंटी…टंग टंग टंग!” शुभमन गिलला समोर पाहताच चाहतीच्या काळजाचा चुकला ठोका! Viral Video एकदा बघाच
cryptocurrency fraud marathi news
क्रिप्टो करंन्सीच्या नावावर युवकाने गमावले २३ लाख रुपये
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर

‘ऋ’ किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हर घटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा.. दुर्गा भागवतांचे ‘ऋतुचक्र’ काल वाचत होतो, त्यातल्या या सुरुवातीच्या ओळी. मराठी वाङ्मयातील ही उत्कृष्ट कलाकृती. थोडी पाने वाचली तेवढय़ातच दारावरील बेल वाजली.

बघतो तर आमच्या सोसायटीतील सुबोध दारात. त्याला याच वर्षी नवीन नोकरी लागलेली मला माहिती होतं. चहा, पोहे झाल्यावर बोलताना ‘ईएलएसएस’चा विषय निघाला. सुबोध काम करत असलेल्या कंपनीतल्या ‘मानव संसाधन विभागा’ने (बोलीभाषेत एचआर डिपार्टमेंटने) फर्मान काढलेले की, तुम्ही जर ३०,००० रुपये ८० सी मधील पर्यायांमध्ये गुंतवलेत तर तुम्हाला कर द्यावा लागणार नाही अन्यथा आम्हाला तुमचा कर पुढील महिन्यातील पगारातून वजा करावा लागेल. ‘ऋतुचक्र’ बाजूला ठेवलं आणि नंतर ‘ईएलएसएस’ म्हणजेच ‘इक्विटी लिंक्ड सेिव्हग्स स्कीम’च्या विषयी सुबोधला ज्या बाबी सांगितल्या त्याच या लेखातून मांडतोय. 

सुबोध : ईएलएसएस फंड म्हणजे काय?

मी : हे असे फंड आहेत की, जे मुख्यत्वे समभाग किंवा समभागसंलग्न गुंतवणूक करतात. त्याद्वारे आपण प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०सी’प्रमाणे १,५०,००० रुपयांपर्यंत कर-बचत करू शकता आणि ही प्रामुख्याने समभागसंलग्न गुंतवणूक असल्यामुळे दीर्घकालीन संपत्तीनिर्मितीसाठी साहाय्यभूत ठरू शकते. मागील काही वर्षांत त्यांच्या कामगिरीमुळे ईएलएसएस फंड खूप लोकप्रिय झाले आहेत.

सुबोध : या फंडाची वैशिष्टय़े काय आहेत?

मी : सांगतो.

– यात प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८०सी’प्रमाणे १,५०,००० रुपयांपर्यंत कर-बचत शक्य होते.

– योजनेतून एकूण मालमत्तेच्या कमीत कमी ८० टक्के भाग हा समभाग किंवा समभागसंलग्न गुंतवणुकीसाठी असतो.

–  फंडांना वेगवेगळय़ा भांडवल श्रेणीत (मार्केट कॅपिटलायझेशन) गुंतवणुकीची मुभा आहे.

– योजनेचा लॉक-इन कालावधी (ज्या काळात आपण पैसे काढून घेऊ शकत नाही) तीन वर्षांचा असतो, हा लॉक-इन कालावधी इतर सर्व कर-बचत करून देणाऱ्या साधनांपैकी सर्वात कमी आहे.

– दीर्घकालीन भांडवली नफ्यावर कर निर्धारण होते.

सुबोध : साधारण कामगिरी कशी आहे फंडांची?

मी : उदाहरणादाखल सांगतो, ३१ जानेवारी २०२२ रोजी मिरॅ अ‍ॅसेट टॅक्स सेव्हर, कॅनरा रोबेको इक्विटी टॅक्स सेव्हर, आयडीएफसी टॅक्स अ‍ॅडव्हान्टेज, अ‍ॅक्सिस लाँग टर्म इक्विटी, डीएसपी टॅक्स सेव्हर यांनी पाच वर्षांत अनुक्रमे २०.४५ टक्के, १९.४४ टक्के, १८.७८ टक्के, १७.०३ टक्के आणि १६.४२ टक्के असे परताव्याचे वार्षिक वृद्धीदर दाखवले आहेत.

सुबोध : अरे वा, छान सांगितलंस. अंदाज आलाय. चल निघतो मी, उद्या करतो इन्व्हेस्ट.

मी : अरे थांब, काही महत्त्वाचे मुद्दे समजून घे. कारण ते खूपच महत्त्वाचे आहेत.

१. ईएलएसएस फंडातील गुंतवणुकीमुळे जरी कर बचत होत असली तरी ते सर्वसाधारण समभागसलंग्न फंडांसारखेच आहेत आणि म्हणून दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून त्याकडे बघावं. त्यांचा तीन वर्षांचा लॉक-इन कालावधी संपल्यावर गुंतवणूक न काढता त्यांच्या भविष्यकालीन कामगिरीच्या आधारे मूल्यमापन करावं.

२. यालाच जोडून असे सांगेन की, प्रत्येक ईएलएसएस फंड वेगवेगळय़ा पद्धतीने चालविला जातो. काही फंडांची गुंतवणूक लार्ज-कॅप समभागात जास्त असते तर काही फंड मिड-स्मॉल कॅप समभागांना प्राधान्य देणारे असतात.

३. गुंतवणूक करताना ‘ग्रोथ’ हा पर्याय निवडल्यास ‘चक्रवाढीचा फायदा’ आपल्याला मिळू शकतो.

४. मागील इतिहास पाहता असे दिसते की, साधारण जानेवारी महिन्यानंतर ईएलएसएस फंडामधील गुंतवणूक वाढते जेव्हा कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना कराचे आकडे सांगतात, तो वाचविण्यासाठी ईएलएसएस फंडात गुंतवणूक केली जाते. वरती ‘ऋतुचक्र’चा विषय निघालाच आहे तेव्हा असे म्हणेन ‘पौष, माघ, फाल्गुन’ हे ईएलएसएस फंडाचे ऋतू असतात असं मानायला हरकत नाही. परंतु आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की, शेवटी आपण जेव्हा समभागसंलग्न गुंतवणूक करतो तेव्हा सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (एसआयपी) पद्धतीने केलेली गुंतवणूक योग्य पद्धत ठरू शकते. कारण तुम्ही बाजाराच्या वेगवेगळय़ा स्तरावर गुंतवणूक करता. यासाठी आर्थिक वर्षांच्या सुरुवातीलाच म्हणजे एप्रिलपासून दरमहा गुंतवणुकीचे धोरण अवलंबवावे.

अशा सर्व सविस्तर गप्पांनंतर सुबोधसाहेब निघाले. मी पुन्हा ‘ऋतुचक्र’ वाचायला घेतले.

‘‘माघाचा महिना लागला. सकाळची उन्हे वाढीस लागली आहेत. पण झाडांच्या सावल्या पाने गळतीस लागल्यामुळे पूर्वीसारख्या भरदार राहिलेल्या नाहीत. हवा कुंद व धुंद आहे. धुक्याचा रंग सर्वत्र भरून राहिला आहे.’’

मी पुस्तकात तल्लीन होण्याआधी मनात विचार आलाय की, बाजारात पण असेच ऋतुचक्र चालूच आहे की. पानगळ होतच असते पण कालांतराने नवीन गडद हिरवी पाने येतातच. गुंतवणूक करण्याआधी ‘या’ ऋतूंच भान असलं म्हणजे झालं.

संपत्ती निर्मितीचा उन्नत मार्ग: म्युच्युअल फंड

चलनवाढीच्या दरापेक्षा जास्त परतावा मिळण्याची शक्यता असलेली गुंतवणूक म्हणून सध्या ‘इक्विटी’ या अ‍ॅसेट क्लासकडे बघितले जाते. बॅंक किंवा पोस्टातील मुदत ठेवींचे सध्याचे व्याजदर पाहता, त्यापेक्षा अधिक परतावा मिळण्याची शक्यता या अ‍ॅसेट क्लासमध्ये दिसून येते. अर्थात, भांडवली बाजाराशी निगडित जोखीम यात असते. शिवाय निश्चित परताव्याची हमी यात नसते. परंतु, या अ‍ॅसेट क्लासमध्ये तज्ज्ञ सल्लागाराच्या मदतीने दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून संयम ठेवल्यास चांगल्या परताव्याची अपेक्षा ठेवता येऊ शकते. गेल्या सुमारे ३५ वर्षांंचा परताव्याचा आढावा घेतला, तर ‘इक्विटी’ या अ‍ॅसेट क्लासने अन्य पर्यायांच्या तुलनेत वरचढ परतावा दिल्याचे दिसून येते. ‘इक्विटी’मध्ये थेट शेअर्स किंवा म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करता येते. थेट शेअर बाजारात गुंतवणूक करणे बरेचदा जोखमीचे असते. ज्यांना अशी थेट जोखीम घ्यायची इच्छा नसते, त्यांना म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला जातो. म्युच्युअल फंडात एकरकमी किंवा टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याचा पर्याय असतो. मात्र, जोखीम विभागली जावी, यासाठी ‘सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन’च्या (एसआयपी) मार्गाने टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे हिताचे ठरते. अशी दरमहा शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास चांगल्या परताव्यासह दीर्घकाळात मोठी संपत्ती जमू शकते. घर, मोटार, मुला—मुलींचे उच्च शिक्षण, लग्नकार्य, परदेशी पर्यटन यांसारख्या आपल्या आर्थिक उद्दिष्टांबरोबरच सेवानिवृत्तीनंतरची तरतूद म्हणूनही याकडे पाहता येते.

(लेखक मुंबईस्थित गुंतवणूकविषयक अभ्यासक)  sameernesarikar@gmail.com