|| कौस्तुभ जोशी

गेल्या काही वर्षांत भारताच्या वृद्धीच्या आणि विकासाच्या दृष्टीने कळीच्या ठरलेल्या गोष्टींत एफडीआय – प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक अग्रस्थानी आहे. नवीन आर्थिक धोरण स्वीकारल्यानंतर भारताने परदेशातून होणाऱ्या गुंतवणुकीचे नियम शिथिल केले. परिणामी अमेरिका, युरोपीय राष्ट्रांतून भारतात होणाऱ्या गुंतवणुकीचा ओघ वाढला. काही वेळा भारतीय शेअर बाजारात होणाऱ्या गुंतवणुकीची अणि एफडीआय यात गल्लत केली जाते. मात्र या संकल्पना वेगळ्या आहेत.

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक म्हणजे एखाद्या परदेशी कंपनीने भारतात व्यवसायासाठी केलेली थेट भांडवली गुंतवणूक असते. म्हणजे भारतातील दूरसंचार क्षेत्रात व्होडाफोन ही विदेशी कंपनी प्रवेश करते तेव्हा तो प्रत्यक्ष गुंतवणुकीचा व्यवहार होतो. काही वेळा परदेशी कंपन्या भारतातील कंपनीत थेट समभाग खरेदी करतात आणि मालकी हक्क मिळवतात, जसे भारतातील फ्लिपकार्टमध्ये वॉलमार्ट या बलाढय़ कंपनीने गुंतवणूक केली आहे. त्याचप्रमाणे विमा व्यवसायात भारतीय कंपन्यांच्या बरोबरीने विदेशी कंपन्या व्यवसाय करत आहेत. प्रुडेन्शियल समूहाची आयसीआयसीआयमध्ये गुंतवणूक आहे. आयकिया ही अत्याधुनिक गृहोपयोगी वस्तू बनवणारी कंपनी याच मार्गाने भारतात आली आहे.

भारतात गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या क्षेत्रात किती प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीला परवानगी आहे याचे नियम ठरलेले असतात. काही क्षेत्रांत थेट गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही विशेष सरकारी परवान्याची गरज नसते. काही क्षेत्रांत गुंतवणूक करण्यासाठी सरकारी परवाना आवश्यक असतो. निवडक क्षेत्रात १०० टक्के थेट विदेशी गुंतवणूक करता येते. संरक्षण तसेच देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्रात थेट गुंतवणूक करता येत नाही. गेल्या वर्षी सरकारने या नियमात बदल केले आणि ते अधिकाधिक सुलभ होतील असे उपाय योजले. ई कॉमर्स व्यवसायात १०० टक्के नागरी हवाई वाहतूक क्षेत्रात ४९ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करता येते. लॉटरी, अमली पदार्थ, तंबाखू, अणुऊर्जा, रेल्वे अशा क्षेत्रांत थेट गुंतवणूक निषिद्ध आहे.

भारतात वित्त क्षेत्र, सेवा क्षेत्र, वाहन, दूरसंचार, संगणक आणि सुटे भाग या क्षेत्रांत भरीव गुंतवणूक होते. भारतात मॉरिशस, सिंगापूर, जपान, अमेरिका, आखाती देश, युरोपियन महासंघातून थेट गुंतवणूक सर्वाधिक प्रमाणात होते. विदेशी गुंतवणुकीचे फायदे पाहू या आगामी लेखात.

joshikd28@gmail.com

(लेखक वित्तीय नियोजनकार, अर्थशास्त्राचे प्राध्यापक)