सुधीर जोशी

मार्च महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या सकारात्मक बातम्यांचे पडसाद बाजारात गेल्या सप्ताहाच्या सुरुवातीला पाहायला मिळाले. जीएसटीची सतत पाचव्या महिन्यांतील एक लाख कोटी रुपयांहून जास्त वसुली, विकास दरातील सकारात्मक वाढ, आघाडीच्या वाहन कंपन्यांचे विक्रीतील दोन अंकी वाढ अशा पार्श्वभूमीवर बाजारात पहिले तीन दिवस तेजी उसळली. परंतु अखेरच्या दोन दिवसांत अमेरिकेतील रोखे बाजारातील व परिणामी शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम होऊन बाजाराने थोडी कमाई गमावली. तरीही बाजाराचे प्रमुख निर्देशांक साप्ताहिक तुलनेत अडीच टक्क्य़ांनी वर गेले.

रेलटेलपाठोपाठ इरकॉनमधील र्निगुतवणूक गेल्या सप्ताहात पार पडली. रेल्वेशी निगडित समभागांमध्ये सध्या मोठी तेजी पाहायला मिळत आहे. यापूर्वी सुचविलेल्या आयआरसीटीसी या कंपनीचे समभागही गेल्या सप्ताहात तेजीमध्ये राहिले. रेल्वेची खानपान सेवा, ऑनलाइन तिकीट आरक्षण, रेल नीर अशी व्यावसायिक विविधता असणाऱ्या कंपनीचे समभाग वायदा बाजारामध्ये समाविष्ट झाले आहेत. तेजस एक्स्प्रेसचा अनुभव पाठीशी असताना खासगी रेल्वेच्या व्यवसायातही सहभागी होण्याचे कंपनीचे मनसुबे आहेत. सध्या भाडेतत्त्वावर असणाऱ्या हॉटेलच्या जोडीला चार-पाच मध्यम बजेट हॉटेलही कंपनी बांधणार आहे. रेल्वेबरोबर बस तिकिटेही कंपनी आपल्या अ‍ॅपवर विकणार आहे. प्रत्येक घसरणीचा फायदा घेऊन यामध्ये गुंतवणूक वाढवली तर एक-दोन वर्षांत मोठा नफा मिळू शकतो.

सिमेंट उत्पादकांनी किमती वाढविल्यामुळे या क्षेत्रातील समभाग बाजारात चर्चेत होते. इंधनाच्या वाढत्या किमती जरी या कंपन्यांना त्रासदायक असल्या तरी करोनाकाळानंतर बांधकाम क्षेत्रात वाढलेली मागणी व पायाभूत सुविधांवरील वाढता सरकारी खर्च या कंपन्यांना मागणी कमी पडून देणार नाही. भविष्यावर नजर ठेवून गुंतवणुकीसाठी इंडिया सिमेंट व हायडलबर्ग सिमेंटचा विचार करता येईल.

विप्रोने युरोपमधील तंत्रज्ञान व्यवस्थापकीय सल्लामसलत क्षेत्रातील कंपनी कॅपको खरेदी करण्याचा १०,५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. हा व्यवहार विप्रोच्या मिळकतीच्या जवळपास १० टक्के इतका मोठा आहे. कॅपकोच्या १६ देशांतील १०० हून जास्त ग्राहकांद्वारे माहिती सेवा सल्लागार क्षेत्रातील नवीन दालने विप्रोला उपलब्ध होतील. दोन कंपन्यांच्या विलिनीकरणातील गुंतागुंत व कॅपकोची मर्यादित नफाक्षमता याचा परिणाम विप्रोच्या निकालांवर पुढील काही काळ होईल. बाजाराने यावर सावध प्रतिक्रिया दिली व विप्रोचे समभाग चार टक्क्य़ांनी खाली आले. पुढील काही तिमाही निकालांवर लक्ष ठेवून सावधतेने विप्रोमध्ये नवीन गुंतवणूक करता येईल. कारण या व्यवहाराची सफलता विप्रोला इन्फोसिस किंवा टीसीएससारखे यश देईल.

एव्हरेस्ट कॅन्टो ही गॅस सिलिंडर्स बनविणारी आघाडीची कंपनी गुंतवणूकदारांच्या लक्ष्यावर असायला हरकत नाही. कंपनीने परदेशात उत्पादन करण्याचे चुकीचे पडलेले पाऊल मागे घेऊन भारतातील व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. खर्चकपातीच्या योजना व कर्जाचे प्रमाण कमी केल्यामुळे कंपनीला परत एकदा सुगीचे दिवस येऊ लागले आहेत. करोनाकाळात ऑक्सिजन सिलेंडर्सना मागणी मिळून कंपनीला आपले विक्री उद्दिष्ट साधता आले. उभारी घेत असलेली अर्थव्यवस्था व इंधन वायूला मिळणारी पसंती कंपनीच्या पथ्यावरच पडेल.

गेल्या काही महिन्यांतील पीएमआय निर्देशांकाचे आकडे देशातील उत्पादन वाढत असल्याचे संकेत देत आहेत. वाहन विक्री, सिमेंट, पोलाद, वीज यासारख्या मूलभूत कच्च्या मालातील मागणीचे वाढते प्रमाणही अर्थव्यवस्था गतिमान असल्याचे निदर्शक आहेत. खनिज तेलाचे उत्पादन न वाढविण्याच्या ओपेकच्या निर्णयामुळे देशातील इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत तरी बाजाराने इंधन दरवाढीकडे दुर्लक्ष केले आहे. अमेरिकेतील वाढते व्याजदर तेथील शेअर बाजारावर दबाव टाकत आहेत. आपला बाजार त्यावर थोडी प्रतिक्रिया देतो पण परत सावरतो. त्यामुळे बाजारातील तेजी अमेरिकेतील व भारतातील रोखे दरात भरीव वाढ होत नाही तोपर्यंत कायम राहील.

sudhirjoshi23@gmail.com