विवरणपत्र : कोणी भरावे?

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

करदात्याने आर्थिक वर्षांत केलेल्या व्यवहारांची म्हणजेच उत्पन्न, तोटा, वजावटी, उत्पन्नावर भरावा लागणारा कर, कर परतावा (रिफंड), वगैरेंची माहिती विवरणपत्राद्वारे प्राप्तिकर खात्याकडे दरवर्षी दाखल करावी लागते. विवरणपत्र दाखल करणे कोणाला बंधनकारक आहे याबद्दल काही निकष आहेत. विवरणपत्र दाखल करणाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यासाठी प्राप्तिकर कायद्यात मागील काही वर्षांत बदल करण्यात आलेले आहेत. साधारणत: ज्या व्यक्तींचे उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक तर आहेच. शिवाय काही ठरावीक रकमेपेक्षा जास्त खर्च केल्यास आणि उत्पन्न या मर्यादेपेक्षा कमी असेल तरी विवरणपत्र भरणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. जे करदाते विवरणपत्र दाखल करीत नाहीत त्यांचा उद्गम कर (टीडीएस) किंवा गोळा केलेला कर (टीसीएस) जास्त दराने कापण्याची तरतूददेखील १ जुलै २०२१ पासून अस्तित्वात आली आहे, जेणेकरून कराचे अनुपालन करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होईल.

ज्या वैयक्तिक किंवा हिंदू अविभक्त कुटुंबांचे एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे अशांना विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. कमाल करमुक्त मर्यादा खाली दर्शविली आहे :

  • वैयक्तिक करदात्याचे वय ६० वर्षांपेक्षा कमी आहे किंवा हिंदू अविभक्त कुटुंब यासाठी २,५०,००० रुपये
  • वैयक्तिक करदात्याचे वय (जे निवासी भारतीय आहेत) २०२०-२१ या आर्थिक वर्षांत केव्हाही ६० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे आणि ८० वर्षांपेक्षा कमी आहे यासाठी ३,००,००० रुपये
  • वैयक्तिक करदात्याचे वय (जे निवासी भारतीय आहेत) २०२०-२१ या आर्थिक वर्षांत केव्हाही ८० वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त आहे यासाठी ५,००,००० रुपये

ही उत्पन्नाची मर्यादा कलम ८० सी, ८० डी, ८० जी, ८० टीटीए वगैरे कलमांच्या वजावटी घेण्यापूर्वीच्या आहेत. संपत्तीची विक्री करून भांडवली नफा झाल्यानंतर नवीन घरात किंवा बाँडमध्ये जे करदाते गुंतवणूक करतात त्यांनासुद्धा ही ५४, ५४ एफ, ५४ ईसी वगैरे कलमांद्वारे वजावट घेण्यापूर्वी उत्पन्न वरील मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे.

ज्या करदात्यांचे उत्पन्न वर दर्शविलेल्या उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे विवरणपत्र भरणे अनिवार्य नाही आणि त्यांनी आर्थिक वर्षांत खालील व्यवहार केलेले असतील तर त्यांना विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

१. एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम बँकेच्या चालू खात्यात रोखीने जमा केली असल्यास, किंवा

२. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम स्वत:च्या किंवा दुसऱ्याच्या परदेश प्रवासासाठी खर्च केले असल्यास (या प्रवासात सूचित केलेल्या शेजारी देशात किंवा तीर्थयात्रेसाठीच्या प्रवासाचा समावेश नाही), किंवा

३. एक लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम वीज बिलापोटी खर्च केली असल्यास.

जे करदाते केवळ या निकषानुसार विवरणपत्र भरणार असतील त्यांना विवरणपत्रात या व्यवहाराची रक्कमसुद्धा भरावी लागेल. करदाता जर उत्पन्नाच्या निकषानुसार विवरणपत्र भरत असेल, म्हणजे त्यांचे उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त आहे, तर त्याला या व्यवहारांची रक्कम विवरणपत्रात भरणे गरजेचे नाही.

शिवाय ज्या निवासी भारतीयांची भारताबाहेर संपत्ती असेल किंवा भारताबाहेरील संपत्तीत फायदेशीर मालकी असेल किंवा भारताबाहेरील खात्यात सही करण्याचा अधिकार असेल तर त्या करदात्याला विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे.

वय वर्षे ७५ पेक्षा जास्त असणाऱ्या करदात्यांना काही अटींची पूर्तता केल्यास विवरणपत्र भरण्यापासून सूट देण्यात आली आहे. ही अट म्हणजे अशा नागरिकांच्या उत्पन्नात फक्त निवृत्तिवेतन आणि ज्या बँकेतून निवृत्तिवेतन मिळते त्या बँकेतील व्याजाचा समावेश असला पाहिजे. ही सूट विवरणपत्र भरण्यासाठीच आहे त्यांचे उत्पन्न करमुक्त नाही. त्यांचा देय कर बँक उद्गम कराद्वारे वसूल करेल.

भागीदारी संस्था आणि कंपन्यांना विवरणपत्र भरणे मात्र बंधनकारक आहे त्यांना उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही, तोटा असेल तरी विवरणपत्र भरावेच लागते.

तरी करदात्याने नियमित विवरणपत्र भरणे हितावह आहे. या विवरणपत्राच्या आधारे दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळणे सोयीचे होते. शिवाय बँकेतून किंवा संस्थांकडून कर्जाची प्रक्रिया सुलभतेने पार पडू शकते.

ज्या करदात्याला वरील तरतुदींमुळे विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे आणि त्याने ते मुदतीत भरले नाही तर त्याला विलंब शुल्क भरावे लागते. विवरणपत्राचा कोणता फॉर्म भरावा याबद्दल माहिती पुढील लेखात दिली जाईल.

आता वाचकांकडून आलेल्या प्रश्नांच्या समाधानाकडे वळू या.

  • प्रश्न :  मला व्याजाचे दरवर्षी २ लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यामुळे मी विवरणपत्र दाखल करीत नाही. मी २०२०-२१ या आर्थिक वर्षांत माझे घर विकले. मला १० लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला. हे सर्व पैसे मी याच वर्षांत नवीन घरात गुंतविले, त्यामुळे मला यावर कर भरावा लागणार नाही. मला विवरणपत्र भरावे लागेल का?

    – विठ्ठल काळे

उत्तर : एक घर विकून दुसरे घर घेतल्यास कलम ५४ नुसार वजावट (अटींची पूर्तता केल्यास) घेता येते. प्राप्तिकर कलम १३९ नुसार कलम ५४ नुसार वजावट घेण्यापूर्वी उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असेल तर विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे. आपले उत्पन्न, हे वजावटीपूर्वी एकूण १२ लाख रुपये (२ लाख व्याज उत्पन्न अधिक १० लाख रुपयांचा भांडवली नफा) इतके आहे. त्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक आहे, मात्र कर भरावा लागणार नाही.

 

  •  प्रश्न :  मी एक ज्येष्ठ नागरिक आहे. माझे एकूण उत्पन्न २,५०,००० रुपये इतके आहे. मी विवरणपत्र दाखल करीत नाही. मी माझ्या मुलाच्या परदेश सहलीसाठी ३ लाख रुपये भरले. मला विवरणपत्र भरावे लागेल काय?

    – ललिता चित्रे

उत्तर : आपले उत्पन्न कमाल करमुक्त उत्पन्नाच्या मर्यादेपेक्षा कमी असल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरणे बंधनकारक नाही. परंतु आपण परदेश सहलीसाठी २ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्यामुळे आपल्याला विवरणपत्र भरावे लागेल. हा खर्च स्वत:साठी किंवा दुसऱ्यासाठी केला असला तरी विवरणपत्र भरावे लागेल.

 

  • प्रश्न :  मी २०२०-२१ या आर्थिक वर्षांपासून वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. माझी वार्षिक उलाढाल १५ लाख रुपये इतकी आहे. मला विवरणपत्र कोणत्या तारखेपर्यंत दाखल करता येईल?

    – एक वाचक

उत्तर : आपला वैद्यकीय व्यवसाय ‘ठरावीक व्यवसायात’ मोडतो आणि आपली वार्षिक उलाढाल ५० लाख रुपयांपेक्षा कमी असल्यामुळे आपण कलम ४४ एडीएनुसार उलाढालीच्या ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त नफा दाखवून अनुमानित कर भरू शकता. असे केल्यास आपल्याला ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत विवरणपत्र दाखल करता येईल. (मूलत: ही तारीख ३१ जुलै २०२१ होती, करोनाच्या प्रादुर्भावामुळे ती ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात आली). आपण उलाढालीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी नफा दाखविल्यास आणि आपले एकूण उत्पन्न कमाल करमुक्त मर्यादेपेक्षा जास्त असल्यास आपल्याला लेख्यांचे परीक्षण (ऑडिट) करून घ्यावे लागेल आणि लेखा परीक्षण अहवाल ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत आणि विवरणपत्र ३० नोव्हेंबर २०२१ पर्यंत दाखल करता येईल. (या दोन्ही तारखा मूलत: अनुक्रमे ३० सप्टेंबर २०२१ आणि ३१ ऑक्टोबर २०२१ या होत्या)

  • लेखक सनदी लेखाकार आणि कर सल्लागार आहेत.

pravin3966@rediffmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Statement financial year by the taxpayer ssh

ताज्या बातम्या