अर्थउभारीची चाहूल बाजार खूप आधीच देईल!

* सरकारच्या वायूभारीत निर्णयाने सप्ताहअखेर बाजाराने भरलेला दम पाहता, पुन्हा शेअर गुंतवणुकीकडे वळा, असा सल्ला द्याल काय? – शेअर बाजाराचे टायमिंग हा गुंतवणूकदारांचा कायम औत्सुक्याचा विषय राहिला आहे. प्रत्यक्षात बाजाराची तऱ्हा खूपच विचित्र आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेरची

मुलाखत
* सरकारच्या वायूभारीत निर्णयाने सप्ताहअखेर बाजाराने भरलेला दम पाहता, पुन्हा शेअर गुंतवणुकीकडे वळा, असा सल्ला द्याल काय?
– शेअर बाजाराचे टायमिंग हा गुंतवणूकदारांचा कायम औत्सुक्याचा विषय राहिला आहे. प्रत्यक्षात बाजाराची तऱ्हा खूपच विचित्र आणि सामान्यांच्या आवाक्याबाहेरची असते. प्रत्यक्ष घडामोड होण्याआधी तिचा पूर्वअंदाज बांधून बाजार आपली प्रतिक्रिया बरी-वाईट देत असतो. त्यामुळे बाजाराची वेळ साधण्याऐवजी, आपण बाजाराला (गुंतवणुकीला) किती काळ देतो, हे माझ्या दृष्टीने महत्त्वाचे! सामान्य गुंतवणूकदारांनीही हाच दृष्टिकोन ठेवावा. जागतिक अर्थस्थिरता, देशांतर्गत अर्थव्यवस्थेची उभारी, आगामी सार्वत्रिक निवडणुकांचा कौल, आर्थिक सुधारणांचा रखड-पथ वगैरे बाबी आजही अनिश्चितच आहेत. एकूण अर्थचित्र अस्थिर असताना, त्याचेच प्रतिबिंब असलेल्या भांडवली बाजाराची स्थिर वाटचाल असंभवच ठरते. त्यामुळे येणारा काही काळ अस्थिरता कायम राहील. तथापि देशांतर्गत तरी अर्थचित्र अधिकाधिक स्पष्ट बनत चालले असल्याचे दिसत आहे. नैसर्गिक वायूची किमतवाढ, पायाभूत प्रकल्पांच्या अंमलबजावणीला युद्धपातळीवर गती वगैरे ताजे निर्णय या दूरगामी व बहुप्रतिक्षित आर्थिक सुधारणा आहेत. म्हणून गुंतवणुकीसाठी भांडवली बाजारच सध्या सर्वश्रेष्ठ ठरेल, हे नि:संशय! तरी शेअर बाजारातून चांगला परतावा हवा असेल तर या गुंतवणुकीला किमान तीन ते कमाल पाच वर्षांचा अवधी द्यावाच लागेल. यानुसार सद्यस्थितीत गुंतवणुकीचा पटही हळूहळू विस्तारत न्यायला हवा.
’ भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता वाटावी अशी स्थिती असतानाही, विदेशी वित्ताचा बाजारातील ओघ खूपच दमदार राहिला. अमेरिकेतील ताज्या घडामोडींनी बाजारात येणाऱ्या डॉलरची वाट अडखळेल आणि वारे उलटे वाहू लागले असे वाटते काय?
– आर्थिक वर्ष २०१२ आणि विद्यमान २०१३ ही भारताच्या अर्थविकासाच्या दृष्टीने खडतर वर्षे राहिली. कमालीचा घटलेला वृद्धीदर; भयंकर चलनवाढ आणि वित्तीय तसेच चालू खात्यातील डोईजड तूट या अर्थचिंता आजही पुरत्या सरलेल्या नाहीत. तरी यापुढे यापेक्षा आणखी वाईट काही घडण्यापेक्षा सुधारणाच दिसेल, असे ठामपणे म्हणता येईल. आधी म्हटल्याप्रमाणे जे काही बरे-वाईट घडणार आहे त्याची प्रतिक्रिया भांडवली बाजार खूप आधीपासूनच देत असतो. त्यामुळे देशांतर्गत अर्थउभारीचीही बाजाराला सहा-आठ महिने आधीच चाहूल लागलेली दिसेल. सध्या बाजाराने आर्थिक आघाडीवरील हळूवार पण निश्चित स्वरूपाचा सुधार जमेस धरलेलाच आहे. याचेच प्रत्यंतर विदेशी वित्ताच्या ओघात उमटले आहे. विद्यमान बाह्य घडामोडींनी त्यात तात्पुरता अवरोध दिसेल. मात्र गेल्या सप्ताहअखेर आर्थिक सुधारणापथावर सरकारची धडाडी कायम असल्याचे दिसून आले. पुढे जाऊन आगामी निवडणूक निकालांसंबंधाने जोखीम ओसरत नेणारे चित्र स्पष्ट झाल्यास, विदेशी गुंतवणुकीचा पाट पुन्हा दमदारपणे खुला होईल. स्थानिक सामान्य गुंतवणूकदारांनी मात्र सुस्पष्ट वृद्धीपथ असलेल्या व त्याला पूरक आर्थिक ताळेबंद असणाऱ्या, उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या प्रथितयश कंपन्यांना हेरून त्यात गुंतवणुकीचा शिरस्ता कायम ठेवायलाच हवा.
’ गेल्या सप्ताहअखेर बाजाराने घेतलेली आश्चर्यकारक उसळी पाहता, बाजाराची आगामी चाल कशी असेल?
– सद्यस्थितीत बाजार भावी वर्षांतील कमाई जमेस धरून १४.५ पट या किंमत/उत्पन्न गुणोत्तरावर (पीई) वाटचाल करीत आहे. गतकाळाचा वेध घेतल्यास बाजाराचा सरासरी पीई जवळपास इतकाच राहिला आहे. मागील काही वर्षांतील आर्थिक खडतरता आणि आगामी काळात अपेक्षित असलेली सुधारणा जमेस धरल्यास, सध्या सरासरी पातळीवर दिसणारे मूल्यांकन आगामी काळात आकर्षक बनू शकेल. आपण आयात करीत असलेल्या आंतरराष्ट्रीय जिनसांच्या ओसरलेल्या किमती, पावसाची उत्तम नांदी या बाबी महागाई, वित्तीय तूट, अवमूल्यन झालेला रुपया या चिंतांचे मळभही दूर सारतील. परिणामी आगामी काळात उच्च व्याजदर, चढय़ा भावातील कच्चा माल वगैरे खर्चाचा भार कमी होऊन उद्योगधंद्यांची वित्तीय कामगिरीही सुधारलेली दिसेल आणि याचे त्यांच्या समभागांच्या भावातही उचित प्रत्यंतरही उमटेल. प्रमुख राज्ये व लोकसभा निवडणुकांचे निकाल, तर देशाबाहेर अमेरिकी-युरोपिय मध्यवर्ती बँकांचा पत-पवित्रा वगैरे घटक मधल्या काळात बाजारात चंचलता जरूर निर्माण करतील. या दरम्यान ६-८ टक्क्यांनी येणारे बाजारावरील ‘करेक्शन्स’चे आघात खरे तर खरेदीची संधी म्हणून दीघरेद्देशी गुंतवणूकदारांच्या पथ्यावर पडावेत.
’ कोणकोणती उद्योगक्षेत्रे वा समभाग तुम्ही गुंतवणुकीसाठी सुचवाल आणि त्यामागील कारणे?
– बाजारात सध्या मूल्यांकनाबाबत प्रचंड स्वरूपाची असमानता निश्चितच आहे. नजीकच्या भविष्यात सुस्पष्टरीत्या चांगल्या कामगिरी करू शकणाऱ्या आणि वृद्धीक्षम असलेल्या उद्योगक्षेत्रांनी आताच वाजवीपेक्षा जास्त मूल्यांकन मिळविले आहे, तर वर्षचक्रानुसार पारंपरिकरित्या प्रकाशझोत असणाऱ्या समभागांना बाजारात कोणी विचारेनासे झाले आहे. त्यामुळे क्षेत्रवार गुंतवणुकीचा दृष्टिकोन सध्या जिकीरीचा ठरेल. कारण देशी वा बाह्य घटनेच्या पडसादादाखल होणाऱ्या चढ-उतारात सुक्यासरशी ओलेही खाक होत असल्याचे अलीकडेच दिसून आले आहे. तरीही आधीच महाग बनलेली काही उद्योगक्षेत्रे जसे औषधी, आरोग्यनिगा ही क्षेत्रे गुंतवणुकीसाठी सुचविण्याचा मोह टाळता येत नाही. त्या उलट पाऊसपाणी चांगले राहिल्यास त्याचा लाभ वाहन उद्योगाला निश्चितच मिळेल. निवडणूक वर्ष असल्याने दुचाकी, ट्रॅक्टर्सची मागणी वाढेल आणि अर्थउभारीचा भावनात्मक परिणाम म्हणून सणोत्सवात कारच्या मागणीलाही बहर येईल. डिजिटायझेशनची प्रक्रिया मार्गी लागल्याने माध्यम व प्रसारण क्षेत्रातील कंपन्यांना गेली काही तुंबून राहिलेला फायद्याचे घबाड गवसल्याचे पुढील वर्षांत दिसेल, त्यामुळे या कंपन्यांवर लक्ष असू द्यावे.

* महेश पाटील
सह-मुख्य गुंतवणूक अधिकारी
बिर्ला सन लाइफ अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थवृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: The interview of mahesh patil

ताज्या बातम्या