25 September 2020

News Flash

स्खलनशीलतेकडून पुनर्भरारीकडे..

शारीर ते अशारीर नात्याचा प्रवास घडण्यासाठी तुमच्यातल्या स्खलनशीलतेला पुनर्भरारी घ्यावी लागते.

‘सिटी ऑफ गर्ल्स’ लेखिका : एलिझाबेथ गिल्बर्ट प्रकाशक : ब्लूम्सबरी पृष्ठे : ४७०, किंमत : ५९९ रुपये

आरती कदम

शारीर ते अशारीर नात्याचा प्रवास घडण्यासाठी तुमच्यातल्या स्खलनशीलतेला पुनर्भरारी घ्यावी लागते. लोकप्रिय अमेरिकी लेखिका एलिझाबेथ गिल्बर्टची ही कादंबरी मानवी जीवनातील याच वृत्ती-प्रवृतींचा वेध घेते..

‘‘माझ्या आईचं नुकतंच निधन झालंय. आता तू मोकळेपणानं सांगू शकशील की माझ्या वडिलांची तू ‘काय’ होतीस,’’ ‘त्याच्या’ मुलीच्या या प्रश्नाला उत्तर देण्यातून सुरू झालेली ‘सिटी ऑफ गर्ल्स’ ही कादंबरी १९४० ते आजवरचा न्यू यॉर्क शहरातील काळ चिमटीत पकडत, स्त्रीच्या लैंगिक इच्छेच्या बऱ्यावाईट अनुभवांचा वेध घेत अखेर स्त्री-पुरुषांच्या शांत, नितळ आणि प्रवाही नात्यांपर्यंत पोहोचते, तेव्हा तो असतो एका अपरिपक्वमुलीचा शहाण्या समजुतीपर्यंतचा प्रवास!

सध्याच्या लोकप्रिय अमेरिकी लेखिका एलिझाबेथ गिल्बर्ट हिची ही ४७० पानी ‘बेस्ट सेलर’ कादंबरी. एक कोटीहून अधिक प्रतींची विक्री झालेले ‘इट, प्रे, लव्ह’, तसेच ‘बिग मॅजिक’, ‘कमिटेड’ आदी विचारांना खाद्य देणाऱ्या पुस्तकांनंतर आलेली तिची ही तिसरी कादंबरी. एक माणूस म्हणून आयुष्यात चुका करण्याची प्रत्येकालाच मुभा असते; पण त्या चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाल्यानंतरही त्यातून उठून लखलखीतपणे उभे राहणे हे खरे मानवीपण आहे, हेच सत्य ही कादंबरी ठसठशीतपणे मांडते.

१९ व्या वर्षी कपडय़ांची एक छोटी बॅग आणि शिवणयंत्र बरोबर घेऊन न्यू यॉर्क शहरात दाखल झालेली या कादंबरीची नायिका विवियन मॉरीस या शहराने दिलेल्या बेलगाम, उच्छृंखल आयुष्यात वाहून जाते. पण हेच शहर तिच्यातल्या कलेला फुंकर घालत तिच्यात सर्जनशीलतेची ठिणगी सतत पेटवत ठेवते. ज्या शहरातून तिला अपमानित होऊन बाहेर पडावे लागलेले असते, तेच शहर तिला ‘वेडिंग गाऊन डिझायनर’ म्हणून ओळख तर देतेच, पण त्याहीपलीकडे जाऊन नात्यांचे खरे अर्थही समजावून सांगते. तिच्याकडून सारे काही ओरबाडून घेणारे हे शहर तिच्या पुढच्या आयुष्यात भरभरून जगणे शिकवते, परिपक्व करते. त्या अर्थी या ‘सिटी ऑफ गर्ल’ची ही कहाणी.

ही संपूर्ण कादंबरी म्हणजे नायिका विवियनने ‘त्याच्या’ मुलीला, अ‍ॅन्जेलाला लिहिलेले पत्र आहे. त्यामुळे विवियनच्या या संपूर्ण प्रवासात अ‍ॅन्जेलाही बरोबर असते. हे पत्र सुरू होते- ‘‘तू माझ्या वडिलांची ‘काय’ होतीस?’’ या प्रश्नापासून. इथे तू ‘कोण होतीस’ या प्रश्नाला कदाचित प्रेयसी, मैत्रीण, हितचिंतक असे काही तरी एका शब्दातले उत्तर देता आले असते; परंतु अ‍ॅन्जेलाच्या ‘काय होतीस’ या प्रश्नाला उत्तर देताना, विवियनला तिच्या ९० वर्षांच्या आयुष्याचा पट मांडावासा वाटला. थोडक्यात, अ‍ॅन्जेलाला उत्तर देता देता खरे तर ती स्वत:चाच शोध घेत जाते. अ‍ॅन्जेलाचा हा पिता कोण याचे रहस्य कादंबरीच्या अगदी शेवटच्या टप्प्यात उघडकीस येते. शेवटपर्यंत ते कुतूहल वाढवत, टिकवून ठेवण्यात लेखिका यशस्वी ठरली असल्याने ही कादंबरी वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे.

एलिझाबेथ गिल्बर्ट हिच्या या कादंबरीत महत्त्वाच्या पात्रांबरोबरच तिच्या आत्याची ‘लीली थिएटर कंपनी’, दुसरे महायुद्ध आणि मुख्य म्हणजे न्यू यॉर्क शहर यांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. या तिन्ही गोष्टी पार्श्वभूमीला असण्यातून विवी घडत जाते. म्हणूनच एलिझाबेथने इथे विवियनच्या माध्यमातून मांडलेली गोष्ट ही त्या काळाचीही गोष्ट आहे आणि त्या शहराचीही. १९४० चा कालखंड म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा काळ. एका सुशिक्षित, संस्कारित कुटुंबातली ही मुलगी, अचानक येऊन पडते ती युद्धाच्या सावटाखालच्या अस्थिरतेच्या, भयग्रस्ततेच्या आणि तितक्याच बेधुंद, स्वच्छंद आयुष्य जगू देणाऱ्या न्यू यॉर्क शहरात. सोबतीला आत्याच्या नाटक कंपनीतल्या शोगर्ल्स. त्यांचा शहरातला रात्रीचा स्वैर संचार, त्यातही दारू, सिगरेट आणि मुख्य म्हणजे सेक्स, असे मुक्त जगणे. याचा मोह तिला पडला नसता तरच आश्चर्य होते. या बेलगाम आयुष्यामुळेच जाणीवपूर्वक आपले कौमार्य भंग करवून घेणारी विवियन अनेक साहसी कृत्येही करत जाते. त्या काळातल्या असंख्य मुलींचे आयुष्य असेच होते. अशा वेळी मग पोलिसांची धरपकड, तुरुंगवास, गरोदरपण किंवा मग खून वा शेवटी गटारात बेवारस मरून जाणे असेही आयुष्य अनेकींच्या वाटय़ाला आलेले. विवियनच्या आयुष्यात याच जगण्याने आलेल्या स्वैराचाराचा एके दिवशी कळस गाठला जातो; पण असा काही तडाखा बसतो, की तिचे आयुष्य आमूलाग्र बदलून जाते.

या घटनेचे वर्णन करताना एलिझाबेथ एका मुलाखतीत सांगते, ‘‘तुमच्या आयुष्यात तळापासून बदल घडवून यायचा असेल तर एक मोठा तडाखा बसणे आवश्यक असते. आयुष्याचे भान येण्यासाठी विवियनला तो बसणे अपरिहार्य होते.’’ अपेक्षेप्रमाणे तो बसतोच. पण याचा अर्थ ती लग्न करून, मुले जन्माला घालून संसारी होते का? तर नाही. आपल्या लैंगिक इच्छांना ती नेहमीच शरण जाते. ती कायम एकल राहते. पण शेवटी आपल्या या वागण्याचे स्पष्टीकरण देताना सांगते, ‘‘आनंद आणि समाधान या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आयुष्यात मला आनंदी करणाऱ्या अनेक घटना घडल्या, अनेक माणसं भेटली पण सेक्सनं मला समाधान दिलं. माझ्या आयुष्यात भरून राहिलेल्या काळोखावरचं ते समाधान होतं.’’ या समाधानावरचे विवियनचे समर्थन तिच्या स्वत:च्या आयुष्याबद्दलच्या खोल समजुतीचे प्रतिबिंब आहे. ते कादंबरीत मुळातूनच वाचायला हवे. म्हणूनच आपल्या लैंगिक इच्छेबाबत एलिझाबेथ यांची विवियन प्रामाणिक आहे. पण याच शारीर आनंदाला शरण जाणाऱ्या विवियनला खरे मैत्र गवसते ते मात्र अशारीर नात्यातच. हीच आयुष्यातली विसंगती!

गोष्ट सांगता सांगता जगण्यातले सत्य किती सांगते यावर त्या कादंबरीचे यश ठरत असते. ‘सिटी ऑफ गर्ल्स’मध्ये विवियनला परिपक्व करत जाण्यामागे हे सत्य कारणीभूत ठरले आहेच, पण वाचक म्हणून आपल्यालाही ते अंतर्मुख करत जाते. विवियन अ‍ॅन्जेलाला सांगते, ‘‘आपण जेव्हा तरुण असतो तेव्हा या गैरसमजुतीत असतो की काळ हे सगळ्या जखमांवरचं औषध आहे. पण जसं जसं आपलं वय वाढत जातं तसतसं हे कटू सत्यही आपल्याबरोबर कायम राहतं की काही गोष्टी कधीच पूर्ववत होत नाहीत. बिघडलेल्या काही गोष्टी कधीच दुरुस्त करता येत नाहीत. ना काळाच्या पुढे जाण्यातून, ना आपल्या तीव्र इच्छेतून. आपण सगळेच त्यातली शरम, दु:खं आणि भरून न आलेल्या जखमा शरीरात वागवत जगत राहतो आणि तसंच जगणार असतो.’’ जगण्याचे हेच भान या कादंबरीतल्या पात्रांना समजूतदार करत जाते.. आणि वाचक म्हणून आपल्यालाही.

अशीच काही महत्त्वाची वाक्ये स्त्रीच्या समजुतीपाशीही घेऊन जातात. मोकळेपणाने गप्पा मारणाऱ्या तिच्या मैत्रिणी पाहिल्यावर विवियन म्हणते, ‘‘एक सत्य मला गवसलंय, जेव्हा एकही पुरुष आजूबाजूला नसतो तेव्हा एकत्र येणाऱ्या बायांना कुठलीही भूमिका घ्यावी लागत नाही. त्या फक्त ‘त्या’ असतात.’’ किंवा ‘‘प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात एक वेळ अशी येते, जेव्हा ती सतत लाज बाळगत, शरम सांभाळत जगण्याचं सोडून देते आणि ती खरी जी आहे ते जगण्यासाठी मुक्त होते..’’ किंवा ‘‘आयुष्य हे दोन्ही, धोकादायक तितकंच क्षणभंगुरही आहे. म्हणूनच आपले आनंदाचे क्षण नाकारण्यात ना काही अर्थ असतो, ना तुम्ही जे आहात त्यापेक्षा वेगळं बनण्याचा प्रयत्न करण्यात.’’

ही आणि अशी अनेक वाक्ये, वर्णने हे पात्रांचे स्वभाव म्हणून येतातच, पण त्याचबरोबरीने एलिझाबेथच्या लेखिका म्हणून कलात्मक सर्जनशीलतेची अभिव्यक्तीही करतात. उदाहरणार्थ, महायुद्धानंतर बदललेल्या न्यू यॉर्क शहराचे वर्णन करताना विवियन म्हणते, ‘‘युद्धपश्चात न्यू यॉर्क, मुख्यत: मध्यवर्ती शहर हे श्रीमंत, हावरट, असंयमी आणि वाढतं जनावर होत चाललं होतं. जुन्या इमारती डोळ्यांसमोर जमीनदोस्त होत होत्या आणि २०-२० मजल्यांच्या टोलेजंगी इमारती उभ्या राहत होत्या.’’ जेव्हा ‘लीली थिएटर’ जमीनदोस्त होत होते तेव्हा ती अधिक भावनिक होत म्हणते, ‘‘ज्यानं मला खरोखरच जन्म दिला ते ठिकाण कोसळताना पाहण्यासाठी माझी आत्या  पेग हिच्यासारखा सहनशील पाठीचा कणा माझ्याकडे नव्हता. मी पाहत होते, इमारत जमीनदोस्त होत असताना आतल्या स्टेजचा तो भाग या क्रूर, संवेदनाहीन सूर्यप्रकाशात उघडानागडा होत समोर आला, जो कधीही कुणी पाहणं अपेक्षित नसतं. लक्तरं झालेलं त्याचं ते रूप लोकांच्या साक्षीसाठी प्रकाशात आलं. आणि.. सगळंच संपून गेलं.’’

या कादंबरीबद्दल एका मुलाखतीत बोलताना एलिझाबेथ गिल्बर्टने म्हटले होते, ही कादंबरी लिहायला तिला सहा वर्षे लागली. ही सहा वर्षांची मेहनत कादंबरीच्या पानोपानी दिसते. कारण न्यू यॉर्क शहराचा युद्धपूर्व आणि युद्धपश्चात काळ मांडायचा तर होताच, पण त्याहीपलीकडे ‘लीली थिएटर कंपनी’च्या निमित्ताने त्या काळातली थिएटर संस्कृती, त्यातले कलाकार, त्यातल्या शोगर्ल्स, त्यांचे कपडे, त्यावेळची गाणी, नाटके, मुख्य म्हणजे एकमेकांशी बोलण्याची पद्धत, जगण्याच्या चालीरीती हे जसेच्या तसे उतरवणे गरजेचे होते. एलिझाबेथ गिल्बर्ट अशा अनेक ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन आली. तो काळ पाहिलेल्या आणि आजही जिवंत असणाऱ्या लोकांना भेटली, त्या वेळची काही कागदपत्रे अभ्यासली. त्या काळाचे जगणे मांडत असतानाच, न्यू यॉर्क शहरातील मुलींबद्दल, त्यांच्या जगण्याबद्दल आणि मुख्य म्हणजे स्त्रीच्या एकूणच लैंगिकतेवर, त्यातल्या इच्छा-आकांक्षांवर लिहिणे हाही एक लेखक म्हणून एलिझाबेथ गिल्बर्टच्या विचारांचा भाग होताच.

arati.kadam@expressindia.com

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2020 12:05 am

Web Title: city of girls novel review abn 97
Next Stories
1 बुकबातमी : बाकीचे ११९९!
2 स्वीकारशील समाजासाठी..
3 निसर्गाची नवलसाखळी!
Just Now!
X