‘‘भारतात आलेल्या ब्रह्मपुत्र नदीच्या पुरात एक हत्ती अडकला.. जेव्हा तो पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी जमिनीवर येण्याच्या प्रयत्नात होता, तेव्हा गावकऱ्यांनी मात्र त्याच्यावर दगडांचा मारा करत त्याला पुन्हा नदीत लोटले..

सुरक्षित जमीन शोधण्याच्या प्रयत्नात तो सुमारे ९०० मैल अंतर कापत दूर बांगलादेशात जाऊन पोहोचला..

तिथे त्याला पाण्यातून बाहेर काढण्यात आले, दोरखंडांनी आणि साखळ्यांनी बांधलेल्या त्याला पाहण्यासाठी मग बघ्यांची गर्दी होऊ लागली..

पोलीस बघ्यांना त्याच्यापासून दूर लोटत होते..

आता तर तो बघ्यांसाठी नायकच झाला होता, बांगलावासीयांनी तर त्याला ‘बंगबहादूर’ ही वीरत्वाची उपाधीही देऊन टाकली..

मग भारतीय माध्यमांतून त्याला परत आणण्यासाठी खल होऊ लागला..

पण बांगला माध्यमांतूनही ‘तुम्ही कोणत्या आंतरराष्ट्रीय कायद्याचा हवाला देत त्याला परत नेणार आहात?’ असा प्रतिप्रश्न केला जाऊ लागला..

या चर्चेत दिवसांमागून दिवस जाऊ लागले..

इतक्या दिवसांच्या जलप्रवासाने थकलेल्या बंगबहादूरला वेदनाशामकं देऊन त्याच्यात जीव ओतण्याचा प्रयत्न झाला, पण शेवटी भारतीय स्वातंत्र्य दिनीच त्याचा मृत्यू झाला..

..आणि अशा प्रकारे फाळणीच्या सत्तर वर्षांनंतर पुन्हा एकदा फाळणीची करुण कहाणी जन्माला आली..’’

हे आहेत प्रसिद्ध लेखक अमिताव कुमार यांच्या ट्विटरवरील काही नोंदींचे अनुवाद.. या नोंदींना पाश्र्वभूमी आहे ती अलीकडेच आलेल्या एका बातमीची. झाले असे की, जूनच्या शेवटच्या आठवडय़ात, पुराच्या तडाख्यात आसामातील कुरीग्रामच्या सीमेवरील डोंगराळ प्रदेशातील हत्तींचा एक कळप  विखुरला. त्यापैकी एक हत्ती नदीच्या जोरदार प्रवाहात सापडला. या प्रवाहातून जिवाच्या आकांताने बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतानाच स्थानिक गावकऱ्यांनी त्याच्यावर दगडांचा मारा करत त्याला पुन्हा पाण्यात ढकलून दिले. परिणामी त्याला पाण्यातून बाहेर पडण्यासाठी दुसरीकडे जागा शोधण्याशिवाय पर्याय राहिला नाही. वाहत्या पात्रातून व दलदलीच्या जमिनीवरून प्रवास करत तो शेवटी पलीकडे बांगलादेशात जाऊन पोहोचला. इकडे मग वनविभागाकडून त्याला शोधण्यासाठी धावाधाव सुरू झाली. बांगलादेशमधील उत्तर जमालपूरच्या भागात पोहोचलेल्या या हत्तीला तिथल्या प्रशासनाने शोधून काढले. भारतातील गावकऱ्यांनी नाकारल्यावर त्याने बांगलादेशाची भूमी आपलीशी केली. तिथे त्याला ‘बंगबहादूर’ असे नाव दिले गेले. दोन्ही देशांकडून त्याच्यावर हक्क दाखविला गेला. त्यासाठी इतिहासाचे दाखले दिले गेले. पण सुमारे दीड एक महिन्याच्या अहोरात्र प्रवासाने गलितगात्र झालेल्या या हत्तीला वाचवायचे कसे, हा प्रश्नच होता. अनेक उपाय केले गेले, परंतु शेवटी हृदयविकाराच्या धक्क्याने गेल्या आठवडय़ात त्याचा मृत्यू झाला.

ट्विटरच्या शब्दमर्यादेत लेखक अमिताव कुमारांनी लिहिलेल्या या नोंदी या जणू फाळणीवर आधारलेली एक लघुतम कथाच. या नोंदींच्या शेवटी अमिताव यांना उर्दू कथालेखक सआदत हसन मंटोची आठवण येणे स्वाभाविक होतेच. तशी त्यांनी ती काढलीच. आणि मंटोच्या एका कथेचाही संदर्भ दिला. ‘टिटवाल का कुत्ता’ ही ती मंटोची कथा.

बंगबहादूरप्रमाणेच इकडे आड तिकडे विहीर अशा पेचात अडकलेल्या एका कुत्र्याची करुण कहाणी मंटोने सुमारे सात दशकांपूर्वी लिहिलेल्या या कथेत वाचायला मिळते. काश्मीर खोऱ्यात भारत- पाकिस्तान सीमेच्या दरम्यान ‘नो मॅन्स लॅण्ड’मध्ये हा कुत्रा भटकत असतो. भटकता भटकता तो भारतीय सैनिकांचा कॅम्प असलेल्या ठिकाणी येऊन पोहोचतो. एक जवान त्याला जमादार हरनामसिंहकडे घेऊन येतो. आता जमादारच्या दृष्टीने तो कुत्रा भारतीय असणे आवश्यक असते. नाही तर त्याचे मरण अटळ होते. पण युद्धादरम्यानच्या काहीच न घडण्याच्या कंटाळवाण्या काळात जवानांना जीव रमवण्यासाठी काही तरी हवेच असते. त्यामुळे कुत्रा घेऊन आलेला तो जवान त्या कुत्र्याचे नाव चपड झुनझुन असल्याचे सांगून तो भारतीय कुत्राच असल्याचे जमादाराला पटवून देतो. मग त्याच्या गळ्यात पट्टी बांधून त्यावर ‘चपड झुनझुन’ असे त्याचे नाव लिहून त्याच्या पुढे ‘हा भारतीय कुत्रा आहे’ असल्याचेही जोडले जाते. मग त्याला कॅम्पमधले जवान दूध-बिस्कीट खायला देतात. पण तो कुत्रा रात्री पुन्हा भटकत सीमा पार करून पाकिस्तानी कॅम्पकडील भागात शिरतो. तिथे त्याच्या गळ्यातली पट्टी पाहताच तिथले जवान आश्चर्यचकित होतात. त्या पट्टीवरील लिखावट मग वाचली जाते. ते वाचून हा भारतीय कुत्रा असल्याचे त्यांच्या ध्यानात येते. मग लगेच वॉररूम मीटिंग घेतली जाते. त्यात ठरल्यानुसार पाकिस्तानी सुभेदार हिम्मत खान त्या कुत्र्याच्या गळ्यातील पट्टी बदलून त्यावर कुत्र्याचे नवे नाव ‘सपड सुनसुन’ असे लिहून पुढे ‘हा एक पाकिस्तानी कुत्रा आहे’ असेही जोडतो. मग त्या कुत्र्याला भारतीय कॅम्पच्या दिशेने सोडले जाते. गोळीच्या आवाजाने त्याला तिकडे जाण्यास प्रवृत्त केले जाते. हा आवाज ऐकून दुसऱ्या म्हणजेच भारतीय कॅम्पमधून हरनामसिंह बाहेर येतो. शत्रूच्या भागाकडून येणाऱ्या कुत्र्याला पाहून तो बंदूक चालवतो. घाबरलेला कुत्रा मग पुन्हा परत उलटय़ा दिशेने जायला निघतो. पुन:पुन्हा दोन्ही बाजूंनी क्रॉस फायरिंग केली जाते. भयक्रांत झालेला कुत्रा मग कधी या दिशेने तर कधी त्या दिशेने जायला वळतो. त्याची ही फरफट दोन्ही बाजूंनी मोठय़ा आनंदाने पाहिली जाते. शेवटी एक गोळी त्याचा माग घेतेच. आणि त्यात तो मारला जातो. यावर हिम्मत खानच्या तोंडून शब्द बाहेर पडतात- ‘शहीद हो गया बेचारा’ तर हरनामसिंह गरम झालेली बंदुकीची नळी फुंकत फुत्कारतो- ‘उसी मौत मरा जो कुत्ते की होती है!’

या दोन्ही कथांमधून तोच ‘नो मॅन्स लॅण्ड’चा प्रदेश जातोय, ज्याचा शोध आसामातल्या हत्तीनेही घेतला आणि काश्मीर खोऱ्यातल्या भटक्या कुत्र्यानेही. हे दोघेही माणसांपासून दूर जाऊ पाहत होते. पण या मुक्या जिवांना मात्र आधुनिक सीमा आणि ओळख यांच्या अपरिहार्यतेची जाणीव नव्हती. कारण आधुनिक झालेल्या जगात सीमेवरून ओळख ठरत असते. या आधुनिकतेला जर राष्ट्रवादाचे कोंदण मिळाले तर मात्र भक्ती, निष्ठा ही प्रश्नातीत (प्रश्न करणे हाच ‘द्रोह’ ठरवणारी!) मूल्ये बनून जातात. आता राष्ट्रांच्या सीमा पक्क्या झाल्या आहेत. त्यामुळे ओळखपत्राशिवाय, पारपत्राशिवाय ये-जा करता येणार नाही. तुम्ही राहताय एका ठिकाणी आणि निष्ठा दाखवताय दुसऱ्याच ठिकाणी, असे चालणार नाही. तुमच्या निष्ठा तुम्ही मोठय़ाने ओरडून सांगणे गरजेचे आहे. इतकेच नव्हे तर त्या निष्ठेचा पुरावा देणेही आवश्यक आहे. तो पुरावाच हे मुके जीव देऊ शकले नाहीत. तो त्यांना देता आला असता तर या दोन्ही कथा वेगळ्या स्वरूपाच्या राहिल्या असत्या, हे मात्र नक्की.

 

– प्रसाद हावळे

prasad.havale@expressindia.com