कथानिवेदकाची अविश्वसनीयता हा उत्तराधुनिक साहित्यातला एक महत्त्वाचा घटक. नॉर्वेजियन कादंबरीकार कार्ल ओव्ह क्नाउसगार्डच्या माय स्ट्रगलया सहा खंडीय कादंबरीत तो पुरेपूर आहे. त्यात स्वत: लेखकाचे खासगी आयुष्य, त्याचे निकटवर्तीय आणि नॉर्वेतल्या कलावर्तुळातले अनेक प्रख्यात लोक आदी तपशील येतातच, त्याने ही कादंबरी अनेकांना त्याची आत्मकथाही वाटू शकेल. पण ती तशी नाही. याचे कारण या तपशिलांच्या सत्यासत्यतेविषयी स्वत: क्नाउसगार्डलाच शंका आहेत. तरीही स्व-स्मृतींच्या बेभरवसेपणाची कबुली देणाऱ्या क्नाउसगार्डची ही ३६०० पानी कादंबरी आत्मकथनात्मक कादंबरीच्या विधेला पुढे नेणारी ठरते..

‘आत्मचरित्रात्मक कादंबरी’ या साहित्यप्रकाराला मराठीत काही विशिष्ट अर्थ चिकटले आहेत. जगण्याचा संघर्ष मांडणारा साहित्यप्रकार म्हणून प्रामुख्यानं त्याकडे पाहिलं जातं. कादंबरीमधून आपली गोष्ट सांगणाऱ्यानं खूप सोसलेलं आहे; त्याच्या जीवनसंघर्षांची गोष्ट वाचकाला हेलावून टाकणार आहे; त्यातून वाचकाला नतिक संदेशही मिळणार आहे, असं या विशिष्ट अर्थामध्ये अंतर्भूत असतं. याशिवाय, लहानपणच्या संस्कारांची शिदोरी आपल्याला आयुष्यभर कशी पुरली ते सांगणं हादेखील मराठीतल्या अनेक आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांचा हेतू असतो. आपली गोष्ट सांगणाऱ्या लेखकाविषयी वाचकाला सहानुभूती वाटली पाहिजे ही बरेचदा अशा लिखाणाची पूर्वअट असते. आपलं फार काही चुकलं नाही, पण परिस्थिती किंवा इतर लोक कसे प्रतिकूल होते ते सांगणं (आत्मसमर्थन) हासुद्धा त्यामागचा एक हेतू दिसतो. अर्थात, याला मोजके अपवाद सापडतातही, पण त्यातून आत्मचरित्रात्मक कादंबऱ्यांचा वेगळा प्रवाह मराठीत निर्माण व्हावा इतकी काही त्यांची संख्या नाही. पाश्चात्य कादंबरीच्या सुरुवातीच्या काळात तिच्यातही अशी वैशिष्टय़ं आढळतात. मध्यवर्ती व्यक्तिरेखा आपल्यावर बेतली आहे हे अगदी उघड कळावं अशा प्रकारच्या कादंबरी लेखनाचा प्रवाह अगदी टॉल्स्टॉय आणि डिकन्सपासून, म्हणजे कादंबरीच्या जवळपास उगमापासूनच दिसतो. पण पुढे तिथे या विधेत अनेक प्रयोग झाले आणि त्यामुळे त्यात पुष्कळ वैविध्यही आलं. शिवाय, कादंबरी या साहित्यप्रकारात जसजसे नवे प्रवाह येत गेले तसतशी आत्मचरित्रात्मक कादंबरीही बदलत गेली. ‘कादंबरी आता मेली आहे’, ‘नवीन करण्यासारखं काही उरलं नाही’ असे सूर अधूनमधून आळवायची पाश्चात्त्यांना सवयच आहे. तरीही मधूनच एखादी नवी कादंबरी येते आणि कादंबरीत उल्लेखनीय प्रयोग होत असल्याचा लोकांना पुन्हा एकदा साक्षात्कार होतो. कार्ल ओव्ह  क्नाउसगार्ड  या नॉर्वेजियन लेखकाच्या ‘माय स्ट्रगल’ या सहा खंडांच्या आणि सुमारे ३,६०० पानांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीमुळे असंच झालेलं दिसत आहे.

Loksatta editorial indian Ambassador Akhilesh Mishra has slammed an Irish Newspaper for publishing an editorial on PM Narendra Modi
अग्रलेख: आजचा मुत्सद्दी, उद्याचा मंत्री?
freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Why frequent allegations of political infiltration in Sahitya Akademi
विश्लेषण: साहित्य अकादमीत राजकीय घुसखोरीचा आरोप वारंवार का?
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये

२००९ मध्ये मूळ नॉर्वेजियन कादंबरीचा पहिला खंड प्रकाशित झाला. २०११ मध्ये सहावा आणि अखेरचा खंड प्रकाशित झाला. पहिल्या खंडापासूनच नॉर्वेमध्ये कादंबरीचा गाजावाजा झाला. कादंबरी तिथे चांगलीच लोकप्रियही झाली. कादंबरी गाजण्याची मुख्य कारणं दोन होती. एक म्हणजे, कादंबरीचं नाव ‘माइन काम्फ’ या हिटलरच्या कुख्यात आत्मचरित्राच्या नावावर बेतलं होतं. आत्मचरित्रात्मक कादंबरी आणि आत्मचरित्र यांमध्ये जो फरक अपेक्षित असतो त्याच्याशीच दुसऱ्या कारणाचा थेट संबंध लागतो. वर वर पाहता ‘माय स्ट्रगल’ कादंबरी न वाटता आत्मचरित्रच वाटतं, कारण त्यात स्वत: लेखक, त्याचे निकटवर्तीय आणि नॉर्वेच्या कलावर्तुळातले अनेक प्रख्यात लोक त्यांच्या खऱ्या नावानिशी आहेत. क्नाउसगार्डनं आपल्या वडिलांविषयीचे जे तपशील त्यात उघड केले आहेत, तो पहिल्या खंडातला सर्वात धक्कादायक भाग ठरला. वडिलांशी असलेल्या आपल्या नात्याचा वडिलांच्या मृत्यूनंतर मुलगा आढावा घेतो असं पहिल्या खंडाचं स्वरूप आहे. किंबहुना, क्नाउसगार्डनं कादंबरी लिहायला घेण्यामागचा हेतूच तो होता. त्याआधी त्याच्या नावावर दोन कादंबऱ्या होत्या. त्यांना नॉर्वेमधले काही प्रमुख साहित्यिक पुरस्कारही मिळालेले होते. थोडक्यात, अगोदरपासून क्नाउसगार्ड नॉर्वेतल्या महत्त्वाच्या समकालीन लेखकांपकी एक होता. परंतु आपली प्रतिभा आटली आहे आणि जोवर आपल्या मनावरचं वडिलांचं ओझं आपण फेकून देत नाही तोवर आपण मोकळेपणानं लिहू शकणार नाही, असं त्याला वाटू लागलं.

कडक आणि तापट स्वभावाच्या वडिलांच्या दहशतीखाली क्नाउसगार्डचं बालपण क्लेशदायक गेलं होतं. त्या भयगंडाचा त्याच्यावर खोल मानसिक परिणाम झाला होता. प्रौढपणीही त्याला त्यातून बाहेर पडता येत नव्हतं. वडिलांच्या मृत्यूनंतर एकदाचे आपण सुटलो अशी भावना त्यामुळे त्याच्या मनात आली. तरुणपणी त्याचे वडील देखणे आणि छाकटे होते. अनेक स्त्रिया त्यांच्याकडे आकर्षति होत. नंतरची त्यांची स्थिती तशी राहिली नाही. अखेरच्या काळात वडील त्यांच्या आईसोबत राहात होते. ते दारूच्या पूर्ण आहारी गेले होते. वडील गेल्यानंतर क्नाउसगार्ड जेव्हा त्या घरी गेला तेव्हा घराची स्थिती पाहून त्याला धक्काच बसला. आजी-आजोबांचं सुंदर घर त्याच्या बालपणीच्या निवडक सुखद स्मृतींपकी एक होतं. वडिलांनी त्या घराचा उकिरडा करून ठेवला होता. मृत्यूपूर्वीची त्यांची एकाकी केविलवाणी स्थिती क्नाउसगार्डला तेव्हा जाणवली. तरीही, वडिलांच्या कटू स्मृती आणि त्यांच्याशी निगडित अनेक गोष्टींचं भूत त्यांच्या मृत्यूनंतरही क्नाउसगार्डच्या मानगुटीवरून काही केल्या उतरत नव्हतं. वडिलांच्या धाकात वाढल्यामुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वाला आलेले अनेक कंगोरे प्रौढपणीही कायम होते. ही जाणीव क्नाउसगार्डला पोखरत होती.

या सगळ्याविषयी लिहिण्याचा क्नाउसगार्डनं जेव्हा जेव्हा प्रयत्न केला तेव्हा प्रकाशकांच्या संपादकीय संस्कारातून त्यातले अनेक तपशील अस्थानी किंवा कंटाळवाणे म्हणून गाळले गेले. साहित्यिक लिखाणाविषयीचे समकालीन निकष त्यामुळे त्याला फार जाचक वाटू लागले. आपण लिहितो आहोत त्या काळात साहित्य, चित्रपट, टेलिव्हिजन अशा सर्व माध्यमांतून गोष्टींचा सुकाळ झाला आहे हे त्याला जाणवलं. अगदी पत्रकारितेमध्येसुद्धा ‘स्टोरी’ खरी वाटेल अशी आणि परिणामकारकपणे सांगण्याच्या तंत्रात एक साचलेपणा आलेला आहे. गोष्ट सांगण्याचे सध्याचे सगळे रूढ निकष फेकून देऊन लिहिलं तरच आपण अशा काळात लेखक म्हणून जिवंत राहू शकतो असं त्याला वाटलं. मग त्याच्या लिहिण्याला ओघ आला आणि झपाटलेल्या अवस्थेत त्यानं पहिला खंड (इंग्रजी शीर्षक : ‘अ डेथ इन द फॅमिली’) पूर्ण केला.

मृत वडिलांबद्दलचे आणि हयात आजीबद्दलचे त्यातले तपशील त्रासदायक ठरू शकतील हे लक्षात आल्यावर क्नाउसगार्डनं पुस्तकात उल्लेख असलेल्या निवडक व्यक्तींना ते वाचायला दिलं. त्यातून प्रकरण इतकं तापलं, की वडिलांच्या बाजूच्या काही नातेवाईकांनी न्यायालयीन हस्तक्षेपामार्फत प्रकाशन रोखायचा प्रयत्न केला. वडिलांनी त्याच्या आईलाही पुष्कळ त्रास दिला होता, पण पुस्तकातले अनेक तपशील वगळण्याविषयी आईनंही त्याला विनंती केली. क्नाउसगार्डनं काही तपशील बदलले, पण नातेवाईकांना न जुमानता पुस्तक प्रकाशित केलं. त्यानंतर काही नातेवाईकांनी त्याच्याशी कायमचे संबंध तोडून टाकले.

दुसरा खंड (‘अ मॅन इन लव्ह’) क्नाउसगार्डच्या वैवाहिक जीवनाभोवती फिरतो. त्यामुळे प्रकाशित होण्यापूर्वी हा खंड क्नाउसगार्डनं आपल्या पत्नीला वाचायला दिला. आपल्या सहजीवनाविषयीचे आणि मानसिक आजाराविषयीचे (बायपोलर डिसऑर्डर) पुस्तकातले तपशील वाचून त्याची पत्नी अतिशय व्यथित झाली. तिनं प्रकाशनात कोणतीही आडकाठी मात्र आणली नाही. तिसरा खंड (‘बॉयहूड आयलंड’) कुमारवयातल्या आठवणी सांगतो. चौथ्या खंडात (‘डािन्सग इन द डार्क’) क्नाउसगार्डनं अठराव्या वर्षी एका लहानशा खेडय़ात शाळाशिक्षक म्हणून घालवलेल्या वर्षांविषयी लिहिलं आहे. एका अल्पवयीन विद्याíथनीशी त्या काळात त्याचे शरीरसंबंध होते असं त्याच्या एका मित्राचं म्हणणं होतं. कायद्यानुसार हा लंगिक शोषणाचा आणि बलात्काराचा प्रकार ठरला असता. क्नाउसगार्डनं पुस्तकात दिलेल्या तपशिलानुसार तो त्या मुलीकडे आकर्षति झाला होता; मात्र त्यांच्यात प्रत्यक्ष संबंध प्रस्थापित झाले नाहीत. पाचव्या खंडात (‘सम रेन मस्ट फॉल’) त्याचं पुढचं शिक्षण, नोकरी, मत्रिणी, पहिल्या पत्नीशी ओळख वगरे तपशील आहेत. त्यातल्या एक-दोन मत्रिणींविषयी लिहिताना क्नाउसगार्डनं त्यांची खरी नावं वापरली नाहीत. नॉर्वेसारख्या एका छोटय़ाशा देशातल्या छोटय़ाशा गावात मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्या मत्रिणींच्या परिसरातल्या लोकांना त्या कोण ते कळलंच. त्यातली एक मत्रीण क्नाउसगार्डच्या लिखाणाविषयी म्हणते, ‘‘हे म्हणजे असं म्हणण्यासारखं आहे की मी आधी तुला ठोसा मारतो; मग तुला दुखेल; मग उपचारांसाठी मी तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईन; पण ठोसा मात्र मी मारणारच.’’ आपल्या लिखाणामुळे लोकांना जो त्रास झाला त्याकडे आज मागे वळून पाहताना क्नाउसगार्डला पश्चात्ताप होतो. आज मी कदाचित हे पुस्तक लिहिलंच नसतं असं तो म्हणतो. मात्र, आपल्या मानसिक स्थर्यासाठी त्या लिखाणाची मदत झाली हेदेखील तो कबूल करतो. सहावा खंड २०१७ मध्ये इंग्रजीत प्रकाशित होईल. ‘माइन काम्फ’ हे शीर्षक पुस्तकासाठी योजण्याचं समर्थन म्हणून हिटलरविषयी तब्बल चारशे पानं त्यात आहेत.

वडील, आजी, पत्नी, मत्रिणी अशा आपल्या निकटवर्तीयांविषयीचे खाजगी आणि क्लेशदायक तपशील उघड करण्यामागची क्नाउसगार्डची मानसिकता आणि त्या कृतीची नतिकता याविषयी पुष्कळ प्रश्न उपस्थित करता येऊ शकतील; पुस्तक जसजसं विविध भाषांमध्ये भाषांतरित झालं आणि जगभर लोकप्रिय झालं तसतशा त्याविषयी पुष्कळ चर्चाही झडल्या; मात्र, त्यापुढे जाऊन ‘माय स्ट्रगल’ आत्मचरित्र नसून कादंबरी का आहे, याचा विचार इथे करणं गरजेचं आहे. एक तर, क्नाउसगार्डनं आपल्या आयुष्यातले अनेक खाजगी तपशील पुस्तकात उघड केलेले असले, तरीही पुस्तकाचं ते मुख्य उद्दिष्ट नाही. किंबहुना, एखाद्या गोष्टीच्या तपशिलात जाऊन वर्णन करण्याच्या क्नाउसगार्डच्या शैलीमुळे पुस्तकाला वेगळंच स्वरूप प्राप्त होतं. पुस्तक घटनाप्रधान तर नाहीच; उलट एखाद्या बिनमहत्त्वाच्या गोष्टीचं वर्णन त्यात इतक्या बारकाव्यांनिशी येतं, की त्यामागचा हेतू स्व-समर्थनाचा होता, अशासारखी सुलभ स्पष्टीकरणं त्याला लागू पडत नाहीत. उदा. विद्यार्थीदशेत असताना नववर्षांच्या स्वागतासाठी लेखक मित्रांसोबत एका पार्टीला जायचा असतो. येणाऱ्या प्रत्येकानं आपापल्या पेयपानाची व्यवस्था करावी अशी अपेक्षा असते. वडिलांना संशय येणार नाही अशा रीतीनं क्नाउसगार्ड आणि त्याचे मित्र दारूची व्यवस्था कशी करतात, यावर पुस्तकात तब्बल सत्तर पानं आहेत. त्याउलट आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटनांना क्नाउसगार्ड अनेकदा अगदी थोडक्यात उरकतो. उदा. आपल्या पहिल्या पत्नीपासून विभक्त होण्याचं आणि नॉर्वे सोडून स्वीडनमध्ये स्थायिक होण्याचं क्नाउसगार्डनं एक दिवस ठरवलं. आयुष्यात पुढे काय करणार ते माहीत नसताना, कसल्याही पूर्वनियोजनाशिवाय आणि पत्नीशी विशेष बिनसलेलं नसताना त्यानं हे केलं. तडकाफडकी असा निर्णय घेण्याचं कोणतंही समर्थन किंवा त्यामागची कोणतीही कारणमीमांसा पुस्तकात नाही. सगळं मागे सोडून आपण स्वीडनमध्ये आलो याचा केवळ उल्लेख दुसऱ्या खंडाच्या सुरुवातीला क्नाउसगार्ड करतो आणि मग स्वीडनमध्ये काय घडलं याविषयीचे तपशील त्या खंडात येतात.

हे आत्मचरित्र का म्हणता येणार नाही त्याचं आणखी एक कारण खुद्द क्नाउसगार्डनं पुस्तकातच दिलेलं आहे. आपल्या आयुष्यातला एखादा घटनाक्रम नक्की कसा घडला, तो तसा का घडला किंवा लोक तसे का वागले, घटनेशी संबंधित व्यक्तींच्या मनातले विचार, त्याविषयी नंतर त्यांच्या स्मृतीत शिल्लक राहिलेले तपशील हे सगळं मुळात अतिशय बेभरवशाचं असतं, असं क्नाउसगार्डला वाटतं. त्याच्या निकटवर्तीयांना त्यानं जेव्हा प्रकाशनापूर्वी पुस्तक वाचायला दिलं तेव्हा त्याला त्याचा प्रत्ययही आला. एखाद्या घटनेमागची किंवा लोकांच्या वर्तनामागची त्याला जाणवलेली कारणमीमांसा चुकीची आहे असं त्याला सांगितलं गेलं; इतकंच नव्हे, तर त्यानं जे लिहिलं तसं घडलंच नव्हतं किंवा त्यातले अनेक तपशील चुकीचे आहेत असंही लोक म्हणू लागले. त्याला अगदी स्पष्टपणे आठवत होत्या अशा गोष्टींविषयी जर इतकीही खातरजमा करता येणार नसेल, तर आपण जे लिहिलं आहे तेच सत्य आहे असा दावा करण्याचा आपल्याला अधिकारच नाही असं त्यामुळे क्नाउसगार्ड मानतो. घटनाक्रमातल्या केंद्रवर्ती पात्रालाच जर सत्यासत्यतेविषयी मूलभूत शंका असतील, आणि तसं तो जर पुस्तकातच कबूल करत असेल, तर निवेदकाला बेभरवशाचा मानण्याशिवाय आणि पुस्तकाला कादंबरी म्हणण्याशिवाय वाचकालाही पर्याय राहत नाही. Unreliable narrator हा आधुनिकोत्तर साहित्यातला एक महत्त्वाचा घटकच आहे. क्नाउसगार्डच्या मते आपण कधी भरवशाचे आहोत आणि कधी बेभरवशाचे ते त्याचं त्यालाही सांगता येत नाही. कादंबरी या साहित्यप्रकारात त्यामुळे एक नवं दालन खुलं झालं हे मात्र नक्की.

अभिजीत रणदिवे

rabhijeet@gmail.com

(‘माय स्ट्रगलचं साहित्यिक मूल्य आणि पुस्तकाला एकाच वेळी अद्भुत लोकप्रियता आणि रसिकमान्यता मिळण्यामागची कारणं याविषयीची मांडणी पुढील भागात..)