|| डॉ. मनोज पाथरकर

मुल्क राज आनंद हे इंग्रजीतून साहित्यनिर्मिती करणाऱ्या भारतीयांच्या पहिल्या फळीतील महत्त्वाचे नाव. त्यांच्या एका कादंबरीचे परीक्षण करताना जॉर्ज ऑर्वेल ‘भारतीयांच्या अभिव्यक्तीचे साधन’ म्हणून इंग्रजीच्या वैशिष्टय़पूर्ण स्थानाचा महत्त्वाचा अन्वयार्थ काढतो. १९४० च्या दशकातील हे ऑर्वेलकृत परीक्षण इंग्रजीतील भारतीय अभिव्यक्तीकडे पाहण्याची दृष्टी देणारे ठरेल..

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनच्या शत्रुराष्ट्रांनी अनेक अस्त्रांचा उपयोग केला. मात्र, एक अस्त्र ब्रिटनविरुद्ध वापरणे त्यांना शक्य झाले नाही; ते अस्त्र म्हणजे- इंग्रजी भाषा!

तसे पाहता मोठय़ा प्रमाणावर बोलल्या जाणाऱ्या अनेक भाषा जगात आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय पातळीवर संपर्काचे माध्यम (lingua franca) असल्याचा दावा करू शकणारी दुसरी कोणतीही भाषा नाही. आपसांत संवाद साधण्यासाठी सर्वच राष्ट्रांना इंग्रजी वापरणे आवश्यक ठरते. आणि म्हणूनच इंग्रजीत लिहिले गेलेले भारतीय साहित्य एक नावीन्यपूर्ण घटना, एक सांस्कृतिक नवलाई ठरते. १९४२ साली प्रसिद्ध झालेली मुल्क राज आनंद यांची ‘द स्वॉर्ड अ‍ॅण्ड द सिकल’ ही कादंबरी वाचल्यावर याचा निश्चितच प्रत्यय येतो. एखादा इंग्रज लेखक या कादंबरीचा कर्ता असता तरी तिच्या साहित्यगुणांमुळे ती महत्त्वाची ठरली असतीच. परंतु दोन संस्कृतींच्या परिघावरील तिच्या स्थानामुळे ती जास्तच लक्षणीय ठरते.

या कादंबरीतील मुख्य पात्र आहे फ्रान्समधील युद्धात ओढला गेलेला एक शीख शिपाई. युद्धकैदी म्हणून काही वर्षे जर्मनीत काढावी लागल्यानंतर तो ‘स्व’च्या शोधात मायदेशी परततो. युद्ध अनुभवलेल्या सर्वच सैनिकांच्या वाटय़ाला येणारी असंतोषाची भावना त्याच्याही मनात खदखदते आहे. ज्या अंतिम उद्दिष्टासाठी लढत होतो, त्याचे श्रेय तर दिले गेलेले नाहीच, उलट आपली फसवणूकच झाली असल्याची त्याची भावना आहे. कादंबरीचा बराचसा भाग भारतातील शेतकरी चळवळी आणि कम्युनिस्ट पक्षाचा उदय यांच्याशी संबंधित आहे. माणसाचे अवमूल्यन करणारी उदासवाणी आणि बकाल दृश्ये त्यांत पुन:पुन्हा दिसतात. कादंबरीचा शेवट आशावादी असला, तरी ‘भारताविषयीच्या साहित्यकृती उदासवाण्या असतात’ या नियमाला ती अपवाद ठरत नाही. बहुधा ती तशी असणारच. १९४० च्या दशकात भारतीय लेखकाने (इंग्रजीतून) लिहिलेले भारताविषयीचे पुस्तक अटळपणे एक कैफियत मांडणारेच असणार. त्यामुळे आनंद यांच्या लेखनात वाचकांना ‘कडवटपणा’ दिसला यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. खरे तर, या कादंबरीत तुलनेने कमीच ‘कडवटपणा’ आहे. तो इंग्रज वाचकांना जास्त वाटण्याचे कारण त्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला लागलेली टोचणी! कुठेतरी त्यांना या सत्याची जाणीव होती, की ब्रिटनच्या साम्राज्यवादातून निर्माण झालेल्या शोषणव्यवस्थेचा अंत झाल्याशिवाय भारतातील गरिबीचा प्रश्न सुटणार नाही.

इंग्रज लेखकांनी भारताविषयी लिहिलेल्या साहित्यात काय दिसते? स्ववंशाची निर्भर्त्सना आणि अँग्लो-इंडियन समाजाचे व्यंगचित्र.. उबग आणणारे क्लबमधील जीवन, छोटे पेग आणि इतर बरेच काही. याउलट, आनंद यांच्या शब्दचित्रात ब्रिटिश मंडळी फारशी दिसतच नाहीत. एक ‘आवश्यक दुखणे’ म्हणून पार्श्वभूमी पुरविण्याचे काम तेवढे त्यांच्याकडे आहे.. हवामानासारखे त्यांना कायम गृहीत धरलेले आहे. ब्रिटिश राजवटीतील भारतात हजारामागे एक श्वेतवर्णीय व्यक्ती राहत होती, याची केवळ आठवण करून देण्यासाठी ही पात्रे कथानकात अवतरल्यासारखी वाटतात. त्यांना इतरांपेक्षा वाईट वागणूक मिळते असे नाही, मात्र त्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केल्याचेही दिसत नाही. एकूणच पात्रनिर्मिती कठोर आणि उपहासात्मक दृष्टिकोनातून झालेली आहे. भारतीय पात्रांचे अंतिम उद्दिष्ट आहे ब्रिटिश सत्तेचे जोखड झुगारून देण्याचे. मात्र, यासाठी कार्यरत असलेल्या क्रांतिकारकांच्या आपसांतील वादविवादांत त्याचा विसर पडल्यासारखा वाटतो.

ते काहीही असले तरी, भारतीयांनी लिहिलेले इंग्रजी साहित्य वाचणे हा एक वैशिष्टय़पूर्ण अनुभव असतो. या साहित्यातील वातावरणनिर्मितीत भारतीय विषयवस्तूचा वाटा नेमका किती, ते ठाऊक नाही; परंतु मुल्क राज आनंदसारख्या लेखकांच्या साहित्यकृती वाचताना (आयरिश इंग्रजीप्रमाणे) ‘भारतीय इंग्रजी’ म्हणता येईल अशी एक वेगळी बोली निर्माण होत असल्याचे जाणवते. आनंद यांच्या कादंबरीतील कोणताही उतारा हे दाखवायला पुरेसा आहे. त्यांतील इंग्रजी शब्दांच्या वापरात नेहमीपेक्षा वेगळ्या अर्थच्छटा दिसतात आणि जागोजागी विशिष्ट वळणाचे वाक्प्रचार सापडतात. महत्त्वाचे म्हणजे, इंग्रजी भाषेच्या वापरात एक सहजता जाणवते. एवढेच नव्हे, तर लिहिण्याचे माध्यम म्हणून लेखक इंग्रजीला प्राधान्य देतोय असेही वाटते. या प्राध्यान्यक्रमातूनच ‘भारतीय इंग्रजी साहित्य’ निर्माण झालेले आहे.

ब्रिटिश राजवटीत इंग्रजी ही भारतीयांची कार्यालयीन आणि व्यावसायिक भाषा होती. १९४० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात जवळजवळ पन्नास लाख लोकांना इंग्रजीचे बऱ्यापैकी ज्ञान होते. तर आणखी लाखो तिची संमिश्र, कामचलाऊ आवृत्ती वापरू शकत होते. भारतातील इंग्रजी वृत्तपत्रांचा पसारा वाढता होता. कवितेला वाहिलेल्या भारतातील नियतकालिकाचे संपादक एतद्देशीयच होते. एकूणच भारतीय लोक युरोपियांपेक्षा चांगले इंग्रजी लिहू अथवा बोलू शकत होते. प्रश्न असा आहे की, ही परिस्थिती किती काळ राहणार? भारत आणि ब्रिटन यांच्यातील संबंध स्वातंत्र्योत्तर काळात निश्चितच बदलत जाणार. इंग्रजी शिकण्याची आर्थिक निकड कमी होत गेल्याने कदाचित ही भाषा आशियातूनच काढता पाय घेईल. केवळ व्यावसायिक आणि तांत्रिक कारणांसाठी उपयुक्त असलेली तिची ओंगळ आवृत्ती तेवढी टिकून राहील. ‘साहित्याची भाषा’ म्हणून इंग्रजीचे भारतात काय भवितव्य असेल, हे सांगणे कठीण आहे. सर्वसामान्य इंग्रज कादंबरीकारांच्या तुलनेत आनंद आणि अहमदअली यांच्यासारखे लेखक उजवे ठरत असले, तरी त्यांचा वारसा चालविणारे फार असतील असे वाटत नाही.

साहित्यिक गुणवत्तेपलीकडे या कादंबऱ्यांना एक वेगळे महत्त्व आहे हे लक्षात घेतले पाहिजे. एकीकडे त्या पाश्चात्त्य जगताला आशिया समजावून सांगत आहेत, तर दुसरीकडे त्या भारतीयांना पाश्चात्त्य मूल्यांचा परिचय करून देत आहेत. भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या वाटचालीत हे दुसरे कार्य जास्त महत्त्वाचे ठरते. जागतिक राजकारणाची जाण (आणि प्रचाराचे भान) असणाऱ्या प्रत्येकाला ठाऊक आहे, की जपानच्या दुसऱ्या महायुद्धातील प्रवेशानंतर भारतातील परिस्थिती अचानक बदलली. जवळपास सर्वच भारतीय विचारवंत भावनिकदृष्टय़ा जपानसमर्थक झाले. त्यांच्या दृष्टिकोनातून ब्रिटन हे शत्रुराष्ट्र होते, चीनशी त्यांना काही देणे-घेणे नव्हते आणि रशिया फक्त बोलण्यासाठी चांगला विषय होता. याचा अर्थ असा नाही, की त्यांना चीन जपानच्या अधिपत्याखाली आलेला वा सोव्हिएत रशिया उद्ध्वस्त झालेला किंवा युरोप छळछावणीत रूपांतरित झालेला पाहायचे होते.

भारतातील बुद्धिजीवी वर्गाची भूमिका समजून घेताना एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी- पराभव पचवून जन्माला आलेला राष्ट्रवाद सुडाच्या आहारी जाऊन दूरदृष्टीला तिलांजली देऊ  शकतो. दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा जवळजवळ प्रत्येक भारतीय राष्ट्रवाद्याची भूमिका काहीशी अशी होती- ‘‘मी अर्धा समाजवादी, पण अर्धा राष्ट्रवादी आहे. फॅसिझमचा धोका लक्षात घेता, खरे तर मी ब्रिटिशांच्या बाजूने असायला हवे. पण ब्रिटिश राज्यकर्त्यांचा मला एवढा तिरस्कार वाटतो, की त्यांच्यापासून सुटका होणार असेल तर पुढे काय होते याची मला पर्वा नाही. कधी कधी तर वाटते की, चीन, जपान आणि भारत यांनी एकत्रितपणे पाश्चात्त्य संस्कृतीच संपवून टाकावी, आशियातच नव्हे तर युरोपातदेखील!’’ खरे तर हा दृष्टिकोन वसाहतींमध्ये सर्वदूर पसरलेला होता. त्याची भावनिक मुळे उघड आहेत; मात्र त्यात केवळ ब्रिटनच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी एक धोका दडलेला आहे. हा दृष्टिकोन बाळगणाऱ्या भारतीयाला विसर पडतो, की जगात इतरांवरही वेगवेगळ्या कारणांनी अन्याय झालाय. यांतून स्वत:ची कीव करण्याच्या आणि इतर वंशियांकडे संशयाने पाहण्याच्या प्रवृत्तीला खतपाणी मिळते.

दडपशाहीचे बळी ठरलेल्यांच्या राष्ट्रवादातील नकारात्मक गोष्टींचा मुकाबला करण्याचा एक मार्ग आंतरराष्ट्रीय समाजवादाचा आहे. भारतीयांचा (पर्यायाने समस्त आशियाई जनतेचा) समाजवादी विचार आणि साहित्य यांच्याशी संपर्क बहुधा इंग्रजीतूनच येतो. ज्या प्रमाणात भारतीयांनी पाश्चात्त्य मूल्ये (ऑर्वेलला फ्रान्स व ब्रिटनमधील लोकशाही मूल्ये म्हणायचे आहे) स्वीकारलेली आहेत, त्या प्रमाणात ते खात्रीलायकपणे फॅसिस्टविरोधी आहेत. अशा परिस्थितीत इंग्रजी भाषा एक ‘अस्त्र’ ठरते. कारण भारतीयांना ती फॅसिस्ट जीवनदृष्टीला मारक असलेल्या संकल्पनांचे व्यासपीठ पुरविते. भारतातील जनता ब्रिटिशांच्या अन्यायाची शिकार झाली हे खरेच; परंतु ब्रिटिशांमुळे, विशेषत: इंग्रजी भाषेमुळे त्यांच्यात नव्या जगाबद्दल जागृती निर्माण झाली हेही तितकेच खरे. मुल्क राज आनंद यांना ब्रिटिशांबद्दल फार लोभ आहे असे नाही; त्यांचे काही साथीदार तर कडवे ब्रिटिशविरोधक आहेत. परंतु जोपर्यंत त्यांचा राग इंग्रजीतून व्यक्त होतोय तोपर्यंत त्यांची ब्रिटनशी एक विलक्षण युती राहील.. आणि तोपर्यंत भारत आणि ब्रिटन एकमेकांना समजून घेण्यात यशस्वी होतील अशी आशा ठेवायला जागा आहे.

manojrm074@gmail.com

((( ‘बीबीसी’च्या स्टुडिओत.. (डावीकडून, घडय़ाळकाटय़ाच्या क्रमानुसार) कॅनडाचे साहित्यिक जॉजॅ वूडकॉक, मुल्क राज आनंद, जॉर्ज ऑर्वेल, ब्रिटिश कवी-समीक्षक  विल्यम एम्सन, समीक्षक-तत्त्वज्ञ  हर्बर्ट रीड आणि कवी एडमंड ब्लन्डन