औरंगाबाद : बनावट मृत्यू प्रमाणपत्रे व कागदपत्रे सादर करून भारतीय आयुर्विमा महामंडळच्या (एलआयसी) जनश्री योजनेअंतर्गत ९९ लाख ३० हजार रुपयांच्या मृत्यू दाव्याच्या रकमेचा गैरव्यवहार करून एलआयसीची फसवणूक केल्याप्रकरणात दोन संस्थाचालकांना पोलिसांनी मंगळवारी अटक केली. दोघा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता ३१ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी एम. एस. काकडे यांनी दिले.

अलीखान दौडखान व शंकर लक्ष्मण गायकवाड, अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अलीखान हा हर्सूल भागातील तर शंकर गायकवाड हा जवाहरनगर कॉलनीतील रहिवासी आहे. या प्रकरणात यापूर्वी सुभान शाह व शकील शाह या दोघांना अटक करण्यात आली होती.

प्रकरणात भारतीय आयुर्वमिा महामंडळाचे पेन्शन व समूह विमा विभागातील अधिकारी भीमराव संपतराव सरवदे यांनी तक्रार दिली होती. तक्रारीत वेगवेगळ्या आठ सामाजिक संस्थांचे अध्यक्ष व सचिवांनी ११ जुलै २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१८ या कालावधीत बनावट कागदपत्राआधारे मृताच्या नावे रक्कम उचलल्यानंतर त्याच व्यक्तीला पुन्हा जिवंत दाखवून त्याची पॉलिसी काढत पुन्हा त्याला मृत दाखवून विमा कंपनीला ९९ लाख ३० हजार रुपयांचा गंडा घातला. प्रकरणात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता सहायक सरकारी वकील सूर्यकांत सोनटक्के यांनी आरोपी अलीखान हा साईबाबा सेवाभावी तर शंकर गायकवाड हा स्वराज्य मराठवाडा कामगार संघटनेचा अध्यक्ष असून त्यांच्या संस्थेचे शिक्के, बँक खाते, पासबुक व स्वाक्षरींचे नमुने जप्त करणे आहे. खोटे मृत्यू प्रमाणपत्र दाखल करून आरोपी अली खान याने ८ लाख ८० हजार तर गायकवाड याने १० लाख २० हजार रुपयांचा गंडा विमा कंपनीला घातला आहे.

आरोपींनी दाव्यातील खोटे दस्तऐवज कोठून व कोणी दिले याबाबत तपास करणे आहे तसेच गुन्ह्यतील पसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. न्यायालयाने विनंती मान्य केली.