छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या काळात मराठवाड्यात एप्रिलमध्ये २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. बुधवारी दत्ता काशिनाथ महिपाल-पाटील या २५ वर्षीय शेतकरी तरुणाने आत्महत्या केली. त्याने माजलगाव येथील गोपाळा बँकेकडून एक लाखांचे कर्ज घेतले होते. एका बाजूला आत्महत्यांचा आकडा वाढत असतानाच मराठवाड्यातील पाणीपातळी घसरली असून टँकरची संख्या १७५८ एवढी झाली आहे.
हेही वाचा >>> बीडमध्ये एक कोटींची लाच मागणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकासह तिघांविरोधात तक्रार
बीड जिल्ह्यात जेव्हा जातीय प्रचाराने टोक गाठले होते तेव्हा (एप्रिल महिन्यात) सर्वाधिक ५९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. या जिल्ह्यात सध्या तीव्र पाणीटंचाई आहे. प्रचार काळात कृषी मालाच्या पडलेल्या भावाचा मुद्दाही चर्चेत आला होता. अनेक भागांत शेतकऱ्यांनी उमेदवारांना घसरलेल्या भावावरून प्रश्न विचारले.
दीड वर्षापूर्वी तत्कालीन विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी शेतकरी आत्महत्यांच्या अनुषंगाने तयार केलेल्या अहवालानुसार २०१२ ते २०२२ पर्यंत ८,७१९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली होती. माजलगाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील दत्ता कालिदास महिपाल याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत ‘बँकेकडून तगादा सुरू असल्याने त्रस्त आहे. मोठे कर्ज घेणारे परदेशी पळून जातात आणि छोट्या कर्जदारांना बँक त्रास देते,’’ असे म्हटले आहे.