औरंगाबाद जिल्ह्य़ातील सिल्लोड व फुलंब्रीसह अन्य तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे ९९ गावे बाधीत झाली, तर ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके वाया गेली आहेत. दोनजणांचा मृत्यू झाला असून १२५ घरे पूर्णत: तर १ हजार ४५३ घरे अंशत: बाधीत झाली आहेत. तब्बल ९५० हेक्टर जमीन खरवडून गेली असल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिली. नुकसानीचे सर्वेक्षण अजून सुरू असून, प्राथमिक अंदाजानुसार मोठे नुकसान झाले असल्याचे त्यांनी पत्रकार बैठकीत सांगितले.
औरंगाबाद जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे १६७ कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे, १९ रस्ते आणि १५ पूल वाहून गेले असल्याची माहिती समोर येत असून, सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना या बाबतच्या पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिवृष्टीत दोघांचा मृत्यू झाला असून मोठी १६ जनावरे, तर ११७ लहान जनावरे वाहून गेली. ३८१ हेक्टर फळपिकांचेही नुकसान झाले. या नुकसानभरपाईसाठी पंचनामे केले जात असून निकषानुसार ते दिले जाणार आहे.
दुष्काळी मदतीबाबत सूतोवाच
नजर पैसेवारीनुसार मराठवाडय़ातील जवळपास सर्वच तालुक्यात ३३ टक्क्य़ांपेक्षा अधिक नुकसान झाले. या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना मदत देण्याच्या अनुषंगाने १३ मे च्या निर्णयानुसार कार्यवाही होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने मदतीबाबतचे निकष ठरवून त्यात वाढ केली आहे. हेक्टरी ४ हजार ५०० रुपयांची दिली जाणारी मदत आता ६ हजार ८०० रुपयांपर्यंत वाढविण्यात आली असून आश्वासित जलसिंचन असणाऱ्या जमिनीवरील नुकसानभरपाईस १३ हजार ५०० रुपये हेक्टरी मदत होण्याची शक्यता आहे. मदत वाढविल्याबाबतची माहिती महसूलमंत्री खडसे यांनी दिली. याच निकषानुसार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्याची शक्यता आहे.