धाराशिव: सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चार उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. महायुतीचे डमी उमेदवार शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह तीन अपक्ष उमेदवारांचा यात समावेश आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासात पहिल्यांदा सर्वाधिक ३१ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. यापूर्वी २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत २८ उमेदवार रिंगणात उतरले होते. उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा फटका नेमका कोणाला बसणार? यावर जय-पराजयाचे समीकरण विसंबून असणार असणार आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिलपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली. एकूण ७५ निवडणूक लढवू इच्छीत असलेल्या उमेदवारांनी १७५ अर्जांची खरेदी केली होती.
१९ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज सादर करण्याचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवसापर्यंत ३६ उमेदवारांनी एकूण ५० नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. तर अखेरच्या दिवशी सहा उमेदवारांनी २० अर्ज सादर केले होते. छाननी दरम्यान अपक्ष उमेदवार वर्षा कांबळे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यामुळे छाननीनंतर ३५ उमेदवार शिल्लक राहिले होते. वंचितचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर यांच्या उमेदवारीवर महाविकास आघाडीचे उमेदवार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या प्रतिनिधीमार्फत आक्षेप घेण्यात आला होता. मात्र तो फेटाळून लावण्यात आल्यामुळे छाननीत आंधळकर यांची उमेदवारी कायम राहिली.
हेही वाचा : धाराशिवमध्ये अपक्षा हाती तुतारी, संभ्रम दूर करण्याचे महाविकास आघाडीसमोर आव्हान
सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी महायुतीचे डमी उमेदवार तथा मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्यासह अपक्ष उमेदवार बाळकृष्ण दाजीराम शिंदे, रहिमोद्दीन नईमोद्दीन काझी, अरूण शिवलिंग जाधवर या चार जणांनी यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याने आता ३५ पैकी ३१ उमेदवार आखाड्यात शिल्लक राहिले आहेत. आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच ३१ उमेदवार निवडणुकीला सामोरे जात आहेत. २००९ साली २५ आणि २०१४ साली २८ तर २०१९ साली १५ उमेदवार रणांगणात उतरले होते. २०१४ साली प्रमुख प्रतिस्पर्धी वगळता उर्वरित २५ इतर उमेदवारांमध्ये साधारणपणे एक लाखाहून अधिक मतांची विभागणी झाली. तर २०१९ साली झालेल्या निवडणुकीत वंचितचे अर्जून सलगर आणि इतर अपक्ष १२ उमेदवारांनी मिळून एक लाख ३९ हजार ५०० मतांची विभागणी केली होती. आता उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे मतविभागणीचा फटका कोणाला याची चर्चा जोरदार सुरू आहे.