‘लोकसत्ता ब्लॉगबेंचर्स’चा विजेता अंगद सुतारची प्रतिक्रिया

मी ‘शिक्षणाची त्रेधातिरपीट’ या विषयावर मनोगत व्यक्त केले होते. गावी असताना ग्रंथालयामुळे पुस्तक वाचनाची आवड निर्माण झाली. मामाकडे शिक्षणासाठी असताना घरीच पुस्तकांचे भांडार उपलब्ध करून दिले. त्यामुळे वाचनछंद जोपासायला लागलो. आनंद यादव यांचे ‘झोंबी’ पुस्तक पहिल्यांदा वाचले आणि ग्रामीण गोष्टी, शाळेतले अनुभव स्वत:च्या भाषेत लिहू लागलो. ‘लोकसत्ता’च्या स्पर्धेमुळे लिखाणासाठी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले असून, विजेता ठरल्यामुळे महाविद्यालयातही नवी ओळख प्राप्त झाल्याची भावना ब्लॉग बेंचर्स विजेता उदगीरच्या अन्नतंत्र महाविद्यालयाचा विद्यार्थी अंगद चंद्रकांत सुतार याने व्यक्त केली.

‘ब्लॉग बेंचर्स’ या स्पध्रेची तयारी सुरू केल्यावर प्रत्येक लेखातून नवीन गोष्टींचा पाठपुरावा पुस्तके, वर्तमानपत्रे, सोशल माध्यमे, यातून करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे लिखाणातील, उणीवा दूर होण्यास मदत झाली. शाळेत व महाविद्यालयातील निबंध स्पर्धातील सहभागामुळे पारितोषिकेही मिळाली, मात्र राज्यस्तरावर व्यासपीठ मिळणे अन् त्यात पारितोषिक मिळणे म्हणजे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. माझ्यासारख्या कित्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना लेखन सुधारण्यास या स्पर्धेने हातभार दिला आहे. या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.

आमच्या विद्यार्थ्यांला एक व्यासपीठ प्राप्त झालं आणि या मानाच्या स्पध्रेत त्यास पारितोषिक मिळणे ही आम्हा सर्वासाठी अभिमानाची बाब आहे. ‘लोकसत्ता’ समूहाने सुरू केलेला हा उपक्रम नक्कीच उल्लेखनीय आहे, असे मत प्राचार्य ए. व्ही. मुंडे यांनी व्यक्त केले.