मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलन पेटले आहे. जालन्याच्या अंबडमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज सकाळी अंबडमध्ये मराठा आंदोलकांनी एसटी बस पेटवून दिल्यानंतर तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय सरकारने मराठवाड्यातील बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या तीन जिल्ह्यातील इंटरनेट सेवा खंडीत केली आहे. जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले की, मनोज जरांगे यांनी रविवारी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यानंतर वातावरण चिघळले आहे.

सागर बंगल्यावर निघालेले मनोज जरांगे पुन्हा आंतरवलीत, सगळ्यांना मागे फिरण्याचं आवाहन, “शहाणी भूमिका…”

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात गोळा होण्यास कालपासून सुरुवात झाली आहे. मनोज जरांगे यांनी मुंबईला जाऊ नये, यासाठी आंदोलक उपोषण करणार आहेत. आंदोलक मोठ्या प्रमाणात जमू नयेत यासाठी पोलीस प्रशासनाने तीनही जिल्ह्यांच्या सीमा बंद केल्या आहेत. तसेच धुळे-मुंबई महामार्गावर वाहतूक अडचण होऊ नये, म्हणून वाहतूक इतर ठिकाणी वळवली आहे.

बीड जिल्ह्यात विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच एसटी बसची तोडफोड केल्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली आहे. दुसरीकडे जालन्याच्या अंबड तालुक्यात पुढील आदेश येईपर्यंत कर्फ्यू कायम असणार आहे.

Manoj Jarange on Shinde-Fadnavis: आंतरवली सराटीमध्ये पोहचल्यावर मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा!

मराठा समाजाने शांततेची भूमिका घ्यावी – जरांगे

रविवारी मुंबईला निघालेले मनोज जरांगे आंतरवाली सराटी येथे पुन्हा परतले. त्यांनी मराठा आंदोलकांना आपापल्या गावांमध्ये परतण्याचं आवाहन केलं. आम्हाला कायद्याचं पालन करायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. अंबडमध्ये संचारबंदी लावण्यात आल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मागे फिरण्याचा निर्णय घेतला. शहाणी भूमिका घेऊन परत जातो आहे, असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. मनोज जरांगे यांनी भंबेरी गावातून आंतरवाली सराटीमध्ये परतले आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाने शांत रहावं, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. संचारबंदी लागल्याने आपल्याला मुंबईला जाता आलेलं नाही. राज्यभरातल्या सगळ्या मराठा बांधवांनी शांत राहिलं पाहिजे असं आवाहनही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.