|| सुहास सरदेशमुख

मराठवाडय़ातील पहिल्यांदाच विजयी उमेदवारांचा सवाल :- निवडून आलो, पण आमदार केव्हा होणार, हे मात्र अजूनही गुलदस्त्यात असल्याने नव्याने विधिमंडळात बसण्यास इच्छुक आमदारांची कोंडी झाली आहे. ‘आम्ही काय करणार? परिस्थितीच अशी आली आहे’, असे उस्मानाबाद मतदारसंघातून निवडून आलेले आमदार कैलास पाटील म्हणतात. पाथरीच्या आमदार मेघना बोर्डीकर, वसमतचे आमदार राजू नवघरे, केजच्या आमदार नमिता मुंदडा, बीडचे संदीप क्षीरसागर, धीरज देशमुख ही सारी पहिल्यांदा विधिमंडळ सदस्य म्हणून निवडून आलेली मंडळी आता नव्याच राजकीय कोंडीमध्ये अडकली आहेत.

अतिवृष्टीमुळे शेतकरी हैराण आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी सारे जण गावोगावी दौरा करत आहेत. पण सगळे आमदार म्हणतात, ‘सरकार स्थापन झाले असते तर प्रश्न सोडविण्यासाठी गती मिळाली असती.’ पाथरीच्या आमदार मेघना बोर्डीकर सांगत होत्या, ‘ आम्हाला प्रश्न सोडविण्यासाठी मतदारांनी निवडून दिले आहे. आम्ही प्रश्न समजून घेण्यासाठी मतदारसंघात भेटीगाठी करीत आहोत. पण प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी म्हणावा तसा प्रतिसाद देतीलच याची काही खात्री देता येत नाही. मराठवाडय़ात रिक्त पदांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे वेगळय़ाच अडचणींना सामोरे जावे लागते. पण निवडून आलो तरी विधिमंडळ गठन झाले असते तर अधिक वेगात काम करता आले असते.’

समजा सरकार स्थापन झाले तरी ते किती काळ टिकेल याविषयीही शंका असल्याने नव्याने आमदार झालेली मंडळी मतदारांशी संपर्क कायम ठेवण्यात मग्न आहेत. निवडणुकीचे निकाल लागून आता २५ दिवस झाले आहेत त्यामुळे निवडून आलेले सदस्य आमदार कधी होणार या प्रतीक्षेत कायम आहेत.

भाजपची चलती असल्याचे लक्षात आल्यानंतर काही आमदारांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये उडी घेतली. सत्तेची दारे लवकर उघडी होतील आणि मतदारसंघाचा विकास अधिक वेगात करता येईल, असा दावा अगदी रात्रीतून पक्ष बदलण्यासही काही आमदारांनी मागेपुढे पाहिले नाही. त्यात केजच्या नमिता मुंदडा यांचा समावेश होता. तसेच तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचेही नाव चर्चेत होते. त्यांची तर विचित्र कोंडी झाली असल्याची चर्चा त्यांच्या मतदारसंघात होते आहे. सत्ता स्थापन करण्याच्या चाव्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती असल्याचे राजकीय चित्र निर्माण झाले असल्याने त्यांचा पेच वाढण्याची शक्यता आहे. सध्या शेतीचे प्रश्न अधिक बिकट असल्याने गावोगावी भेटी देण्यावर नवीन विधिमंडळ सदस्यांचा जोर असला तरी निवडून आलो, पण आमदार कधी होणार, असा सवाल प्रत्येकाच्या मनात आहे.