औरंगाबाद : दौलताबादच्या देवगिरी किल्ल्यामधील अंधाऱ्या भागात प्रकाशझोत बसवून वटवाघळांची संख्या कमी करण्यात भारतीय पुरातत्त्व विभागाच्या प्रयोगास यश येत आहे. किल्ल्यातील हा भाग ‘अंधेरी’ म्हणून प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या भागात वटवाघळांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या विष्ठेच्या दर्पाने पर्यटकांना आत जाणे अवघड झाले होते.

या भागातील वटवाघळांची संख्या कमी करण्यासाठी अधिक प्रकाशझोत देणारे दिवे या भागात बसविण्यात आले. त्यामुळे वटवाघळांची संख्या ५० टक्क्यांपर्यंत खाली आली असल्याचे भारतीय पुरातत्त्व विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

दौलताबादचा किल्ला पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने पर्यटक येत असतात. पाणी व्यवस्थापन, तोफा पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना किल्लयातील अंधेरी पाहणे याचे कुतूहल कायम असते. मात्र, या भागात हजारोच्या संख्येने वटवाघळे वास्तव्यास आहेत. त्यामुळे या अंधाऱ्या भागात कमालीची दुर्गंधीही असते. काही वेळ गुदमरल्यासारखेही होते.  प्रकाशात वटवाघळे राहत नाहीत.  त्यामुळे उपाय म्हणून या भागात काही दिवस प्रकाशझोत लावण्यात आले. पण अतिवृष्टीच्या काळात विजेवरील प्रकाशझोत सुरू ठेवण्याला मर्यादा होत्या. वरच्या भागातून होणारा पाझर लक्षात घेता विजेवरील प्रकाशझोत सुरू ठेवल्यास वीज प्रवाह उतरण्याची शक्यता असल्याने पूर्ण वेळ प्रकाशझोत सुरू करणे जोखमीचे ठरले असते. त्यामुळे वीज दिवे बऱ्याचदा बंद करावे लागले. तरी देखील वटवाघळांच्या पूर्वीच्या संख्येत ५० टक्के घट झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संजय रोहनकर म्हणाले, की ६५० मीटरच्या या पट्टयात प्रकाशझोतांची संख्या वाढविण्याचा येत्या काळात प्रयत्न करू. सध्या दुर्गंधी कमी होत असून अधिकाधिक पर्यटक येण्यास त्यामुळे मदत होईल.

महत्त्व काय?

शत्रू सैन्यास या भागात आल्यास काहीच दिसू नये अशी व्यवस्था किल्ल्यात  करण्यात आली होती. ही अंधेरी पाहणे पर्यटकांसाठी मोठा रोमांचकारी अनुभव असतो. पर्यटक या अंधारात जाताना स्वत:ला इतिहासाच्या प्रवासात जात असल्याचा अनुभव घेतो. त्यामुळे या भागात जाण्यासाठी तरुण पर्यटक अधिक उत्सुक असतात.