छत्रपती संभाजीनगर – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) गैरहजर चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यास रुजू करून घेण्यासाठीचा अर्ज मंजूर करून देण्यासाठी पाच हजारांची मागणी करून तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना वरिष्ठ लिपिक बंडू बाबूसिंग पवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री आठपर्यंत सुरू होती.

या प्रकरणात २३ वर्षीय चतुर्थ श्रेणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदवली होती. १७ जानेवारी रोजी तक्रारीची पडताळणी करण्यात आली.  आरोपी बंडू बाबूसिंग पवार (रा. न्यू पहाडसिंगपुरा, सैनिक कॉलनी) याने तक्रारदार चतुर्थ श्रेणी कामगाराकडे चार महिने कर्तव्यावर गैरहजर असल्याच्या संदर्भाने दोन दिवसात रुजू करून घेण्यासाठी १६ जानेवारीला पाच हजार रुपये मागितले. तडजोडीअंती तीन हजार देण्याचे ठरले.  तत्पूर्वी तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक तथा सापळा अधिकारी  अमोल धस यांच्या पथकाने सापळा रचून बंडू पवार याला रंगेहाथ पकडले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The senior clerk of ghati hospital was caught by the anti corruption department team while taking money amy
First published on: 28-02-2024 at 21:13 IST