Hero MotoCorp ने भारतातील दुचाकी विक्रीत नंबर वन होण्याचा मान आता गमावला आहे. गेल्या महिन्यात आता एका दिग्गज कंपनीने बाईक आणि स्कूटरच्या विक्रीत हिरो मोटोकॉर्पला मागे टाकले. Hero MotoCorp ही केवळ देशातीलच नाही तर जगातील सर्वात मोठी दुचाकी विक्री करणारी कंपनी आहे. मात्र, बाईक निर्मितीमध्ये एकेकाळी हिरोची भागीदार असलेली ही कंपनी आज तिला तगडं आव्हानं देत आहे. चला तर जाणून घेऊया कोणत्या कंपनीच्या दुचाकींना ग्राहकांनी एप्रिल २०२४ मध्ये पसंती दर्शविली आहे.

कोणत्या कंपनीने विक्रीच्या बाबतीत एप्रिल २०२४ मध्ये मारली बाजी?

आम्ही येथे Honda Motorcycles and Scooters (HMSI) बद्दल बोलत आहोत, या कंपनीने गेल्या महिन्यात दुचाकींच्या विक्रीत टू-व्हीलर दिग्गज हिरोला मागे टाकले आहे. एप्रिल २०२४ मध्ये, Honda ने ५,४१,९४६ युनिट्सची आतापर्यंतची सर्वाधिक दुचाकी विक्री केली आहे. होंडाने गेल्या वर्षी याच महिन्यात विकल्या गेलेल्या दुचाकी आणि स्कूटरच्या तुलनेत ४५ टक्के अधिक दुचाकी आणि स्कूटर विकल्या. त्याच वेळी, Hero MotoCorp ने एप्रिलमध्ये ५,३३,५८५ दुचाकी विकल्या, ज्यामध्ये कंपनीने ३४.७१ टक्के वार्षिक वाढ नोंदवली.

(हे ही वाचा : मारुती, ह्युंदाईच्या कार नव्हे तर देशातील ‘या’ सर्वात स्वस्त SUV ची तुफान खप, मायलेज २६ किमी, किंमत…)

दुचाकींच्या विक्रीत हिरो मोटोकॉर्प आणि होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडिया यांच्यात बराच काळ खडतर स्पर्धा होती. पण आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या पहिल्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये कंपनीने अखेर हिरोला मागे टाकले. गेल्या महिन्यातील ३० दिवसांत होंडाने ५,४१,९४६ मोटारसायकली आणि स्कूटर विकल्या, जे एका वर्षापूर्वीच्या याच कालावधीच्या तुलनेत ४५ टक्के अधिक आहे. आता देशांतर्गत बाजारपेठेतील विक्री आणि निर्यातीबद्दल बोलायचे झाल्यास, होंडाने गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेत ४,८१,०४६ दुचाकी विकल्या आणि निर्यातीचा आकडा ६०,९०० युनिट्स होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, होंडा दुचाकींच्या देशांतर्गत विक्रीत वर्षभरापूर्वीच्या तुलनेत ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर निर्यातही ६७ टक्क्यांनी वाढली आहे.

‘या’ बाईक आणि स्कूटर्सना मोठी मागणी

हिरो आणि होंडाच्या कोणत्या मोटरसायकल आणि स्कूटर भारतीय बाजारात सर्वाधिक विकल्या जातात, तर या यादीत Hero Splendor आणि Honda Activa यांची नावे सर्वात वर येतात. यानंतर, Honda SP125, Shine Series आणि Hero HF Deluxe यासह इतर बाइक्सची चांगली विक्री होते. या दोन्ही कंपन्यांनी १००cc ते १२५cc पर्यंतच्या चांगल्या मोटारसायकली आणि स्कूटर बजेट किमतीत सादर केल्या आहेत, ज्यांचे मायलेज आणि परफॉर्मन्सही चांगला आहे आणि त्यामुळेच त्यांची बंपर विक्री होते.