उच्च अभिरुची ही फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे हे एव्हाना माझ्या लक्षात आले आहे. साधारणपणे ज्या गोष्टी तुम्हा-आम्हा सामान्य बहुसंख्य लोकांना आवडतात आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला मजा येते त्या गोष्टी म्हणजे हीन अभिरुची. आणि उगा पाचपन्नास जणांना ज्या गोष्टी आवडतात आणि ज्याबद्दल ते शिष्टासारखे तासन् तास बोलू शकतात त्या गोष्टी म्हणजे उच्च अभिरुची. गजरा डोक्यात माळला की उच्च अभिरुची. आणि हाताला गुंडाळला की हीन अभिरुची. गजरा तोच! नाजूकसाजूक तुपातली भावगीते ही उच्च अभिरुची. आणि झणझणीत लावणी ही हीन अभिरुची. भावगीतांच्या कार्यक्रमाला ठेवणीतले कुडते आणि अत्तर लावून जाणाऱ्यांपेक्षा लावणीला जाऊन पागोटे आणि टोप्या उडवणारे संख्येने जास्त आहेत. पण पागोटे उडवणारे हीन आणि कुडते घालून माना डोलवणारे उच्च अभिरुचीचे. हे सगळे आपण नीट समजावून घेतले पाहिजे. आपल्याला शास्त्रीय संगीत कळत नाही, ग्रेसच्या कविता आपल्या डोक्यावरून जातात, जहांगीर आर्ट गॅलरीत गेल्यावर आपण काहीच न कळलेल्या खुळ्यासारखे चित्रांकडे पाहत राहतो. बरं, कोणाला विचारायची चोरी! या उच्च अभिरुचीच्या गोष्टींमध्ये काही कळले नाही तर कोणाला विचारता येत नाही. तुम्हाला जर उच्च अभिरुचीचे व्हायचे असेल तर काही कळो- न कळो उगाचच मान डोलवता आली पाहिजे आणि मधून मधून ‘वा! क्या बात है!’ असे म्हणता आले पाहिजे.

थोडेसे पसे कमावल्यावर मलाही काही काळ असे वाटायला लागले, की आता बास झाले.. आपणही आता उच्च अभिरुचीचे व्हायला पाहिजे. मी माझ्या एका मित्राच्या लग्नात समरसून नागीन डान्स केला होता तेव्हा माझे उच्च अभिरुचीचे मित्र मला फारच घालूनपाडून बोलले होते. मी माझ्या प्रतिष्ठेच्या फारच खालचे वर्तन करतोय असा त्यांचा आक्षेप होता. आता रस्त्यावर वरातीत नागीन डान्स करणे आणि बाजूला नाचणाऱ्याला फणा मारण्याचा अभिनय करणे यात अप्रतिष्ठितपणाचे काय आहे? मला सगळ्यांनीच हे लक्षात आणून दिले, की आतापर्यंत जे संगीत, नृत्य, कपडे किंवा चित्रपट मला आवडायचे, ते अजूनही मला आवडत असले तरी ते मला आता शोभून दिसणार नाही. उच्च अभिरुचीचे व्हायचे असेल तर ज्या ज्या गोष्टी मला आवडायच्या, त्यांचा त्याग करावा लागेल आणि दुसऱ्या अनेक गोष्टी- ज्या मला कळतही नाहीत, आवडतही नाहीत, त्यांचा स्वीकार करावा लागेल.

What Supriya Sule Said?
“जो तुम्हाला धमक्या देतो आहे, त्याला..”, सुप्रिया सुळे भाषणात नेमकं काय म्हणाल्या?
Career MPSC exam Guidance UPSC job
करिअर मंत्र
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
priya bapat says she will not do fairness cream endorsement
“मी लोकांना का म्हणू की तुम्ही गोरे व्हा,” फेअरनेस क्रीमबद्दल प्रिया बापटचं स्पष्ट मत; शरीरयष्टीबाबत म्हणाली….

मी असे पाहिले होते, की शास्त्रीय संगीत आणि शास्त्रीय नृत्य आवडणारे लोक काही मोठय़ा व्यक्तींचा उल्लेख करताना कानाच्या पाळीला हात लावतात आणि डोळे थोडेसे मिटतात. एकदा माझ्या सर्व उच्च अभिरुचीच्या मित्र-मत्रिणींमध्ये बोलत असताना मीही कानाच्या पाळीला हात लावला, डोळे थोडेसे मिटले आणि डेव्हिड धवनजींचा उल्लेख केला तर माझे सर्व मित्र-मत्रिणी पिसाळले. त्यांचे महाराज, बुवा, ताई आदी बदके असलेल्या तळ्यात डेव्हिड धवनरूपी कुरूप, वेडे पिल्लू अजिबात शोभून दिसत नाही याची जळजळीत जाणीव मला करून देण्यात आली. आणि मग दुखावला जाऊन उच्च अभिरुचीचे होण्याचा नादच मी सोडून दिला. आता डेव्हिड धवन आणि गोिवदा या जोडीविषयी मला अपार आदर आहे. त्यांनी बनवलेले चित्रपट बघताना मला बरगडय़ा दुखेपर्यंत हसायला येते. एका कुठल्यातरी चित्रपटात गोविंदा त्याच्या मामाचा सोन्याचा दात कडकी आली म्हणून उपटतो आणि विकतो. ही कल्पना मला मानवी प्रतिभेच्या काही थोडय़ा विराट आविष्कारांपकी एक वाटत आली आहे. जी गोष्ट गोिवदाच्या चित्रपटांची, तीच गोष्ट दक्षिणेकडच्या चित्रपटांची. मला दक्षिणेकडचे चित्रपटही बघायला खूप आवडतात.

मी एक दाक्षिणात्य चित्रपट पहिला होता; ज्यात एक पोलीस इन्स्पेक्टर रस्त्यावर कोणीतरी पोरीची छेड काढली म्हणून त्याच्यावर चिडतो आणि शिक्षा म्हणून त्याच्या जीपमधून हातोडा आणतो आणि त्या गुंडाच्या डोक्यात त्या हातोडय़ाने खिळा मारतो व त्याला मारून टाकतो. यावर लोक जोरदार टाळ्या वाजवतात. मग तो पोलीस इन्स्पेक्टर युनिफॉर्ममध्ये खूश होतो आणि हीरॉइनला जवळ घेतो आणि चार पोलीस जीप घेऊन तिच्याभोवती घिरटय़ा घालतो. मी हेही पाहिले आहे, की दक्षिणेकडचा एक नायक अंतिम सूड म्हणून व्हिलनला चालत्या हेलिकॉप्टरच्या पंख्याखाली उचलतो आणि त्याचे मुंडके एकदा आणि शरीर दोनदा सटासट कापतो. हल्ली कोणत्या तरी वाहिनीवर दक्षिणेकडचा कोणता तरी चित्रपट वारंवार दाखवतात- ज्यात एका सज्जन माणसाचे हृदयाचे ऑपरेशन सुरू असते. तो नक्की मरणार असाच प्रसंग. एक दुर्जन बेदरकार गाडी चालवत हॉस्पिटलसमोरून चाललेला असतो. त्याचा मोठा अपघात होतो आणि त्या अपघातात त्याच्या शरीरातील हृदय उडते आणि थेट ऑपरेशन टेबलवर जाऊन पडते आणि धकधक धडकत राहते. डॉक्टर आकाशाकडे हात करून देवाचे आभार मानतो. जोरजोरात ढोल वाजायला लागतात. डॉक्टर भल्या माणसाच्या शरीरातून केळीचे साल काढावे तसे जुने हृदय काढतो आणि नवीन टेबलवर फडफडणारे ताजे हृदय पेशंटला लावतो. अन् कट टू.. होळीचे गाणे सुरू होते. भला माणूस, डॉक्टर आणि २००-३०० स्त्रिया भांग पिऊन नाचायला लागतात. आता मला सांगा, यात हीन अभिरुचीचे काय आहे?

मी जेव्हा उच्च अभिरुचीचा बनायचा प्रयत्न करत होतो तेव्हाच सत्याच्या जवळ जाणारे, वास्तववादी चित्रपटही बघायला लागलो होतो. सगळ्या कुठल्यातरी दरिद्री, नियतीच्या फेऱ्यात अडकलेल्या माणसांच्या कथा. आता जे सत्य किंवा वास्तव चारही बाजूंना उघडय़ा डोळ्यांना दिसत असते, तेच पुन्हा कॅमेऱ्याच्या डोळ्याने का पाहायचे? वास्तवाची जाणीव करून द्यायला वास्तवच पुरेसे आहे. त्याला कथा कशाला हवी? वास्तवाने पिचलेल्या माणसाला वास्तवाच्या दाहकतेतून बाहेर यायला कल्पना आणि त्यातली रम्यता हवी असते. ‘माधुरी दीक्षित मिली रस्ते में, चने खाये हमने सस्ते में, उसने कहा तेरे संग शादी रचाऊ, घर तेरे आ के मैं पराठे पकाऊ..’ असे एक जुने लोकप्रिय गाणे आहे. तुझी भाडय़ाची दीड खोल्यांची जागा.. त्यात तुम्ही सहाजण राहता.. पगार उशिरा झाला तर नाक्यावरचा पटेल किराणा द्यायला कटकट करतो.. हे वास्तव माहीत असताना तो स्वप्न पाहतो की- माधुरी येऊन आपल्याला पराठे बनवून देईल.. आणि काही काळ त्याच्या धगधगीत वास्तवावर कल्पनेच्या पाकळ्या उडतात. ज्याचे जे वास्तव असते त्याच्या विपरीत काहीतरी बघायला त्यांना आवडते. गोरगरीब, दारिद्रय़ाने पिचलेले, नियतीने तुडवलेले लोक हे जर आपल्या वाटय़ाला येत असतील तर आपल्याला करमणूक म्हणून परत त्यांनाच बघायला आवडणार नाही. मध्यमवर्गीय माणसांच्या आयुष्यात हे दारिद्रय़, ही हताशा कधी येतच नाही. त्यामुळे वास्तवाच्या नावाखाली हे विद्रूप वास्तव बघून त्यांची करमणूक होत असावी. आणि म्हणूनच उच्च अभिरुचीचे लोक जगात कमी असावेत. बाकीचे सगळे माझ्यासारखे हीन अभिरुचीचे.. ज्यांना घोडय़ावरून रुबाबात येऊन तलवारीने हीरॉइनची हनुवटी उचलणारा नायकच आवडतो. या माणसांना कल्पनेत रमायला खूप आवडते. ही मंडळी ऑपरेशन थिएटरच्या टेबलवर थडथडणारे हृदय, हेलिकॉप्टरच्या पंखाने उडवलेले मुंडके किंवा पोलीस जीप घेऊन हीरॉइनभोवती घिरटय़ा घालणारा नायक हे सारे खूप एन्जॉय करतात. मात्र, बरेच लोक हे हीन अभिरुचीचे आहे म्हणून या चित्रपटांचा आणि ते पाहणाऱ्यांचा उपहास करतात. ‘गल्लाभरू’ हा शब्द सर्रास त्यासाठी वापरला जातो. सर्वच धर्मातल्या पुराणकथा जरा आठवा. कोणी आठ हातांचा, कोणी सिंहावर बसलेला, कोणाला शंभर मुले, तर कोणी गाडीभर अन्नाचे सेवन करणारा, कोणी गायल्यामुळे पाऊस पडतो, तर कोणी पापी लोकांना तापत्या तेलात तळून काढतो. पाप-पुण्याच्या कितीतरी कल्पना या अतिशयोक्तीचा उपयोग करून घेत कथांमध्ये गुंफून सांगण्याची सर्वच धर्मामध्ये परंपरा आहे. सगळ्या धर्मातल्या पुराणकथा या कल्पनांमध्ये गुंफलेल्या आहेत. आणि त्यांना करमणूक मूल्य होते म्हणूनच त्या शतकानुशतके टिकून राहिल्यात. मग कोणी धर्माना हीन अभिरुचीचे किंवा ‘गल्लाभरू’ का म्हणत नाहीत?

मंदार भारदे mandarbharde@gmail.com