News Flash

हिरवा तास

‘‘अरे विराज, ओंकार, इथे हा काय पानांचा पसारा करून ठेवलाय तुम्ही?’’ सोसायटीतील पाण्याची टाकी म्हणजे आजोबा-आजींनी टेकायची आणि छोटय़ांनी खेळायची जागा.

| June 21, 2015 12:17 pm

‘‘अरे विराज, ओंकार, इथे हा काय पानांचा पसारा करून ठेवलाय तुम्ही?’’ सोसायटीतील पाण्याची टाकी म्हणजे आजोबा-आजींनी टेकायची आणि छोटय़ांनी खेळायची जागा.
bal08‘‘अगं आजी, रतीने सांगितलंय- वेगवेगळी पानं गोळा करा म्हणून!’’ विराजने खुलासा केला.
‘‘आजी, अगं तासभरंच पाऊस पडला, पण पानं किती स्वच्छ अंघोळ केल्यासारखी दिसतायत. पुन्हा पुन्हा बघत रहावंसं वाटतंय. आता आम्ही एक गंमत करणार आहोत.’’ रतीने पुढे येत जाहीर केलं.
‘‘पण त्याचा आणि पानं तोडण्याचा काय संबंध?’’ आजीने कळून न कळल्याचा आव आणला.
‘‘आमचं पानांचं प्रदर्शन आहे ना,’’ अद्वयनं गंमत फोडून टाकली.
‘‘कल्पना चांगली आहे, पण त्या पानाच्या शेजारी झाडाचे नाव लिहा बरं का,’’ आजीनं हळूच अभ्यासाचं पान उलगडलं.
‘‘ए, आम्हाला नावं माहीत नाहीत हं,’’ बोटांत चित्रकला असल्यामुळे पानांच्या आकारात रमलेल्या गौरांगीनं पटकन कबुली दिली.
‘‘आपण असं करू या का? तुम्ही आपल्या सोसायटीतल्या झाडांची पानं तोडलीत ना, मग आपण जरा चक्कर मारून त्यांची ओळख करून घ्यायची का? म्हणजे कागदावर पानाचं चित्र आणि त्याचं नाव असं लिहून तो कागद पानाच्या बाजूला तुम्हाला ठेवता येईल. हा अधिक महिना आहे नं, मग पानांविषयी अधिक माहिती करून घेऊ या का. चालेल?’’
‘होऽ होऽ’ करत सगळे एका पायावर तयार झाले.
‘‘आपण सोसायटीच्या गेटपासून सुरुवात करू या,’’ अद्वयनं सुचवलं.
‘‘ही गेटातली दोन उंच झाडं. बुंधा बघा कसा बाटलीच्या पोटासारखा आहे. मध्ये फांद्या नाहीत. बाटलीला बूच असतं ना तिथूनच फक्त मोठी पानं उगवतात. ‘रॉयल पाम’. नावाप्रमाणे ‘रॉयल’ आहे की नाही? अगदी द्वारपालासारखे दोघे दोन बाजूला उभे आहेत.’’
‘‘कोण उंच उडी मारून पानं काढणार याची?’’ रती गमतीनं म्हणाली. लगेच विराज, ओंकार, आराध्य यांच्या झाडाच्या शेंडय़ाकडे बघत उडय़ा चालू झाल्या.
‘‘हा पिवळ्या फुलांचा वृक्ष कोणता गं? सतत पिवळ्या फुलांचा आणि पानांचा सडा खाली पडत असतो,’’ गौरांगी पिवळी फुलं निरखत म्हणाली.
‘‘हा पेल्टाफोरम किंवा सोनमोहर. याला नंतर चॉकलेटी रंगाच्या शेंगा लागतात. रस्त्याच्या कडेला भरपूर झाडे असतात असली.’’ इति आजी.
‘‘या वृक्षाला तर बघ सगळीकडे अंगावर रंगीत फळं चिकटलेली आहेत आणि पायाखालीपण कितीतरी आहेत. थोडा वासही येतोय ना,’’ रतीने निरीक्षण नोंदवलं.
‘‘हा तर उंबर. एरवी कसं फुलानंतर फळ येतं, याच्या बाबतीत फुलं फळातच लपलेली असतात. त्यामुळे ती दिसत नाहीत. म्हणून एखादी न दिसणारी दुर्मीळ गोष्ट अचानक दिसली की ‘उंबराचं फूल दिसलं’ असं आपण म्हणतो. आपल्या घराच्या मुख्य दाराशी उंबरठा असतो ना, तो या झाडाच्या लाकडाचा असायचा पूर्वी.’’
‘‘ओंकार नेहमी या उंबरठय़ात धडपडतो,’’ अद्वयनं चुगली केली.
‘‘हे बकुळीचं फूल मला माहीत आहे. त्याचे गजरे विकायला असतात कोपऱ्यावर. पण ही पांढरी फुलं कसली आहेत? टाकीवर पडलेली असतात नेहमी.’’ गौरांगीनं शंका विचारली.
‘‘ही बुचाची फुलं आहेत. वास किती छान आहे बघ. हे झाड कसं उंच उंच जातं. आकाशनीम किंवा गगनजाई अशी अर्थपूर्ण नावंही आहेत याची. याच्या सालापासून बाटलीची बुचं तयार केली जायची. म्हणून हे बुचाचं झाड. या झाडावर टेकलाय ना तो मधुमालतीचा वेल. याचे पांढरे, गुलाबी, लालसर अशा मिश्र फुलांचे गुच्छ किती छान दिसतात नं? चला अंगठय़ा करा नि बोटात अडकवा.’’
‘‘ही झाडं आपली नाहीत, पण..’’ विराजचं बरोबर लक्ष होतं.
‘‘हे आपले शेजारी आहेत. त्यांची फुलं आपल्या अंगणात पडतात. त्याच्या शेजारी हे मोठय़ा पानांचं बदामाचं झाड आहे. याची काही पानं बघ कशी पसरट आहेत. हिरवे बदाम दिसतायत का बघा?’’
‘‘आजी, पुढची झाडं कशी उंच माणसांसारखी वाटतात ना! सगळीकडे कशी भिंतीलगत रांगेत असतात,’’ अद्वयनं परेड करून दाखवली.
‘‘हे आसुपल वृक्ष. याच्या पानांच्या कडा बघा कशा लहरीसारख्या असतात. आंब्याची पाने म्हणून कोणीही फसवू शकतात. पुढच्या वृक्षाची ओळख तुम्हाला गुढीपाडव्याला होते. हे करवती काठांचं पान खाऊन बघा जरा!’’
सगळ्यांनी पटकन पानं तोंडात टाकली आणि मग सगळ्यांची तोंडं बघण्यासारखी झाली.
‘‘हा औषधी कडुनिंब बरं का. आपल्या छोटूला ‘चांदोमामा चांदोमामा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का’ हे गाणं आवडतं ना, त्या गाण्यातला हा वृक्ष.’’
‘‘या तगर, डबल तगरीच्या चांदण्या, लाल फुलांची जास्वंद आणि आता मी लावलेला प्राजक्त. याला रोज वरून खिडकीतून मी पाणी घालते.’’ गौरांगीनं कौतुकानं पाहत माहिती दिली.
‘‘हे छडय़ांचं झाड कोणतं गं?’’ विराजला ‘छडी लागे छम छम’ बरोबर दिसली.
‘‘ए, हे शेवग्याच्या शेंगांचं झाड आहे. आमटीतली शेंग, लॉलीपॉपसारखी चोखतोस ना!’’ ओंकारने तोंडात बोट घालून मस्त चोखून दाखवलं.
‘‘फणस आणि जांभूळ तुमचे अगदी जानी दोस्त आहेत. हा चाफा काय फुललाय बघ. पानं सगळी गळून पडली आहेत. पौराणिक काळापासूनचा हा कदंब. बाहेरून डोकावतोय. पावसाळ्याच्या आधी याला असंख्य पिवळे चेंडू लटकत असतात. त्याच्याजवळचा अनंत, सोनटक्का.. सुवासच यांची ओळख करून देतो. अनंताचं फूल तसं घोटीव, पाकळ्या न पडणारं, सोनटक्का मात्र नाजूक.’’ आजीने विश्लेषण करून सांगितलं.
‘‘आजी, हे कर्दळीचं झाड माझ्या ओळखीचं आहे. तू गणपतीत मोदक उकडण्यासाठी पानं तोडून आणायला सांगतेस ना! गुलबक्षी, अबोली, तेरडा यांचे रंग किती छान असतात. तुळशीची तर कित्ती रोपं उगवली आहेत ना!’’ रतीला सांगितल्याशिवाय राहवेना.
‘‘जेवताना पानांभोवती महिरप मांडतो ना तशी ही आपल्या घराभोवतीची हिरवी महिरप,’’ इति आजी.
‘‘बापरे, किती छान वेळ गेला. हा हिरवा तासच झाला. आता खूपशी पानं ओळखता येतील. प्रदर्शन मांडायला जातोच आणि सगळ्यांची नावंपण लिहितो. तू ये हं बघायला,’’ म्हणत सगळे टाकीकडे धावले.

सुचित्रा साठे – lokrang@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2015 12:17 pm

Web Title: green lecture
Next Stories
1 बुक पॉप
2 डोकॅलिटी
3 वनस्पतींचे स्वसंरक्षण
Just Now!
X