|| मोहन गद्रे

रविवार होता. चिन्मयकडे घरी आज सगळेच घरी होते. सकाळचा नाश्ता म्हणून आज ब्रेड सँडविच करायचे सर्वानुमते ठरल्यावर आईने चिन्मयला दुकानातून सँडविचसाठी ब्रेड आणण्यासाठी दुकानात पाठविले. चिन्मय उडय़ा मारत गेला आणि दुकानातून ब्रेड घेऊन आला.

आईने ब्रेडचे पाकीट उघडताना सवयीप्रमाणे त्यावर असलेल्या नोंदी वाचल्या. त्यावर ब्रेड तयार केल्याचा दिनांक पाहताच तिला कळले की याची वापरायची तारीख होऊन गेली आहे. लहान मुलगा पाहून दुकानदाराने चिन्मयच्या हाती हा ब्रेड दिला असणार, हे तिने ओळखले आणि चिन्मयबरोबर त्याच्या ताईला तो ब्रेड बदलून आणण्यासाठी परत दुकानात पाठवले. ताईने दुकानदाराला त्याबद्दल विचारणा करताच त्याने माफी मागून दुसरा ताजा ब्रेड दिला.

या सगळ्या गडबडीत नाश्ता करण्यासाठी उशीर झाला होता म्हणून आई चिन्मयला म्हणाली, ‘‘आता आधी मी सर्वाना गरम गरम ग्रील सँडविच करून खायला देते. आणि चिन्मय तुला, यापुढे दुकानातून कुठलाही खाण्याचा जिन्नस आणताना किंवा इतर वस्तू खरेदी करताना काय खबरदारी घ्यावी याबद्दल सविस्तर सांगते.

चिन्मयबरोबर सगळ्यांनी गरमागरम ग्रील सँडविच खाल्ले. नंतर आईने चिन्मयला जवळ घेतले आणि त्याला दुकानात गेल्यावर एखादी वेष्टनात बंद वस्तू खरेदी करताना काय काळजी घ्यावी, कुठल्या गोष्टीची खातरजमा करून वस्तू विकत घ्यायची याची व्यवस्थित माहिती दिली. ज्या वस्तू वेष्टनात बंद करून विकायला ठेवलेल्या असतात त्यावर ती वस्तू तयार केल्याचा दिनांक, त्या वस्तूचे वजन, त्या वस्तूची विक्रीची किंमत, ज्या कंपनीने ती वस्तू बनवलेली असेल त्या कंपनीचे नाव, पत्ता, काही वस्तू हाताळताना किंवा वापरताना घ्यावयाची विशेष काळजी घेण्यासंबधी सूचना.. आणि खाद्य वस्तू असल्यास ती किती तारखेपर्यंत खाण्यायोग्य असेल यासंबंधी स्पष्ट उल्लेख असणे; शिवाय ती शाकाहारी आहे की मांसाहारी पदार्थापासून बनवलेली आहे यासंबंधी लाल किंवा हिरव्या रंगाची विशिष्ट, गोल आकाराची खूण असणे कायद्याने बंधनकारक आहे. शिवाय अशा पाकीटबंद खाद्यपदार्थावर असे तिरक्या अक्षरात लिहिलेले आहे की नाही हेदेखील तपासून पाहिले पाहिजे. ही खूण खाद्यपदार्थ खाण्यायोग्य आहे याची निशाणी असते. ग्राहकांच्या हितासाठी असा कायदा करण्यात आला आहे. हे झाले इतर वस्तू आणि खाण्याचे जिन्नस विकत घेताना घेण्याच्या काळजीसंबंधी. औषधे खरेदी करताना आणि ती वापरताना यासबंधी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. मग आईने घरातील इतर वेष्टनात बंद असलेल्या खाण्याच्या वस्तू आणि औषधे यांच्या वेष्टनावरच्या त्या सर्व नोंदी कशा आणि कशा- कशाच्या आहेत ते चिन्मयला नीट समजावून सांगितले आणि त्याचे महत्त्वदेखील समजावून दिले.

बाबा म्हणाले, ‘‘अरे चिन्मय, पूर्वी घरातील मोठी माणसे वस्तूंची खरेदी करत असत आणि घरी आणून देत असत. पण आता तुम्ही शाळकरी मुलेदेखील ग्राहक झाला आहात. आता मुलेदेखील कधीतरी दुकानात जाऊन काही वस्तूंची खरेदी करू लागली आहेत. त्यामुळे एक ग्राहक म्हणून बाजारात खरेदी करायला गेल्यावर इतर वस्तू म्हणा, खाण्याचे पदार्थ म्हणा किंवा औषधे म्हणा.. खरेदी करताना काही गोष्टींची खातरजमा करून घेतली पाहिजे. ग्राहकहित जपण्यासाठी सरकारने यासाठी काही नियम आणि कायदे केले आहेत. ते काय आहेत, यासंबंधी मोठय़ा माणसांबरोबरच लहान मुलांनी नीट माहिती करून घेतली पाहिजे. यापुढे हे लक्षात ठेव आणि तुझ्या मित्रांनाही हे नीट सर्व समजून सांग. कारण ते आपल्या सर्वाच्या हिताचे आहे. म्हणजे कोणीही विक्रेता ग्राहकाची फसवणूक करणार नाही आणि योग्य ती वस्तू योग्य त्या किमतीत आणि योग्य त्या वजनाची आपल्याला मिळेल.

दुसऱ्या दिवशी आई आणि चिन्मय एका दुकानात गेले होते. आई सांगेल ती वस्तू चिन्मय घेऊन त्यावरील सर्व तपशील निरखून घेत होता, आईला दाखवत होता आणि पिशवीत ठेवत होता. त्याचे पाहून दुकानात आलेली इतर मुलेही त्याच्यासारखेच आई-बाबांना दाखवून वस्तू घेत होती. कारण आता मोठी माणसेच नाही तर लहान मुलेही जागरूक ग्राहक होऊन खरेदी करत होती आणि यापुढे करणार होती.

gadrekaka@gmail.com