23 January 2018

News Flash

जीवचित्र : चपळ प्राण्यांची शांत शांत चित्रं!

स्मरणचित्रात कुत्रा, मांजर असं काहीही काढण्याची आपण बुवा रिस्कच घेत नाही.

श्रीनिवास आगवणे | Updated: June 18, 2017 2:38 AM

आपण वर्गात चित्र काढताना नेहमीच सोपे आकार निवडतो. म्हणजे डोक्याला फार ताप नको बॉस! मराठीतला ‘चार’ आकडा काढला की झाला पक्षी. दोन त्रिकोण काढले की झाला डोंगर. सर्व कसं एकदम सोप्पं!

स्मरणचित्रात कुत्रा, मांजर असं काहीही काढण्याची आपण बुवा रिस्कच घेत नाही. चार एकसारखी माणसं काढून त्यात भरपूर रंग वापरून काळ्या स्केचपेनची आऊटलाइन दिली की झालं. त्यात चित्रांच्या विषयाबद्दल

फार अभ्यास करत नाही. म्हणजे आमचे शिक्षकही असं काही चित्रांचा अभ्यास वगैरे करायला सांगत नाहीत. त्यामुळे फळ्यावर किंवा पुस्तकात काढलेली चित्रं सरसकट ढापतो व मस्त ग्रेड मिळवतो.

पण मित्रांनो, काही चित्रं सोपी असली तरी चित्रपद्धती मात्र खूप कठीण असतात. कसं ते पाहू या. चीनमध्ये होणारी ही चित्रं पाहून आपल्याला त्यातील सर्व प्राणी ओळखता आलेच. त्यात त्या-त्या प्राण्यांचे रंग नव्हते तरीही आपल्याला हे जलचर ओळखता आले. आणि  इतकंच नाही तर त्या प्राण्यांची हालचाल देखील आपल्याला कागदावर दिसल्याचा भास झाला असावा. कारण या प्राण्यांची चपळतादेखील चित्रात उतरली आहे. म्हणजे इथे वर्तमानपत्रातील छोटी चित्रं बघून इतकं वाटणार नाही, पण ‘चायनीज इंक ब्रश पेंटिंग’ असं गुगललं की एकेक चित्र मनाला प्रसन्न व शांत करत जाईल.

हे झेंन- चिनी चित्रकार वेगळ्या पद्धतीने चित्रं काढतात. म्हणजे आपल्याला मासा काढायचा तर आपण काय करू? ..तर माशाचा फोटो घेऊ, त्याचा आकार पेन्सिलने काढू, मग विविध रंग भरू, रंगीत शेडिंग करू, इत्यादी! हे चित्रकार असं काहीही न करता फिशटॅन्कमधील माशाला पाहतील एक दिवस, दोन दिवस, सहा दिवस.. त्याचे निरीक्षण करतील. सर्व बाजूने बराच वेळ न थकता, न कंटाळता. त्याचं शेपूट कसं हलतं, तोंडाची, कल्लय़ांची उघडझाप कशी होते, वळताना कुठल्या भागातील खवले चमकतात. तो खाताना किती वेगात वर धावतो.. डुलकी घेताना कसा स्थिर होतो.. असं सर्व मनात साठवतात व घरी येऊन पेन्सिल न वापरता सरळ साध्या इंक व ब्रशने कागदावर पटकन ‘मासा’ काढून मोकळे होतात. आणि अशी सुंदर चित्रं आपल्याला पाहायला मिळतात.

ही चित्रं दिसायला सोपी वाटत असली तरी त्यामागे खूप कष्ट आहेत. एकाग्र व शांतपणे निरीक्षण करण्याचे कष्ट. अशा प्रकारे चित्र काढायला आपल्याला कधीच न शिकवल्याने हे अजिबात जमणार नाही. फार तर आपण आहे ती चित्रं कॉपी करू शकू किंवा यू-टय़ूबवरून ट्राय करू. पण नव्याने वेगळा प्राणी घेऊन चित्र काढणं महामुश्कील! कारण आपल्याला मुळी वेळच नसतो. परत बघून काढायची इतकी सवय, की मित्रा, अशा पद्धतीने आपण साधी मुंगीही काढू शकत नाही, असा या चीनमधील जलचरांचा दावा आहे.

काय मग दोस्तहो- करताय प्रयत्न?

shreeniwas@chitrapatang.in

First Published on June 18, 2017 2:38 am

Web Title: nimble animals photo
  1. No Comments.