Can Pistachio Boost Sexual Vitality: “दिवसातून फक्त एकदा मूठभर पिस्ते खाल्ल्याने केसाची वाढ वेगाने होते, लैंगिक शक्ती सुधारू शकतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा बूस्ट होते”. असा दावा करणारी एक पोस्ट आम्हाला nutrionalhealth.us या पेजवर शेअर केल्याचे पाहायला मिळाले. पिस्ता हा सुक्यामेव्यातील एक आरोग्यदायी प्रकार आहे हे खरं असलं तर त्याचे फायदे लैंगिक शक्तीसहीत वर नमूद केलेल्या प्रकारे प्राप्त होऊ शकतात का हे आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत.
आहारतज्ज्ञ इंशारा महेदवी, मदरहूड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे यांनी इंडियन एक्सस्प्रेसला दिलेल्या माहितीनुसार, पिस्ता खाल्ल्याने आरोग्याला फायदा होतो, जसे की, यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते. झिंक, व्हिटॅमिन ई, अँटिऑक्सिडंट्स, प्रथिने, फायबर, हेल्दी फॅट्स यासारख्या आवश्यक पोषक सत्वांचा शरीराला पुरवठा होतो. तर यालाच जोडून फिटनेस तज्ज्ञ तरुणदीप सिंग रेखी यांनी सांगितले की, पिस्ता हा प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे त्यात जवळजवळ ४० टक्के प्रथिने असतात. याशिवाय पिस्त्यातील व्हिटॅमिन ई केस व त्वचा निरोगी राखण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात.
पिस्ते लैंगिक आरोग्यासाठी चांगले आहेत का?
महेदवी यांनी शेअर केले की, पिस्त्यामध्ये पुरुषांमधील प्रजनन क्षमता आणि लैंगिक आरोग्याला चालना देणारे शक्तिशाली कामोत्तेजक गुणधर्म असतात. “विविध अभ्यासांनी हे सिद्ध केले आहे की, दररोज मूठभर पिस्ता खाल्ल्याने लैंगिक शक्ती आणि कामवासना सुधारते. शिवाय, त्यामध्ये फायटोएस्ट्रोजेन देखील असते जे इस्ट्रोजेन पातळी आणि लैंगिक इच्छा वाढवण्यासाठी ओळखले जाते. पिस्त्यामधील काही गुणधर्म लैंगिक शक्ती सुधारण्यासाठी सर्वोत्तम ठरतात. परंतु हे लक्षात घेणे देखील महत्त्वाचे आहे की लैंगिक शक्तीवर पिस्ताचा प्रभाव व्यक्तीपरत्वे बदलू शकतो. रेखी यांच्या म्हणण्यानुसार, “पिस्त्यातील प्रथिने, एल-आर्जिनिनसह, आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला बूस्ट करतात व आपल्या लैंगिक अवयवांमध्ये रक्त प्रवाह वाढवतात”.
हे ही वाचा<< २४ तास कॅलरीज बर्न होतील, आराम करतानाही! फक्त दिवसातून ‘या’ ५ हालचाली करा! डॉ. मेहतांनी सांगितला फंडा
पिस्ता आपले प्रश्न सोडवू शकतो का?
फायदे नाकारले नसले तरी पिस्ता खाताना सावधिगिरी बाळगणे आवश्यक आहे. फक्त चर्चांवर विश्वास ठेवू नका. एखाद्यासाठी एखादी गोष्ट काम करते तर ती इतरांसाठीही उत्तमच असेल असे नाही. तुम्हाला सर्वोत्तम परिणाम हवे असतील तर तुमच्या आरोग्य स्थितीसह परिचित असलेल्या तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या. कोणताही उपाय करताना अतिरेक करू नका. दररोज केवळ १ औंस म्हणजे मूठभर पिस्ता खाणे हे आदर्श प्रमाण आहे.