मृणाल तुळपुळे – wmrinaltul@hotmail.com

स्ट्रॉबेरीच्या मळ्यात खूप गवत उगवलं होतं. त्या गवतात पाठीवर विविध रंगांचे ठिपके असलेला लाल किडा राहत असे. त्या किडय़ाला आपल्या रूपाचा अतिशय गर्व होता. तो दिसायला सुंदर असला तरी त्याचा स्वभाव मात्र अगदी वाईट होता. तो कायम दुसऱ्यांना घालूनपाडून बोलायचा.

एकदा तो किडा गवताच्या पात्यावर  बसला असताना समोरून एक मुंगळा आला. तो किडय़ाला म्हणाला, ‘‘मित्रा, काय करतोयस?’’

ते ऐकून किडा चिडला आणि मुंगळ्याला म्हणाला, ‘‘तू असा काळाकुट्ट आणि मी इतका सुंदर. आपण मित्र होऊच शकत नाही. मला ‘मित्रा’ असं म्हणू नकोस.’’ बिचाऱ्या मुंगळ्याचा चेहरा पडला आणि त्याला त्याच्या काळ्या रंगाचं खूप वाईट वाटलं.

वेलीवरच्या स्ट्रॉबेरीला रंगीबेरंगी किडा दिसल्यावर तिने त्याला हाक मारली आणि म्हणाली, ‘‘अरे, आपण दोघे किती एकसारखे दिसतो!’’ ते ऐकून किडा अगदी छद्मीपणे हसून स्ट्रॉबेरीला म्हणाला, ‘‘आपण दिसायला सारखे असू; पण मी तुझ्यापेक्षा खूप नशीबवान आहे. आता उद्या-परवा तुला कोणीतरी तोडेल आणि खाऊन टाकेल. मी मात्र त्यावेळी या मळ्यात खेळत असेन.’’ किडय़ाचे हे बोलणे ऐकून स्ट्रॉबेरीला रडू फुटले.

शेजारच्या वेलीवर एक सुंदर फुलपाखरू बसले होते. त्याने किडय़ाचे मुंगळा आणि स्ट्रॉबेरीशी झालेले बोलणे ऐकले. ते ऐकून फुलपाखरू किडय़ावर खूप चिडले आणि त्याने त्या गर्वष्ठि किडय़ाची खोड मोडायची ठरवली.

फुलपाखरू किडय़ाजवळ आले आणि त्याला म्हणाले, ‘‘अरे, तू किती सुंदर दिसतोस. तुझ्या अंगावरचे रंगीबेरंगी ठिपके तर तुला फारच शोभून दिसतात.’’ इतक्या सुंदर फुलपाखराने आपली स्तुती केलेली ऐकून किडा खूश झाला. त्याने हसून फुलपाखराचे आभार मानले.

मात्र किडय़ाचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. फुलपाखरू त्याला त्याच्याच भाषेत म्हणाले, ‘‘तू सुंदर असून उपयोग काय? तुला माझ्यासारखे उडता कुठे येते?’’ फुलपाखराने आपले पंख उघडले व ते तिथून उडून दुसऱ्या वेलीवर जाऊन बसले. आपले पंख पसरून उडताना फुलपाखरू जास्तच सुंदर दिसत होते.

फुलपाखराला उडताना बघून आणि त्याचे बोलणे ऐकून किडय़ाचा चेहरा पडला. त्याला आपण करत असलेली चूक समजली. तो मनातून खूप खजील झाला. फुलपाखराने किडय़ाला त्याच्याचसारखे बोलून चांगला धडा शिकवला होता.

किडा तसाच परत फिरला आणि त्याने स्ट्रॉबेरी, डेझीची फुले आणि मुंगळ्याकडे जाऊन त्यांची माफी मागितली. त्यांनीही मोठय़ा मनाने किडय़ाला माफ केले. आणि तेव्हापासून काळा मुंगळा, मळ्यातल्या स्ट्रॉबेरी, फुलपाखरू आणि रंगीबेरंगी किडय़ाची छान दोस्ती झाली.