मागच्या लेखांकांमध्ये आपण काही प्रश्नांचा विचार केला होता. तुम्ही जर त्यांची उत्तरं व्यवस्थित आणि प्रामाणिकपणे शोधली असतील, तर तुमच्या नक्कीच लक्षात आलं असेल, की तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता? पाहून लक्षात ठेवणाऱ्यांच्या, ऐकून लक्षात ठेवणाऱ्यांच्या की करता करता लक्षात ठेवणाऱ्यांच्या. यावरून तुम्ही एक करू शकता बरं का, तुम्ही शोधू शकता की तुम्ही कोणत्या प्रकारे अभ्यास करू शकता. ते म्हणजे पाहून, ऐकून की करून. अर्थात त्यासाठी आई-बाबांची मदत घ्याच.
आमचे काही मित्र असेही आहेत की ते दोन प्रकारेही अभ्यास करू शकतात आणि फारच थोडे असे आहेत की ते तिन्ही प्रकारात हुशार आहेत, पण ते विरळाच. तर आज आपण ज्यांच्या पाहिलेलं जास्त चांगलं लक्षात राहतं ते कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी काय करू शकतील याचा विचार करू. साधं उत्तर आहे, की जास्तीत जास्त पाहत राहा. वर्गात शिक्षक काय बोलतायत याबरोबरच त्यांच्या चेहेऱ्यावरचे हावभावही पाहा. शिक्षक फळ्यावर लिहितील तेव्हा ते काय लिहितात आणि कसं लिहितात त्याकडे लक्षपूर्वक पाहा. पुस्तक वाचताना आकृत्या, नकाशे, सांकेतिक शब्द, चिन्हे यांवर लक्ष द्या, शाळेत लावलेले तक्ते वाचत राहाच आणि घरीही अभ्यासाच्या जागेच्या आसपास तक्ते तयार करून लावा, जेणेकरून ते सतत तुमच्यासमोर राहतील. वाचताना थोडक्यात नोट्स काढा. या नोट्समध्ये विविध रंगांची स्केचपेन्स अगर पेन्सिल्सचा वापर करा. पुस्तकातही महत्त्वाचे मुद्दे हायलायटर किंवा कलर पेन्सचा वापर करून ठळक करा. वर्गात काय शिकवलं ते आठवताना किंवा प्रश्नाचं उत्तर आठवताना डोळ्यासमोर चित्र उभं करण्याचा प्रयत्न करा. आणि इतर काय म्हणतील हा विचारच नको, तुमचा हा स्वभावच आहे, त्यामुळे तुम्हाला ते सोप्पं वाटणारच. काय मग करून पाहताय ना?
joshimeghana.23@gmail.com