फारुक एस. काझी
‘‘बायना, म्या निगते गं शेरडं घेऊन. तू आज तेवडं ज्वारीचं दळान गिरनीत टाक जाता जाता.’’ आजीचं बोलणं ऐकून साक्षी गाल फुगवून जवळ आली.
‘‘आजे, मला दी की एक हजार रुपे. सहलीला जायचं हाय.’’
‘‘हे बग साक्षे, एकदा सांगितलेलं शाण्या लेकरावनी ऐकावं. सारकं सारकं रडल्यावर लय शानं म्हणत न्हाईत.’’ आई चिडली.
‘‘आगं ल्हान हाय आजून ती. पाचवीत मजी लय मुटी नव्हं. आन् साक्षे, आवंदा कळ काड म्हणलं की. पैका न्हाय आत्ता. असल्यावर न्हाय म्हनलू असतू का तुला?’’ आजीनं समजावून सांगितलं तरीही साक्षी काही ऐकेना.
‘‘आता थोबाड बंद करती का दिव कानाखाली!’’ आईचा पारा चढला तशी साक्षी तिथून सटकली. तिच्या शाळेची सहल जाणार होती. हजार रुपये फी. घरात एवढे पैसे नव्हते, पण साक्षी ते समजून घ्यायला तयार नव्हती.
‘‘बायना, जरा शांतीनं समजावून सांगावं. पोरगी ल्हान हाय. आपल्या नशिबाचं भोग हाइत. त्यात त्या लेकराचा काय दोश?’’ आजीनं डोळय़ाला पदर लावला. आई डोळय़ातलं पाणी लपवत तडक बाहेर पडली. कामावर जायला उशीर होत होता. साक्षी अंगण पार करून घरामागच्या पारावर जाऊन बसली. कडुलिंबाचं मोठं झाड होतं. पिवळी पानं आणि काही छोटी छोटी फुलं खाली पडली होती. एक पान चंद्रासारखं दिसत होतं आणि आसपास पडलेली फुलं ताऱ्यांसारखी. कसलं भारी!!
तिला वाटलं, हेच जर खरेखुरे तारे असते आणि चंद्र असता तर किती मजा आली असती. पण? आपल्याकडं तर साधे एक हजार रुपये नाहीत. चंद्र आणि तारे कुठून आणायचे? इतक्यात तिथं एक चिमणी आली. पारावर पडलेले दाणे टिपू लागली.
‘‘तुजं बरंय. ना शाळा, ना सहल. ना पैसा लागतो, ना आजून काय. आमचं तसं न्हाय. आबा दोन वरसापूर्वी कोरोनात गेला आणि आमचं हाल सुरू झालं. आय आन् आजी लय कष्ट करत्यात. पन माज्या सगळय़ा मैत्रिनी सहलीला जानार. मग मीपन नको जायाला?’’
चिमणी दाणे खाऊन उडून गेली.
साक्षी हताश होऊन तशीच बसून राहिली. दुपार हळूहळू पाय पसरू लागली होती. आजी एकटीच शेळय़ा घेऊन गेलेली. साक्षी उठली आणि रानाकडे निघाली. जाताना तिच्या डोक्यात सहल आणि सहलीतली मज्जाच घोळत होती.
आपण गरीब आहोत म्हणून आपल्याला सहलीला जाता येत नाही, हे आता तिला पक्कं ठाऊक झालं होतं. तिने जुनी विहीर पार केली आणि ती मोकळय़ा गायरानात आली. शेळय़ा गवताचा तुकडान् तुकडा खरडून खात होत्या. आजी लिंबाच्या झाडाखाली टेकली होती.
साक्षी तिथं गेली आणि तिनं आजीच्या मांडीवर डोकं ठेवलं. आजीला मांडीवर गरम गरम पाण्याचे थेंब पडल्यासारखं वाटलं.
‘‘बाय, रडती व्हय गं? शाणी बाय हाय तू माजी. आवंदा पैका न्हाय. आसता तर न्हाय म्हणलू नसतो. तू एकलीच तर हाइस. एकादं शेरडू इकलं असतं, पन दर न्हाय. लय नुकसानी हुईल. पुडल्या वरसाला तुला सहलीला पाटवनार मंजी पाटवनार.’’ आजी साक्षीच्या केसांतून हात फिरवत बोलली.
पण साक्षी रडतच होती.
‘‘उट, अशी समोर बस.’’ आजीनं तिला उठवून बसवलं.
‘‘बाय, तुजा बा कोरोनात गेला. ना कुनी मदत किली, ना कुनी चारायला आलं. तुजी माय लय वाघाच्या काळजाची हाय. तिनं सगळं सांबाळून नेलं. आजपन सगळं घर तीच बगती. दवाखान्याचं पैसं अजून फिटलं न्हाईत. हळूहळू फिटतेल. तवर कळ काडायची. पण तू जरा समजून घे बाय.’’ आजीनं डोळय़ाला पदर लावला.
‘‘त्या काळय़ा मातीत ते लिंबाचं पान बगितलं का?’’ आजीनं डोळे पुसत बोटानं दाखवलं.
‘‘व्हय. आपल्या घरामागं पन दिसलं. चंद्रावनी दिसतंय आणि फुलं ताऱ्यावनी.’’
‘‘बराबर. हाटूमुटूचा चंद्र हाय. मंजी खोटा खोटा. पन आजचा चंद्र उद्याचा खराखुरा चंद्र होनार. आपून आपली चिकाटी न्हाय सोडायची. आगं देव परीक्षा बगतू. आनी आपून पास झालू की बक्षिशी पन देतू. आपून जराशिक कळ काडायची. सगळं मिळतं. तवा मनात कायबी नगं आणू. गरिबी आज हाय. उद्या हटल. पन मनातला हाटूमुटूचा चंद्र कधी हरवू नगं.’’
साक्षी आजीकडं बघत बसली. कुठून शिकून येते आजी हे सगळं? आई बोलतेपण रागात. ती तर काय करणार बिचारी. सगळय़ा घराची जबाबदारी तिच्यावर आलेली. आपणपण कुठं शहाण्यासारखं वागतोय? साक्षी पुन्हा आजीच्या मांडीवर झोपली.
‘‘आजे, माज्या मनातला हाटूमुटूचा चंद्र मंजी तू आनी माजी आय. मग मला खरा चंद्र मिळू आगर ना मिळू. न्हाय जायाचं मला सहलीला. पुडल्या वारसी जमलं तर पाटवा. न्हाय जमलं तरीबी काय हरकत न्हाय.’’ आजीनं तिच्या डोक्यावरून हात फिरवला. गालावरून हात फिरवला.
‘‘उट, चल जिवून घिऊ. भूक लागली आसल ना?’’ आजीनं साक्षीला उठवलं.
‘‘व्हय.’’
हात धुऊन दोघी जेवायला बसल्या. सावलीत गप्पा रंगात आल्या होत्या.
आजीनं सांगितलेला किस्सा ऐकून साक्षीच्या चेहऱ्यावर हाटूमुटूचा चंद्र फुलला होता. हाच तो चंद्र असला पाहिजे जो आजी कधी हरवू नको म्हणत होती.
farukskazi82@gmail.com