भर दुपारची वेळ. घरात खेळून खेळून कंटाळा आला म्हणून तीन वर्षांचा ओम असाच घराबाहेरच्या ओटय़ावर उभा राहून आसपासची गंमत पाहत होता. एक आठवडा झाला शाळेला सुट्टी लागून.. पण उन्हामुळे खूप कंटाळा येऊ लागला होता.

उन्हाळ्यातली भर दुपार.. फारसं कोणी बाहेर दिसत नव्हतं. दूर रस्त्यावरून एखादी पुसट आकृती चालताना दिसे. हिंदी-मराठी विविध मालिकांची मधूनच ऐकू येणारी शीर्षकगीते कित्येकदा घोळका करून गप्पाटप्पा मारणाऱ्या काकू-मावशी-ताई यावेळेस घरात का बंदिस्त झाल्या आहेत याची वार्ता देत होते. त्या पिवळ्याधम्म कडक उन्हात वाळत ठेवलेले पापड मधेच येणाऱ्या गरम वाऱ्याच्या झुळकीबरोबर फडफडत होते. असे सर्व चित्र आजूबाजूला असताना त्याचे विशेष लक्ष वेधले गेले ते त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रोहितदादाकडे. बराच वेळ ओमला दुरून उमगलेच नाही, की हा नक्की काय करतो आहे. त्याने दादाला जोरात हाक मारली, ‘‘रोहितदादा, एवढय़ा उन्हात तू काय बरं करत आहेस तिथे?’’

Poppy Seeds Benefits
Poppy Seeds: उन्हाळ्यात दुधात चिमुटभर खसखस टाकून नक्की प्या; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे
remedies beauty tips for dry lips
उन्हाळ्यात ओठ कोरडे पडलेत? या ‘४’ टिप्सने उन्हाळ्यात ओठ ठेवा कूल आणि मुलायम!
water tank cooling tips
Jugaad Video: उन्हाळ्यात नळातून पाणी गरम येतंय? ‘हा’ सोपा जुगाड करुन पाहा; कडक उन्हात टाकीतील पाणी राहील थंड
coconut oil and aloe vera for beautiful and glowing skin Benefits
उन्हाळ्यात चेहरा कायम चिपचिपा, घामट दिसतो? खोबऱ्याचं तेल अन् कोरफडीचं मिश्रण वाढवेल सौंदर्य

काहीतरी उचापती करणारा रोहितदादा ओमच्या आवाजाने सावध झाला. त्याने इकडे तिकडे पाहिले. ओमला पाहताच तो म्हणाला, ‘‘अरे ओम, तू आहेस का? मला वाटलं दुसरंच कोणी आलं की काय. एक मज्जा करतो आहे. तुला पाहायची आहे का गंमत? ये, तू पण ये. ये ये, लवकर ये.’’

झाले. ओमला हेच हवे होते. नाहीतर इतर वेळी ही मोठी मंडळी या लहानग्यांना अजिबात भाव देत नाहीत. काहीतरी गंमत आहे म्हटलं आणि त्याची उत्सुकता आणखी वाढली. तो होकार मिळताच लगेच धावतच रोहितदादाजवळ जाऊन उभा राहिला.

आपल्या दोन्ही गुडघ्यांवर हातांचे पंजे ठेवून किंचित वाकून ओमने पाहिलं तर रोहितदादाचा एक नवा खोडकरपणा सुरू होता, एका मुक्या प्राण्याला उगीचच त्रास देण्याचा!

रोहितच्या आईने मोठय़ा परातीमध्ये रवा उन्हात ठेवला होता. त्यात चुकून भेसळ होऊन मिसळल्या गेलेल्या साखरेसाठी एक मुंगी सारखी तिथे ये-जा करत होती. प्रत्येक वेळी ती यायची, परातीची ती उंच भिंत पार करून त्या रव्याच्या राज्यात शिरायची आणि तेथे असलेला साखरेचा शुभ्र चमकदार घनाकार इवल्याशा डोक्यावर घेऊन पुन्हा ती भिंत पार करून तिच्या घरी जायची. असा तिचा कार्यक्रम बराच वेळ सुरू होता. आणि या तिच्या सुरळीत सुरू असलेल्या कार्यक्रमात विघ्न आणण्याचं काम हा रोहितदादा करत होता. तिच्या रस्त्यात मधेच काडी ठेवून काही अडथळा निर्माण करी. पण मुंगीसुद्धा काही कमी नव्हती. परातीची तीन इंचांची भिंत ओलांडणारी ती त्या बारीकशा काडीची उंची अगदी सहज पार करून जाई. पण त्यातही तिची फार धडपड होत होती. ते पाहून ओम कळवळला. ‘‘रोहितदादा, तू का त्या मुंगीबाईला त्रास देतो आहेस असा?’’

‘‘त्रास? ओम हीच तर गंमत आहे. आता मज्जा बघ तू,’’ असे म्हणत रोहितदादाने तिच्या मार्गात आपले एक बोट ठेवले. हा अचानक आलेला मोठा अडथळा पाहून मुंगीबाई थोडीशी बावरली. पण तिने तोही सर करण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य! तिने तोही पार केला. ओमने तर टाळ्याच वाजवायला सुरुवात केली. पण रोहितदादाने मात्र पुढे आणखी एक मोठी भिंत निर्माण केली. यावेळी ती एक बोटाची नसून दोन बोटांची भिंत होती. पुन्हा तेच.. मुंगीने तीही पार केली. पण सारखे सारखे असे होऊ  लागले तेव्हा मात्र एक कडकडून चावा घेऊन क्षणभरासाठी स्वत:चा मार्ग मोकळा करून घेण्यात मुंगीला यश आले. रोहितदादा जोरात किंचाळला. ओम तर घाबरून दोन-चार पावले मागेच गेला.

‘‘दादा, चल घरी जाऊ आपण. ती चावली ना तुला? मी तरी सांगत होतो तुला- नको त्रास देऊस, नको त्रास देऊस. पण तू.. तू ऐकलेच नाहीस माझे. मिळाली की नाही शिक्षा?’’

ओमच्या या अशा बोलांवर दादा अजूनच चिडला आणि यावर काही न बोलता धावत जाऊन कुठून तरी पाणी आणले आणि दिले ओतून त्या रस्त्यात. बिच्चारी मुंगी.. फारसे पोहता येत नाही म्हणून तिथेच थांबून गेली. तसा रोहितदादा एकदम मोठय़ा आनंदाने चीत्कारला, ‘‘आत्ता कसे? मला चावतेस काय? आता बघच तू. आणि ए ओम, तू पण बघ रे, मी कसे तिला थांबवले. आता काय करणार तुझी मुंगीबाई?’’

ओम पुन्हा दोन पावले पुढे येऊन पाहू लागला तर मुंगीबाई ठाम दिसत होती, की काही झाले तरी लक्ष्य मात्र मिळवायचेच. त्या पाण्याच्या ओघळातून निर्माण झालेल्या तळ्याभोवती काठाकाठाने चांगल्या दोन फेऱ्या मारल्या तिने. थोडा वेळ तशीच थांबली. खूप वेळ झाला तसे एका बाजूला पाण्याचा प्रभाव कमी जाणवला किंवा उन्हात त्यातले थोडे पाणी उडून गेले आणि मुंगीला तिचा टीचभर मार्ग मिळाला. लगेच ती त्या चक्रव्यूहातून आत शिरली. या दादाने पुढे परातीच्या पायाशी मोठा ओबडधोबड दगड आणून ठेवला. पण मुंगीने न हरता, न वैतागता तोही कसाबसा पार केला आणि शेवटी आपल्या लक्ष्यापाशी येऊन थांबली. तिच्या प्रत्येक यशावर ओमच्या जबरदस्त टाळ्या असत आणि रोहितदादाची वाढत जाणारी चिडचिड. असे बराच वेळ चालले. शेवटी दादाच कंटाळला.

‘‘अशी काय ही मुंगी? मी किती त्रास देतो आहे तरी अजिबात हरत नाही. जाऊ  दे मला वेळ नाही हिच्या मागे लागायला आता. माझे मित्र वाट पाहत असतील. ओम, तू बस रे तुझ्या मुंगीबाईला बघत. सोडले बघ मी तिला. तुला हेच हवे होते ना? पुन्हा कधी हिच्या वाटेल जाणार नाही. उगाच वेळ जातो आणि कितीदा चावली ही मला. आऽऽई गं, मेलो मी आज,’’ असे म्हणत रोहितदादाने ओमला बाय केले आणि तिथून त्याच्या मित्रांकडे खेळायला निघून गेला. तो पुन्हा त्या मुंगीच्या वाटेला गेला नाही. ओम मात्र त्यानंतरही बराच वेळ त्या मुंगीला पाहत तिथेच थांबून होता.

‘‘पाहिलंस ओम, काय झाले ते? आणि नुसते पाहायचेच नाही तर यावरून खूप शिकायलाही मिळेल बरे का!’’ आईचा अचानक आलेला आवाज कानांवर पडला आणि ओम सावध झाला. ओमने मागे वळून पाहिले खरे, पण त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक चिन्ह अजून तसेच होते. ते पाहून आई त्याला जवळ घेऊन सांगू लागली..

‘‘बघ बाळा, आधी परिश्रम घेतले, एक निश्चय मनाशी बांधला आणि त्या निश्चयाशी कायम राहून कितीही अडथळे आले तरी सातत्याने प्रयत्न करत राहण्याची मुंगीची जिद्द शेवटी तिच्या कामी आली की नाही! आता तूच सांग, धैर्याने ती खंबीर उभी राहून आपले काम करत राहिली आणि शेवटी सर्वच खूप सुकर झाले ना? किती अडथळे आले त्या मुंगीच्या कार्यात एक साखरेचा दाणा वेचण्यासाठी? पण हे करताना ध्येय जरी एकच असले तरी ते पूर्ण करण्यासाठी अवलंबलेले मार्ग मात्र सर्व प्रकारे वापरले होते. एक मार्ग बंद झाला म्हणून ती हरून मुळुमुळु रडत बसली नाही. तसे झाले असते तर तुझा रोहितदादा खूश झाला असता आपल्या जीतवर आणि असेच करत राहणे हा त्याचा छंदच बनला असता. पण आता बघ, मुंगीने आपल्या युक्तीने आणि शक्तीने हा अडथळा कायमचा दूर केला. नवा मार्ग शोधून त्या मार्गावर ती पुढे चालत राहिली आणि त्यासाठी अजिबात कंटाळा नव्हता.’’

ही छोटीशी घटना किती काही शिकवून जाते. आयुष्यात निश्चय अगदी ठाम असावा. तो डगमगणारा नक्कीच नसावा. पण तो पूर्ण करण्यासाठी स्वीकारलेल्या मार्गावर जरी अडथळे आले, तरी वैतागून न जाता नवा मार्ग शोधून त्यावर चालत राहून ध्येय गाठावे. असे कितीतरी रोहितदादा मार्गा-मार्गावर तुम्हाला भेटतील, पण त्यांनी निर्माण केलेल्या अडथळ्यांमुळे हरून रडत बसण्यापेक्षा या संकटांना जिद्दीने आणि युक्तीने सामोरे जा.

थोडक्यात काय, तर निश्चयावर ठाम असावे, मात्र त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी स्वीकारलेला मार्ग मात्र नेहमी परिवर्तनशील असावा.’’

– रूपाली ठोंबरे

rupali.d21@gmail.com