पाण्याच्या समस्येने लातूर शहराचे नाव आता देशाच्या नकाशावर आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाच लाखांच्या वर लोकसंख्या असलेल्या या शहरातील लोक अक्षरश: पाण्यासाठी सतत पायपीट करताना दिसतात. त्यांना पाणी जपून वापरण्याचे महत्त्व आता कोणी सांगण्याची गरज नाही. काटकसरीचे सर्व उपाय योजले जाताहेत. दुसरीकडे अजूनही पाणी विकत घेण्याची आर्थिक ताकद असल्यामुळे धनाढय़तेतून जलाढय़तेची आढय़ता निर्माण झालेला वर्ग आहे. अशा स्थितीत अतिशय सुमार आर्थिक उत्पन्न असलेल्या एका घरात मात्र पक्षी, प्राणी, जनावरे यांच्यावर मन:पूर्वक प्रेम केलं जातंय. अन्न, पाणी व त्याची देखभाल करण्यात अख्खं कुटुंबच रंगलंय.
घरात एखाद् दुसरा प्राणी हौसेखातर पाळणं एक वेळ ठीक. मात्र, आपलं अवघं घरच पक्ष्यांना खुलं करून देणारा कोणी असेल यावर विश्वास बसणं कठीणच. लातूरच्या सिद्धेश्वर मंदिराच्या पाठीमागे, मळवटी रस्त्यावरच्या एका घरात जेमतेम सातवीपर्यंत शिकलेल्या मेहबूब इसाक सय्यद (वय ५२) यांचं कुटुंब गेल्या ३० वर्षांपासून यात रममाण झालंय. सुमारे १६०० चौरस फुटांची जागा. त्यात सिमेंटचे पत्रे टाकून छप्पर बनवलेल्या चार खोल्या. अन् ६०० चौरस फुटांची मोकळी जागा. घराच्या समोरच्या बाजूला संरक्षणासाठी उभ्या फळ्या ठोकलेल्या. लाकडी दरवाजा. दाराच्या दोन्ही बाजूला पक्षी-प्राण्यांत सहज पाणी पिता यावे अशी रचना असलेले, सतत पाण्याने भरलेले चार सिमेंटचे हौद आणि घराच्या भिंतींवर, जागा मिळेल तेथे लटकणाऱ्या झाडाझुडपांच्या कुंडय़ा. एखाद्या नर्सरीत दिसावं तर वरकरणी दिसणारं हे दृश्य. दाराच्या समोरच पत्र्याच्या छताला अडकवलेल्या पाण्याच्या टांगत्या कुंडय़ा. पक्ष्यांना खाता येईल असं प्लास्टिकच्या ताटात ठेवलेलं तयार अन्न आणि चिमण्यांना सहजपणे गहू-तांदळाचे दाणे टिपता यावेत यासाठी मुद्दाम तयार केलेल्या बर्ड फीडर बाटल्या. घराचा कानाकोपरा पक्ष्यांच्या किलबिलाटाने गुंजणारा. इकडून तिकडे भराऱ्या मारत लपंडाव खेळणाऱ्या चिमण्या, कलकलाट करणारे राघू, एखादी शीळ मारत मालकाच्या खांद्यावर अलगद बसणारा लडिवाळ बुलबुल, कपडे वाळत घालायच्या दांडीवर रांगेत बसून जोरजोरात गप्पा मारणाऱ्या साळुंक्या, आपल्या लालचुटुक तोंडातील जीभ बाहेर काढून किलकिल्या डोळ्यांनी चहुबाजूला पाहत खाटेखालून हळूच बाहेर येणारं मुंगुसाचं कुटुंब.. सारे सारे या घरात प्रेमानं राहताहेत. या माणसांच्या घरातल्या प्रत्येक खोलीत या सर्वासाठी हक्काचं, स्वतंत्र घर आहे. तेलाचे रिकामे डबे, पाईप, रिकाम्या टोपल्या आणि कुंडय़ांमध्ये या पक्ष्यांनी आपलीही घरटी सजवली आहेत. पंखाखालचं एखादं पिल्लू अचानक चिवचिवाट करू लागलं की त्याच्या भुकेच्या जाणिवेनं जागी झालेली चिमणी भुर्रकन् उडत बर्ड फीडरजवळ जाते, चोचीत दाणे भरून घेते आणि घरटय़ातल्या पिल्लाला ते भरवते. मग ते पिल्लू शांत होतं. आणि हे सारं न्याहाळताना मेहबूब यांचं कुटुंब जणू आपलं अस्तित्वच विसरून जातं.
‘मी कमी शिकलो म्हणून माझ्यात हे शहाणपण आलं असावं..’ खांद्यावर बसलेल्या मुंगुसाला कुरवाळत, छताखालच्या घरटय़ातून बाहेर डोकावणाऱ्या चिमण्या पाखरांकडे प्रेमाने पाहत मेहबूब बोलून जातात. ‘हे घर माझं नाहीच. हे या पाखरांचं, प्राण्यांचंच घर आहे. आणि त्यांच्या घरात आम्ही राहतोय,’ असं ते सांगतात तेव्हा जणू चहुबाजूच्या पक्ष्यांचा किलबिलाट आणखीनच वाढतो. पंख फडफडवत ते एकमेकांना बिलगतात आणि नाचतही असतात. जणू मेहबूबच्या शब्दांनी ते आणखीनच आश्वस्त झालेले असतात. गेल्या ३० वर्षांपासून त्यांच्या आयुष्याची सोबत करणारी त्यांची पत्नी मेहरुन्निसाही मान हलवून त्यांना प्रतिसाद देते. समोरच्याच कोपऱ्यात मांजराची आणि कोंबडीची पिल्लं एकमेकांशी लपंडाव खेळत असतात. भिंतीवरून छतावर उडय़ा मारत शेपूट उंचावत ओरडणारी खारूताई हा खेळ पाहताना हरखून गेलेली असते.
दुपारी जेवणाची वेळ होते. जेवणाचं ताट समोर घेऊन मेहबूबभाई पहिला घास घेतात आणि त्यांच्या खांद्यावर खेळणारं मुंगूस समोर येऊन बसतं. मग सुरू होतो सहभोजनाचा एक आगळा सोहळा.. दररोज! मागे एकदा मेहबूबभाई आजारी होते. दोन दिवस झोपून होते. जेवलेही नाहीत. मग मुंगुसानंही दोन दिवस उपवास केला आणि मेहबूबभाईंना बरं वाटेपर्यंत ते त्यांच्या पायाशीच बसून राहिलं. खारूताईला खेळता यावं, बागडता यावं म्हणून घरातच झाडं वाढवलीयत. त्यांना अंजीर, पेरू लगडतात. पण घरातल्या कुणीच त्यांना हातदेखील लावत नाही. हे सारं त्यांचं.. पक्ष्यांचं, त्यांच्या पिल्लांचं आणि घरात बागडणाऱ्या प्राण्यांच्या हक्काचं! त्यावर आपला हक्क नाही, हे मेहबूबभाईंच्या घरात सगळ्यांनाच माहीत आहे. कधी कधी घरातल्या मांजरीच्या जिभेला खारूताईकडे पाहताना पाणी सुटतं. मग लक्ष तरी किती ठेवणार? उगीच धोका नको म्हणून झाडावरच्या खारूताईच्या घरटय़ाभोवती मेहबूबभाईंनी काटेरी तारांचं नाजूक कुंपणही करून घेतलंय..
मेहबूबभाईंचा जन्म लातूरचा. वडील रेल्वेमध्ये इंजिन फिटर म्हणून काम करत असत. लहानपणीच मेहबूबचं प्राणी व पक्ष्यांवर प्रेम जडलं. शाळेत असताना रस्त्यात जखमी झालेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला घरी आणून त्यांनी त्याची जखम भरेपर्यंत त्याचं संगोपन केलं; आणि बऱ्या झालेल्या त्या पिल्लानं प्रेमाने मेहबूबभाईंचा हात चाटून कृतज्ञता व्यक्त केली. प्राणी-पक्ष्यांच्या डोळ्यांतलं प्रेम वाचण्याची जाणीव तेव्हा लहानग्या मेहबूबना झाली आणि दिवसागणिक हे प्रेम वाढतच गेलं..
शिक्षण सुटल्यानंतर मेहबूबने वडिलांसोबत कुर्डुवाडी येथे सात वर्षे रेल्वेत मजूर म्हणून काम केलं. लातूरची ओढ असल्याने लातूरला परत येऊन उदरनिर्वाहासाठी त्यांनी रिक्षा घेतली व स्वयंरोजगाराचा मार्ग पत्करला. आता प्राणी-पक्ष्यांसाठी वेळही देता येत होता. घरात शिजलेल्या अन्नातील व साठवलेल्या पाण्यातील काही हिस्सा पक्षी, प्राण्यांचा आहे हे मनावर बिंबवून पक्षी-प्राण्यांसाठी ते उपलब्ध करण्याची सोय त्यांनी केली. लातूरच्या मोतीनगरात राहणाऱ्या मेहबूबला काही कारणाने तावरजा कॉलनीत राहायला जावे लागले. तेथे असताना एकाच्या घरी त्याला मोराची अंडी दिसली. ‘ही कोंबडीची अंडी नाहीत, मोराची आहेत. ती खाऊ नका. मी पिल्लं जगवेन आणि वाढवेन,’ असं त्यानी विनवलं. अंडी घरी आणून कोंबडीच्या साहाय्याने त्यांनी ती उबवली आणि मोराची पाच गोंडस पिल्लं जन्माला आली. मग अवघं घर मोरांच्या कोडकौतुकात बुडून गेलं. पिल्लं थोडी मोठी झाली, तोवर त्यांनाही या कुटुंबाचा लळा लागला होता. पण मनावर दगड ठेवून मेहबूबभाईंनी त्यांना जंगलात सोडून दिलं.
रिक्षाच्या व्यवसायात फारशी मिळकत होत नाही, पक्षी-प्राण्यांचा गोतावळा सांभाळणं परवडत नाही, हे जाणवू लागल्यावर रिक्षा विकून त्यांनी टेम्पो घेतला. गावोगावी भटकून पैसा- पैसा जोडण्यासाठी परिश्रम सुरू झाले. प्रवासात वाटेत एखादा ससा, घार, हरीण जखमी अवस्थेत दिसलं तर त्याला घरी आणायचं, त्याची सेवा करायची आणि बरं करून त्याला पुन्हा त्याच्या जागी सोडायचं, हे तर नेहमीचं होतं. या साऱ्या प्रेमाच्या मामल्यात मेहबूब यांच्या पत्नीने त्यांना जशी साथ दिली तशीच साथ सर्व कुटुंबाचीही मिळते आहे. तीन मुलगे आणि एका मुलीनं वडिलांचा हा पक्षीप्रेमाचा वारसा जपला आहे. पक्ष्यांना, प्राण्यांना दुखवायचं नाही, हे या कुटुंबाचं व्रत आहे. दहा वर्षांपूर्वी तावरजा नगरातून मळवटी रस्त्यावरील जागेत या कुटुंबानं आपलं घर हलवलं. नव्या घराची रचना करताना पक्षी-प्राण्यांचा विचार अगोदर केला गेला. घरातील ६०० चौरस फुटांच्या मोकळ्या जागेत आंबा, फणस, पेरू, जांभूळ, अंजीर, चिकूची झाडं आणि पक्ष्यांना झोके घेता यावेत यासाठी फुलांच्या वेलीही लावल्या. ही झाडे फळाफुलांनी लगडली आहेत. पण ते सारे या पक्ष्यांसाठीच आहे. घरातील कोणाला काही खावेसे वाटले तर ते बाजारातून विकत आणून खायचे, हा या कुटुंबाचा शिरस्ता आहे. ६०० फुटांची ही जागा पूर्णपणे त्या पक्ष्यांची आहे. आपल्या पश्चातही त्याची मालकी या पक्ष्यांकडेच राहील अशी ग्वाही आपण आताच कुटुंबाकडून घेतली आहे, असं सांगताना मेहबूबभाईंच्या डोळ्यांच्या कडा काहीशा ओलावतात. गेल्या काही वर्षांपासून लातूरमध्ये पाण्याची चणचण सुरू आहे. अलीकडे तर पाणी विकत घ्यावे लागते. मेहबूबभाईंच्या या विस्तारित कुटुंबाची पाण्याची गरज तर इतरांपेक्षा मोठीच आहे. म्हणून उन्हाळ्यात त्यांच्यासाठी ते पाणी विकत घेतात. दोन वर्षांपूर्वी सत्तर हजारांचं कर्ज घेऊन त्यांनी विंधन विहीर खोदली. २०० फुटांखाली पाणी लागलं. आजही या विहिरीला पाणी आहे. पण कुटुंबानं घरात पाणी काटकसरीनंच वापरायचं, पक्षी-प्राण्यांना पाणी कमी पडता कामा नये, हा कुटुंबाचा दंडक आहे. या घरात आज चिमण्या, साळुंक्या, खारूताई, चिनी कोंबडी, ब्राह्मणी चिमणी, बुलबुल, किंगफिशर, हंस, बदक, ससा, कबुतर, कोंबडय़ा, मुंगूस असे अनेक प्राणी गळ्यात गळा घालून वावरतात. मेहबूब यांची तिन्ही मुलं आता मोठी झालीत. ती स्वतंत्रपणे तीन टेम्पो चालवतात. वडिलांना काम करू देत नाहीत. मुलगी सॉफ्टवेअर इंजिनीयर असून ती विवाहित आहे. सध्या प्राणी-पक्ष्यांसाठी दरमहा त्यांना एक क्विंटल तांदूळ व एक क्विंटल गहू लागतो. ससे, बदकं, हंसांना खाण्यासाठी टोमॅटो, कोबी दररोज विकत आणले जातात. घरात सर्वत्र पक्षी असल्यामुळे सारखी विष्ठेची घाण होत असते. पण त्याबद्दल कुणीही कुरकुर करत नाही. घर स्वच्छ ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, ही जाणीव प्रत्येकालाच असते. उन्हाळ्यासाठी घरात पंखा लावावा असं कुणीतरी त्यांना सुचवलं होतं. पण पंखा लावला तर त्यात अडकून पक्षी मरतील, आपण थोडा त्रास सहन करू, पण पंखा नको असं या घरानं एकमुखानं ठरवलं.
छताचे सिमेंटचे पत्रे खराब होत असल्याने स्लॅबचे घर बांधू या, असा प्रस्ताव मुलांनी एकदा मेहबूबभाईंसमोर ठेवला आणि पक्ष्यांच्या काळजीने उतरलेला त्यांचा चेहरा पाहताच तो मागेही घेतला. तुम्हाला पाहिजे तर जवळपास एखादी जागा घेऊन घर बांधा, पण पक्ष्यांचं घर विस्कटू नका, असं त्यांनी बजावलं. मुलांनीही ते ऐकलं. आता पक्ष्यांच्या त्या घरात सारे एकत्र आनंदाने राहताहेत. पक्ष्यांचं हे किलबिलतं घर पाहण्यासाठी आसपासच्या गावांतून शाळांच्या सहली त्यांच्या घरी येतात. मुलं पक्ष्यांसोबत रमतात आणि एका बाजूला आरामखुर्चीत बसून मेहबूबभाई प्रेमाने तो सोहळा न्याहाळतात..
pradeepnanandkar@gmail.com