‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेचा सहावा विषय जाहीर
सियाचेनच्या वादळात भारतीय लष्करातील लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड यांची मृत्यूशी झुंज देण्याच्या घटनेनंतर सियाचेन या बर्फाळ भूमीवर भारत-पाक संघर्ष हा किती निर्थक आहे, यासंदर्भात ‘लोकसत्ता’त ११ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘हकनाक हणमंतप्पा’ या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.
सियाचेनच्या बर्फाळ प्रदेशात कर्तव्यावर असताना लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड आणि त्यांच्या अन्य नऊ साथीदारांची तुकडी ही एक हिमकडा कोसळून त्याखाली जीवंत गाडली गेली. त्यानंतर त्यांचे नऊ साथीदार हे मरण पावले. मात्र बर्फाच्या आवरणाखाली तब्बल सहा दिवस हणमंतप्पा मृत्यूशी झुंज देत होते. त्यांचे आता निधनही झाले. सलग सहा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर हणमंतप्पा यांचे काळीज सिंहाचे असल्याचे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काढले. या गोठवणाऱ्या बर्फाळ प्रदेशात ३० कोटी डॉलर खर्च करून भारत पाकिस्तानपासून संरक्षण करत असला तरी हा संघर्ष कसा निर्थक आहे, यावर या अग्रलेखात सडेतोड भाष्य करण्यात आले आहे. या अग्रलेखावर या आठवडय़ाच्या ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडायची आहे.
तत्पूर्वी याच विषयावर परराष्ट्र धोरण विषयातील तज्ञ व ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा’त संरक्षण व सामरिक शास्त्र या विभागाचे प्राध्यापक श्रीकांत परांजपे आणि लष्करातून मेजर जनरल म्हणून निवृत्त झालेले शशिकांत पित्रे यांचे मत ‘लोकसत्ता’ने जाणून घेतले आहे. या दोघांनीही या विषयाचा लष्करीदृष्टय़ा, पराराष्ट्र विषयक तसेच आर्थिक अशा विविध दृष्टीकोनातून या महत्त्वपूर्ण विषयाचा आढावा घेतला आहे. त्यांच्या मांडणीचा विद्यार्थ्यांना आपली भूमिका अधिक सुस्पष्टपणे मांडण्यास उपयोग होईल.
वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेचा हा सहावा लेख आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद या विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येकवेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.
या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरूवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भिड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे.

ब्लॉग बेंचर्स स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉगइन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com  या ई-मेलवर संपर्क साधावा.