वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेम परिसरात इस्रायलने बांधलेली घरे विशेष विधेयकाद्वारे अधिकृत करण्याची कृती आक्षेपार्ह आणि चिंता वाढवणारी आहे. इस्रायलचे असे वागणे आणि तिकडे त्या देशाच्या पाठीराख्या अमेरिकेत अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे वादग्रस्त निर्णय यांनी हे जग पुन्हा एकदा कडेलोटाच्या काळावर आणून ठेवले आहे, असे परखड मत गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ‘कडेलोटाच्या काठावर’  या अग्रलेखात व्यक्त करण्यात आले आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना या आठवडय़ात ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे.

इस्रायली होम पार्टी या यहुदी पक्षाने इस्रायली पार्लमेंटमध्ये म्हणजे केनेसेट, एक विधेयक मंजूर करून घेतले आणि वेस्ट बँक आणि ईस्ट जेरुसलेम प्रांतात इस्रायलने बांधलेली घरे अधिकृत करून टाकली. ही शुद्ध दांडगाई झाली. इस्रायलमधील सर्वच राजकीय पक्षांना ही स्वदेशीची दांडगाई मंजूर आहे, असे नाही. अनेकांनी स्वदेशाच्या या कृतीस आक्षेप घेतला असून त्यामुळे इस्रायललाच याचा फटका बसेल असे म्हटले आहे.

असा उल्लेख या अग्रलेखात करण्यात आला आहे. याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने आंतरराष्ट्रीय संबंध आणि वाणिज्य विषयाचे अभ्यासक खालसा महाविद्यालयाचे प्रा. समीर वेलणकर यांना बोलते केले आहे. त्यांच्या मतांचा विद्यार्थ्यांना ब्लॉग लिहिताना उपयोग होणार आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या https://loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी हा लेख देण्यात आला आहे. अर्थिक सुधारणा, क्रिकेट, पर्यावरण, उद्योग, जातीयवाद आदी विषयांवर प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखांवर विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला.

या लेखन स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. त्यांच्या निर्भीड लेखणीला वाट करून देणाऱ्या या स्पर्धेमध्ये राज्यातील विद्यापीठांची व महाविद्यालयांचीही मोलाची साथ लाभली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना आपली भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. त्याच्याआधारे लॉग-इन करून विद्यार्थ्यांना आपले भूमिका मांडता येते.

स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.