यंदाचा ‘ऑस्कर’ सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याने डोळ्याचे पारणे फिटले असेल-नसेल, पण या सोहळ्यातील सहभागी कलावंतांनी राजकीय भान दाखवीत त्यावर निर्भिड भाष्य करताना पाहून विचारांचे पारणे फिटत होते, हे नि:संशय. चित्रपटातील कचकडय़ाच्या दुनियेत वावरणाऱ्या तितक्याच कचकडय़ाच्या कलाकारांचे सोहळे आणि विचारशक्ती यांचा काही संबंध असतो याचा आपणास अनुभव नाही. म्हणूनच ऑस्करचे मोठेपण उलगडून दाखविणे आवश्यक ठरते.. हा विचार ‘लोकसत्ता’च्या ‘ताठ कण्याचे वर्तमान’ अग्रलेखात मांडण्यात आला आहे.

याच अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग’ लिहायचा आहे. या अग्रलेखावर मत मांडणे विद्यार्थ्यांना सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने चित्रपट समीक्षक व अभ्यासक गणेश मतकरी आणि ज्येष्ठ नाटककार शफाअत खान यांचे विचार सादर केले आहेत. त्यांच्या मतांचा आणि विचारांचाही विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग’ लिहिताना उपयोग होणार आहे.

पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉगबेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी या वेळी ‘ताठ कण्याचे वर्तमान’ हा अग्रलेख देण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यासाठी पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची वेळ देण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers  या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.

‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com   या ई-मेलवर संपर्क साधावा.