09 August 2020

News Flash

पुण्यतिथी विशेष: आज स्टीव्ह जॉब्स असते तर…

आज चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणाऱ्या फोनच्या आकारावर ताबा ठेवण्याची मानसिकता ॲपलमध्ये उरलेली नाही.

स्टीव्ह जॉब्स

– सौरभ करंदीकर

काही नेतृत्वं दोनदा निधन पावतात. एकदा त्यांच्या देहावसानाने आणि दुसऱ्यांदा त्यांच्या अनुयायांना त्यांच्या वैचारिक दृष्टिकोनाचा विसर पडतो तेंव्हा. ही गोष्ट जितकी राजकारण आणि समाजकारण या क्षेत्रांबद्दल खरी आहे तितकीच ती औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रांबद्दलदेखील आहे.

आज ॲपलचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांना जाऊन ८ वर्षं उलटली. ॲपलला लोकप्रियतेच्या आणि त्याबरोबर येणाऱ्या आर्थिक सक्षमतेच्या शिखरावर पोहोचवून स्टीव्ह जॉब्स यांनी ५ ऑक्टोबर २०११ रोजी जगाचा निरोप घेतला. पॅनक्रियाटिक कॅन्सरग्रस्त स्टीव्ह यांना जेंव्हा रुग्णालयाच्या आय सी यु मध्ये हलवलं तेंव्हा त्यांचे निकटवर्तीय असं सांगतात कि सुरुवातीला ऑक्सिजन मास्क लावायला त्यांनी नकार दिला. “याचं डिझाईन बरोबर नाही, काही सुधारणा केल्या पाहिजेत” असं स्टीव्ह म्हणाले. यातला दंतकथेचा भाग वगळला तरी शेवटच्या क्षणापर्यंत एखाद्या वास्तूचं डिझाईन वापरायला सोपं आहे का? ते उपयोग करणाऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून बनवलं आहे का? याचा विचार त्यांनी केला असेल हे पटण्यासारखं आहे.

“ग्राहकांना काय हवं ते त्यांना विचारू नका. त्यांना काय हवं ते आपण ठरवलं पाहिजे” असं ते म्हणत. १९७० आणि ८० च्या दशकात अशा विचारांना ‘उर्मटपणा’ म्हणून हिणवलं गेलं. परंतु त्यांचं म्हणणं काळाने खरं ठरवलं. सोनी वॉकमनच्या जमान्यात “आपल्या खिशात हजारो गाणी ठेवता आली पाहिजेत” असं कुठल्याच ग्राहकाने कुठल्याच सर्व्हेदरम्यान म्हटल्याचं ऐकीवात नाही. परंतु ॲपलच्या आयपॉडने हेच शक्य केलं. घोडागाड्यांच्या जमान्यानंतर मोटर गाडी बनवताना ग्राहकांना “काय हवं?” असं विचारलं तर त्याचं उत्तर “अधिक जलद पळणारे घोडे” हेच मिळालं असतं. स्टीव्ह जॉब्स आणि ॲपल यांनी हजारो गाणी ऐकण्याची सुविधा, इंटरनेट सर्फ करण्याची सुविधा आणि मोबाईल फोन या तीन गोष्टी एकत्र करायचं ठरवलं नसतं तर आयफोन जन्माला आला नसता.

केवळ ‘टच’ वर चालणारा आणि स्क्रीनच्या खाली एकुलतं एक बटण असलेला आयफोन वापरायला ‘स्टायलस’ (पेनाप्रमाणे वापरायचं साधन) डिझाईन करायला त्यांनी विरोध केला. “देवानं आपल्याला १० स्टायलस दिले आहेत की?” असं ते हाताच्या बोटांकडे पाहून गमतीनं म्हणत. २०१५ साली ॲपल पेन्सिल बाजारात आली. स्टीव्ह असते तर त्यांनी हे होऊच दिलं नसतं असं काही ॲपल-प्रेमी म्हणतात.

आज ॲपलच्या प्रत्येक कार्यक्रमात नवीन उत्पादने जाहीर झाली रे झाली की ‘स्टीव्ह आज असते तर…’ या प्रकारची अनेक वाक्यं इंटरनेटवर वाचायला मिळतात. एखादं उत्पादन, त्याचा आकार, त्यातील सोयी या गोष्टी बाजारपेठेच्या आणि गुंतवणूकदारांच्या मनाविरुद्ध असल्या तरी त्या रेटून धरणं, तसंच केवळ ग्राहकांच्या गरजांभोवती उत्पादनं डिझाईन करणं फक्त स्टीव्हना शक्य होतं. आज चंद्राच्या कलेप्रमाणे वाढणाऱ्या फोनच्या आकारावर ताबा ठेवण्याची मानसिकता ॲपलमध्ये उरलेली नाही. स्टीव्हच्या हयातीत त्यांनी प्रदर्शित केलेला शेवटचा फोन म्हणजे आयफोन ४. हा फोन एका हाताने वापरता येत असे. आता “वापरायला कठीण, जरासा अवजड असला तरी मोठा फोन हवा” असं ग्राहक म्हणू लागले आहेत, आणि त्यांच्या खऱ्या गरजा ओळखून काहीतरी नवीन निर्माण करू पाहणारे स्टीव्ह आता आपल्यात नाहीत. ‘आयफोनच्या स्क्रीनवर दोन बटणांमध्ये किती अंतर असावं, जेणेकरून जाडी बोटं असणाऱ्यांनादेखील तो सुलभपणे वापरता यावा?’ हे ठरवताना ॲपलने जगभरातल्या विविध वर्णाच्या आणि देहयष्टीच्या व्यक्तींच्या बोटांची मापं घेतली होती! ग्राहकांच्या गरजांचा विचार यापुढे ॲपल असाच करेल काय? बाजारपेठेतील चढाओढ आणि ग्राहकांच्या सुविधा या तराजूच्या दोन्ही बाजू ॲपल सांभाळेल का? याबद्दल आता शंका येऊ लागलेली आहे.

स्टीव्ह जॉब्स निधनानंतर ॲपलने तांत्रिक प्रगती अजिबात केलीच नाही असं नाही. २०१३ सालातला गोलाकार ‘डस्टबिन’ मॅक प्रो हा अतिशय शक्तिमान कंप्यूटर ॲपलच्या अनेक चाहत्यांच्या पसंतीस पडला. गुंतागुंतीचं अभियांत्रिकी काम याच्या रचनेत दिसून येतं. याशिवाय ॲपल वाॅच, एअर पॉड्स, टच आयडी, फेस आयडी, आणि गेल्याच वर्षी सुरु झालेले, वार्षिक फी किंवा अंतिम तारीख नसलेले ॲपल पे चे क्रेडिट कार्ड, इत्यादी उत्पादने तसेच स्विफ्ट आणि मेटल सारख्या संगणकीय प्रणालीतील प्रगती यांचा उल्लेख करावा लागेल. स्टीव्हने बांधलेली ॲपलच्या संचालकांची तसेच विविध विषयातील निष्णात व्यक्तींची मोळी आजही काही प्रमाणात घट्ट आहे. या ‘ॲपल-नाईट्स’ च्या अभेद्य भिंतीला गेलेला सर्वात मोठा तडा म्हणजे डिझायनर जॉनी आईव्हचं कंपनीतून निघून जाणं. त्याची कारणं काही असोत, पण ॲपलच्या उत्पादनांच्या डिझाईनची गुणवत्ता स्टीव्हच्या निधनाने ढासळू लागली, त्याचा उत्तरार्ध आता सुरु झाला आहे हे ‘आयफोन ११ प्रो’ च्या बेढब पार्श्वभागाने सिद्ध केलेले आहे. वर्षानुवर्षं ‘ऑल थिंग्स ॲपल’ वर प्रेम करणारे आता म्हणू लागले आहेत: “द किंग ऑफ कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स इज डेड. लॉंग लिव्ह द किंग”.

– सौरभ करंदीकर
karandikar@gmail.com
(लेखक युजर एक्स्पीरियंस (उपयोजक-अनुभव) आणि तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 5, 2019 12:29 pm

Web Title: apple co founder steve jobs 8 th death anniversary scsg 91
Next Stories
1 BLOG : विरोधकांची गत… दे रे हरी पलंगावरी!
2 BLOG: विजयी की अविजयी ‘डोंबिवलीकर’!
3 BLOG: मनसेचा नेमका प्रॉब्लेम काय? नितीन नांदगावकर त्यांना का नको?
Just Now!
X