– मिलिंद मानकर

जगातील एक प्रसिद्ध विचारवंत म्हणतो, ‘मनुष्याचे निर्वाण झाल्यावर त्याच्या कार्याची ज्योत सदैव तेवत राहते’ याचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे नुकतेच दिवंगत झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होय. ते शरीराने गेले असले तरी त्यांनी आपल्या मागे आठवणीचा स्मृतीगंध ठेवला आहे. त्याच स्मृतीगंधातील एक अनमोल आठवण म्हणजे चीनमधील त्यांची संस्मरणीय भेट होय. मध्य चीनमधील अतिशय प्रसिद्ध ल्योयांग महाविहार आणि लोंगमेन केव्हज्ला त्यांचा पदस्पर्श झाला. ‘आम्हाला युद्ध नको बुद्ध पाहिजे’ हाच संदेश पंतप्रधानांनी या भेटीतून दिला. यावेळी त्यांची मानसकन्या नमिता आणि नात निहारिका सोबत होत्या.

श्वेत अश्व विहार चीनच्या हेनान प्रांतात ल्युओयांग शहरात वसले आहे. हा बौद्ध विहार चीन आणि भारतीय संस्कृतीचा संगम स्थळ म्हणून ओळखला जातो. ‘व्हाइट हार्स विहार’ नावानेही तो प्रसिद्ध आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीचे सर्वोत्कृष्ट प्रतीक आहे. आजतागायत अनेक भारतीय नेत्यांनी या विहाराचे दर्शन घेतले आहे. जवळपास ३,४५० वर्गमीटर क्षेत्रात पसरलेल्या या विहाराचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती मा. प्रतिभा पाटील यांचे हस्ते झाले होते. ऐतिहासिक मान्यतेनुसार, हान राजवंशाच्या मिंग राजाने आपल्या दूतांना भारतातून बौद्ध धम्माला आणण्यासाठी पाठविले होते. कश्यप मातंग आणि धर्मरत्न नावाच्या भारतीय बौद्ध भिक्खूंसोबत दूत ल्युयांगला परत आले. यावेळी भिक्खूंनी बौद्ध साहित्य, बुद्धप्रतिमा पांढर्‍या घोड्यावर ठेवून चीनला आणल्या. तेव्हा भारतात कुषाणचे राज्य होते. पाचव्या शतकात चीन देशात चान संप्रदायाची सुरुवात झाली. ज्याचे सर्वात मोठे धम्मगुरू बोधिधर्मा होते. ज्यांना प्रथम ‘चाइनीज पेट्रियार्क’ मानले जाते.

कालांतराने एक भव्य विहार उभारण्यात आले. याच विहारात वास्तव्य करून कश्यप मातंग आणि धर्मरत्न यांनी संस्कृत बौद्ध साहित्याचा चिनी भाषेत अनुवाद केला. या पवित्र जागेवरून पूर्व आशिया आणि दक्षिण आशियात बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसाराला सुरुवात झाली. अशा या वैभवशाली, ऐतिहासिक ल्योयांग महाविहाराला वाजपेयी यांनी २००३ साली भेट दिली होती. या ठिकाणी आगमन होताच त्यांचे पारंपारिक चिनी बौद्ध पद्धतीने स्वागत करण्यात आले. भव्य बुद्धविहार, नीरव शांती, रमणीय परिसर पाहून ते भारावून गेले होते. विहारातील असीम करुणेच्या सागराला अर्थात महाकारुणिक बुद्धाला त्यांनी अनन्यभावे त्रिवार वंदन केले. ल्योयांग महाविहाराला निरोप देऊन वाजपेयी लोंगमेन केव्हज्च्या दर्शनाला निघाले.

चीनमध्ये बुद्धठेवा असलेल्या लोंगमेन केव्हज् म्हणूनच प्रसिद्ध आहेत. चीनच्या हेनान प्रांतातील लुओयांगच्या दक्षिणेस सुमारे बारा किमी अंतरावर या लेणी वसलेल्या आहेत. अव्याहतपणे खळखळ वाहत जाणार्‍या यी नदीच्या दोन्ही बाजूला या लेणी कोरण्यात आल्या. लोंगमेन केव्हज्ला युनेस्कोने २००० साली जागतिक वारसा सन्मानाने बहाल केला. ही लेणी सुमारे ४०० वर्षांच्या कालखंडात खोदण्यात आली. याची सुरुवात इ.स. ४९४ मध्ये ईस्टर्न वेई या राजघराण्याच्या काळात झाल्याचे मानले जाते. त्यानंतर वेस्टर्न वेई, नॉर्दन क्वी, नॉर्दन झोवू, सुई आणि तांग या राजघराण्यांच्या कालखंडात या लेणींचे सुशोभीकरण करण्यात आले.

लोंगमेन केव्हज्मध्ये १३५२ लेणी, ७५० खोदकाम केलेल्या गुंफासदृश जागा आणि एकूण ४० पॅगोडाज (विहार) पहायला मिळतात. यात दोन सेमी उंचीच्या बुद्धमूर्तीपासून ते १७.४० मीटर्स उंची इतक्या बुद्धमूर्तीपर्यंत सारे काही पहावयास मिळते. डोंगरउताराच्या एकूण चार टप्प्यांवर या लेण्या आहेत. लोंगमेन लेणीतील ही सर्वांत सुंदर बुद्धमूर्ती असल्याचे मानले जाते. बुद्धाच्या अंगावरील वस्त्रात विविध मौल्यवान खडे बसविण्यात आले आहेत. मुखमंडलावरील भाव सात्त्विक, लोभस आहेत. हजारोंच्या संख्येत बुद्धाच्या विविध भावमुद्रा, विविध प्रकारची मनमोहक सौंदर्यशैली यामुळे लोंगमेन लेणीच्या दर्शनाला वर्षभर पर्यटकांचा ओढा कायम असतो. ही लेणी न्याहाळताना व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘गीत गाया पत्थरों ने’ या चित्रपटातील ‘इनमे नहीं है इन्सा का भेदभाव, तुकडे ये है एक दिल के’ या सदाबहार गीताच्या ओळी ओठावर येतात.

पंतप्रधान वाजपेयींनी या ठिकाणीही अतिभव्य बुद्धाचे दर्शन घेतले. बराच वेळ घालवून बुद्धलेणींची महती जाणून घेतली. बुद्धासमोर स्वतःचे छायाचित्र काढले. जेव्हा जेव्हा भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या चिरंतन स्मृतीची पाने चाळली जातील तेव्हा तेव्हा चीनमधील ल्योयांग महाविहार आणि लोंगमेन केव्हज् या ऐतिहासिक बौद्ध स्थळांचीही स्मृती जागृत होईल आणि वाजपेयींच्या सर्वधर्मसमभावाचे दर्शनही होईल.

(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणींचे संग्राहक व बौद्ध धर्माचे अभ्यासक आहेत)