सायली जोशी

गर्लफ्रेंड आणि लग्नासाठी हवी असणारी बायको सुंदर रूपवान असावी अशी बहुतांश पुरुषांची अपेक्षा असते. मग गर्लफ्रेंड पटवताना किंवा अगदी कांदेपोह्याचे कार्यक्रम करतानाही तिला रंगरूपाच्या आणि आकारमानाच्या तराजूत तोलले जाते. ”माणूस बाहेरून कसा आहे हे पाहण्यापेक्षा तो आतून कसा आहे हे महत्वाचे असते” अशी वाक्य तत्वज्ञान सांगण्यापुरती किंवा पुस्तकात लिहिण्यापुरती ठीक असतात. पण प्रत्यक्षात बायको म्हणून सोबत मिरवायला हवी असणारी स्त्री सुंदर असावी अशीच सामान्य अपेक्षा असते. मग आपल्या व्याख्येत बसणारी सुंदर स्त्री पत्नी म्हणून मिळाली की तिच्यावर इतरांची नजर पडू नये म्हणून आटोकाट प्रयत्न केले जातात. नवरा म्हणून आपल्या पत्नीबाबत पझेसिव्हनेस असणे ठिक आहे. पण या भावनेतून पत्नीच्या सौंदर्यावर घाला घालणे ही मानसिकता नक्कीच धोकादायक आहे.

जबलपूरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने असाच एक अघोरी प्रकार केला आहे. आपण घरी नसताना आपल्या पत्नीवर इतर कोणाची नजर पडू नये म्हणून तिचा चेहरा विद्रूप करण्याची विकृती या पतीने केली आहे. आता यामागे नेमकी काय मानसिकता असेल ही खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ज्या सौंदर्यावर भाळून तिच्याशी लग्न केले त्या सौंदर्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या या व्यक्तीला हे कृत्य करण्याची हिंमत कशी झाली असेल या विचारानेही अंगावर शहारा उभा राहील. ज्या गोष्टीवर भाळून लग्न केले ती खराब करण्यासाठी वाटेल त्या थराला जाणे हे विकृतीचेच लक्षण म्हणावे लागेल. २१ व्या शतकात अशी घटना घडते यावर आपलाही विश्वास बसणार नाही, पत्र्याचा तुकडा पत्नीच्या चेहऱ्यावर ओरखडणारा महाभाग आपल्याच आजुबाजूला राहतो यासारखे दुर्दैव नाही. दुसऱ्या शहरात राहत असताना पत्नीची काळजी वाटणे ठीक आहे. पण तिला कोणी पाहू नये म्हणून असे दुष्कृत्य करणाऱ्याच्या मानसिकतेचा अभ्यास करण्याची गरज येत्या काळात भासू शकते. मात्र ही समाजासाठी नक्कीच दुर्दैवाची बाब आहे.

दुसरीकडे पत्नीला स्वत:समोरच आपल्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती एका पतीने केली आहे. जिला मोठ्या विश्वासाने लग्न करुन घरी आणतो. तिचे संरक्षण करण्याऐवजी जीवे मारण्याची धमकी देत तिला मित्राशी शरीरसंबंध ठेवायला लावणे हे खरंच घृणास्पद आणि त्या महिलेचे मानसिक खच्चीकरण करणारे आहे. संपूर्ण आयुष्य एकमेकांच्या साथीने जगण्याच्या आणाभाका जिच्यासोबत घेतल्या जातात तिला अशा परिस्थितीत ढकलणे ही त्या महिलेसाठी जगावरचा विश्वास उडविणारी गोष्ट ठरु शकते. दोन्ही घटनांमध्ये असणारी मानसिकता आणि त्यातून घडलेली कृती ही अतिशय खालच्या थराला जाऊन वागणाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारीच आहे. या मानसिकतेवर ताबा कसा मिळवणार हे येत्या काळातील मुख्य आव्हान आहे.

देशात मोठ्या प्रमाणात गाजलेले निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरण असो किंवा कोपर्डी बलात्कार प्रकरण यातूनही विकृत मानसिकता समोर आली होती. या दोन्ही प्रकरणातील मुलींवर बलात्कार करण्यात आला त्यानंतर त्यांच्यासोबत जे काही केले गेले ते घृणास्पद या शब्दालाही लाजवणारे होते. विकृतीचे ओंगळवाणे प्रदर्शन करणारे होते, तळपायाची आग मस्तकात जाणारे होते. निर्भया प्रकरणानंतर तर दिल्लीची ओळखच ‘रेप कॅपिटल’ अशी झाली. या दोन्ही प्रकरणानंतर मोर्चे काढण्यात आले, मेणबत्त्या जाळण्यात आल्या. मात्र बाईची वेदना थांबली नाही तर उलट ती वाढत गेली. बलात्काराची कितीतरी प्रकरणे यानंतर समोर आली आहेत. दिवसागणिक देशात मुली असुरक्षित असल्याचे वातावरण निर्माण होत असताना अगदी ६ महिन्याच्या मुलीपासून ७५ वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंत देशात कोणीही सुरक्षित नाही कारण त्यांच्यावरही बलात्कार झाल्याच्या घटना याच देशात घडल्या आहेत. ही नुसती विकृती नाही तर तिचा कळस आहे.

लहान वयात मुलींवर होणाऱ्या बलात्काराने आरोपीवर कायद्यानुसार कारवाई (कदाचित) होईलही. पण त्या मुलींच्या मनावर ओढल्या गेलेल्या ओरखड्यांचे काय? मरेपर्यंत बाप, नवरा, मित्र किंवा अगदी अनोळखी व्यक्तीने केलेल्या या कृतीने त्या विशिष्ट नात्याविषयी आणि लैंगिक संबंधाविषयी तिच्या मनात जी भीती कायम राहील त्याचे काय? काही वेळा अशाप्रकारच्या बलात्काराच्या घटना समोर येतात. मात्र अशा कित्येक मुली दररोज देशाच्या कानाकोपऱ्यात अत्याचाराला बळी पडत असतील? या भयंकर आणि विकृत मानसिकतेबाबत आपण काय करु शकतो याचा विचार प्रत्येकाने करण्याची वेळ खऱ्या अर्थाने आली आहे.

sayali.patwardhan@loksatta.com