शेखर जोशी

देवेंद्र फडणवीसजी,

एकतर तुकाराम मुंढे यांची बदली करु नका आणि बदली करायचीच असेल तर त्यांना कल्याण डोंबिवली महानगरपालिका  अर्थात ‘कडोंमपा’त पाठवा. चार-सहा महिने आम्हालाही खमक्या अधिकारी मिळेल. हो. कारण मग इथल्याही नगरसेवकांना ते नकोसे होतील. तो जो काही कालावधी ते येथे राहतील तेवढीच जरा इथलीही साफसफाई. काय? मग ‘कडोंमपा’तून त्यांना आणखी कुठेतरी पाठवा. असे करता करता महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांमधून त्यांना फिरवा.

किंवा आणखी एक करता येईल. वर्षभरातील मुंढे यांच्या बदलीचे वेळापत्रकच नाहीतर तयार करा. म्हणजे मग नगरसेवकांची नाराजी, अविश्वास ठराव हे काही नकोच. दर दोन किंवा तीन महिन्यांनी त्यांना राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये फिरवून आणा. त्याचा एक कालबद्ध कार्यक्रमच तयार करा.

आणि हो, फक्त मुंढेच कशाला? असे जेवढे म्हणून प्रामाणिक, कार्यक्षम, खमके अधिकारी आहेत, त्या सर्वांची तातडीने एक यादीच तयार करा ना? नाहीतरी या आधीही अरुण भाटिया, टी. चंद्रशेखर, यु. पी. एस. मदान ( कडोंमपा’ची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर येथील सर्वपक्षीय नगरसेवकांनी चंद्रशेखर यांची बदली करवली होती.) गो.रा. खैरनार आणि अन्य अधिका-यांच्या अशा बदल्या नाहीतरी झाल्या आहेत. तुम्ही तेव्हा सत्तेत नव्हता. त्यामुळे त्या विरोधात असे अधिकारी हवेत म्हणून आरडाओरड केली होती. आता तुम्ही सत्तेत आल्यानंतर तेच करत आहात. म्हणजे पहिले पाढे पंचावन्न.

मग ‘पार्टी विथ डिफरन्स’ कशाला म्हणवून घ्यायचे? सगळे एकाच माळेचे मणी. त्यामुळे मुंढे प्रकरणात काही चांगले करता आले तर जरुर करा.