श्रुति गणपत्ये

भारतात राजकारणातली घराणेशाही हा नेहमी वादाचा मुद्दा ठरतो. अनेक जण त्याला सहज पाठिंबा देतात. पण बहुसंख्य लोक त्याच्या विरोधात आहेत. प्रत्येक निवडणुकीच्या तिकीट वाटपाच्या वेळी घराणेशाहीचा विषय पुन्हा पुन्हा चर्चिला जातो. पण त्यामुळे त्याच त्याच नेत्यांच्या पुढच्या पिढ्या राजकारणात यायचं थांबत नाहीत. उद्योग-व्यवसाय यामध्येही तीच गत आहे. पण त्यावर एवढा वाद होत नाही. नेटफ्लिक्सने या आठवड्यामध्ये “ज्युपिटर्स लेगसी” नावाची स्टीव्हन एस. डेनाइट दिग्दर्शित एक साय-फाय मालिका आणली आहे. मार्क मिलरच्या कॉमिक बूकवर आधारित या मालिकेचे हक्क नेटफ्लिक्सने तब्बल २५८ कोटी रुपयांना खरेदी केले. या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे सुपर हिरोंच्या चुरस कथांबरोबरच दोन पिढ्यांमधले वाद हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे.

या कथेची सुरुवात ही १९२२ पासून म्हणजे जागतिक आर्थिक मंदीच्या आधीपासून होते. एका उद्योगपतीचा व्यवसाय चांगला सुरू असतो. तो वाढवण्यासाठी तो भरमसाठ पैसे उधार घेतो, इतकंच नाही तर कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीतील पैसेही त्यांच्या नकळत वापरतो आणि पुढे मंदीमध्ये डुबतो. शेवटी काहीच पर्याय न राहिल्याने तो आत्महत्या करतो आणि त्याचा एक मुलगा (जॉन डुआमेल) हे दृश्य प्रत्यक्ष पाहतो. त्याचा त्याच्या मनावर एवढा परिणाम होतो की त्याला सतत वडील दिसल्याचे भास होऊ लागतात आणि त्याचं प्रमाण वाढत जातं. तो मानसिक आजाराने पछाडतो आणि त्यावर उपाय शोधण्याच्या नादात त्याला सुपर पॉवर मिळतात. त्याच्याबरोबर असलेल्या आणखी पाच जणांनाही अशा सुपरपॉवर मिळतात आणि मग जगाला संकटांतून वाचवण्यासाठी ते एक “युनियन” बनवतात. कथा मग २०२१ मध्ये येते जेव्हा हे सर्व म्हातारे झाले आहेत, अगदी १०० वर्षांहून जास्त आणि त्यांच्या सुपरपॉवर आपोआप मुलांकडेही आल्या आहेत. पण सामाजिक परिस्थिती बदलल्यामुळे मुलांना युनियनचे जुने नियम मान्य नाहीत, पालकांच्या अनेक गोष्टी त्यांना पटत नाहीत आणि आता वाद विकोपाला गेले आहेत.

मूळात सुपर हिरो ही संकल्पनाच साधारण पहिल्या महायुद्धानंतर आलेल्या आर्थिक मंदीच्या काळामध्ये पुढे आली. युद्ध आणि त्यापाठोपाठ आलेल्या मंदीचा लोकांवर एवढा परिणाम झाला होता की त्या आर्थिक संकटातून केवळ काहीतरी चमत्कारच आपल्याला वाचवू शकतो, अशी काहींची भावना निर्माण झाली होती. त्यावेळच्या मानसिकतेतून सुपर हिरोंची कॉमिक लिहिली गेली. मग त्यात फॅंटम, सुपर मॅन, आयन मॅन, हीमॅन, स्पायडर मॅन, बॅटमॅन असे शेकडो सुपर हिरो पुढे आले. ते आजही नवनवीन रुपांमध्ये आकारांमध्ये येऊन मुलांना भुरळ घालत असतात. या सगळ्यांचं कथानक सारखंच आहे. सामान्य माणूस जो अगदीच कोणाच्या लक्षात राहणार नाही त्याच्याकडे सुपर पॉवर येतात आणि तो संकटामध्ये इतर सामान्यांची मदत करतो आणि पुन्हा गुपचुपपणे सामान्य माणसाच्या भूमिकेमध्ये परत जातो. अशक्य गोष्ट शक्य करणं आणि प्रत्येक संकटातून वाचवायला एक शक्ती येणं या भोवतीच या कथा फिरत राहतात. दैववादी विचारसणीचाच हा एक आधुनिक काळातला अवतार म्हणायला हवा.

पण या मालिकेमध्ये सुपर हिरोंबद्दल काही मूलभूत प्रश्न विचारले आहेत. पहिल्या महायुद्धानंतर त्यांचा जन्म झाला पण दुसऱ्या महायुद्धात त्यांनी विध्वंस का थांबवला नाही? अणुबॉम्बचा वापर, शीतयुद्ध आणि त्यानंतर सध्या जगातल्या लहान-मोठ्या देशांमध्ये सुरू असलेल्या हिंसक कारवाया ते का थांबवू शकले नाहीत? आणि हे प्रश्न रास्तचं आहेत. त्यावेळी सुपर पॉवर कुठे होत्या? त्यामुळे सध्याच्या काळात हे सुपर हिरो हे शहरातल्या पोलिसांपेक्षा थोडे वरच्या दर्जाचे आहेत आणि पोलिसांना जे शक्य होत नाही ते हे सुपर हिरो करतात. पण ते माणसांप्रमाणे जखमी होतात, मरतात. पण, युनियनचे नियम पाळणं त्यांना बंधनकारक आहे. त्यातला महत्त्वाचा नियम म्हणजे शत्रूला मारून टाकायचं नाही. यावरूनच नवीन पिढी आणि जुन्या पिढीमध्ये खटके उडू लागतात कारण शत्रूला न मारल्याने नवीन पिढीतील काही सुपर हिरो मारले जातात.

बॉलिवूड, राजकारणी, प्रसिद्ध व्यक्ती यांच्या “स्टार किड्स”च्या अनेक सामाजिक समस्या असतात. त्यांचं वैयक्तिक आयुष्य हे सामान्य माणसांप्रमाणे नसतं आणि तेच गॉसिप कॉलममधून नेहमी चघळलं जातं. अगदी तिच परिस्थिती या मुलांची आहे. घराणेशाहीतून या सुपर पॉवर जन्मतः त्यांना मिळाल्यात. पण त्या काहींना नकोशा झाल्यात किंवा त्याची किंमत नाही. मग कोणी आई-वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झगडतात तर कोणी ड्रगच्या आहारी जातात तर कोणी आपला संबंधच आईवडिलांपासून तोडून टाकला आहे. त्यामुळे जगासाठी ते सुपर हिरो असले तरी वैयक्तिक पातळीवर आपल्या मुलांशी जुळवून न घेऊ शकलेले आई-वडील आहेत. काल्पनिक आणि वास्तविक याची सरमिसळ करून ही मालिका निश्चितच गुंतवून ठेवते. अर्थात साय-फाय असल्याने नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, वेगळ्या कल्पना, मानसिक खेळ, विविध शक्ती, शत्रूची अनेक रुपं असा संपूर्ण मसाला यामध्ये भरलेला आहे. त्याचा दृश्य परिणामही उत्तम साधला आहे. साय-फाय मालिका किंवा चित्रपट हे त्यांच्या अतिकाल्पनिकतेमुळे कंटाळवाणे किंवा खूपच अशक्य वाटतात. पण ही मालिका त्या पातळीवर सुसह्य आहे.

shruti.sg@gmail.com