24 September 2020

News Flash

राज ठाकरे – शरद पवारांच्या त्या फोटोमागची खरी कहाणी

… पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे

Real story behind Raj Thackrey Sharad Pawar Photo

– कीर्तिकुमार शिंदे

दोन मोठे राजकीय नेते जेव्हा प्रत्यक्ष भेटतात, तेव्हा छोट्यांनी तिथं घुटमळत उभं राहू नये, आणि तरीही, त्यांच्यात झालेला संवाद कानावर पडलाच तर त्याची जाहीर वाच्यता करू नये, असे संकेत आहेत. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विमानप्रवासातील भेटीबाबत ज्या चर्चा वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियात काल सायंकाळपासून सुरू आहेत, त्या पाहता हा संकेत मोडणं गरजेचं वाटतंय.

औरंगाबाद-मुंबई विमानप्रवासातील “पवार-ठाकरे भेट ठरवून घडवण्यात आली” इथपासून ते “आता एनसीपी आणि मनसे एकत्र येणारच” इथपर्यंत आणि “राज हे पवारांची प्रत्येक गोष्ट ऐकतात” इथपासून ते “मनसेला आमच्या महाआघाडीत स्थान नाही” या राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांच्या मतापर्यंत प्रत्येक गोष्टीवर गेल्या काही तासात अक्षरश: महाचर्चा झडल्या आहेत. भाजपच्या ट्रोल आर्मीने आणि शिवसेनेच्या ऑनलाईन वीरांनी नेहमीप्रमाणे या भेटीची थट्टा उडवत राज यांच्यावर टीका केली आहे. पण विमानात प्रत्यक्षात काय घडलं, हे फारच थोड्या लोकांना माहिती आहे.

औरंगाबाद विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण करण्यासाठी सज्ज असलेल्या विमानात राज ठाकरे यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा ते त्यांच्या सीटवर बसत होते. राज आणि बाळा नांदगावकर यांच्या सीट्स उजवीकडे बाजूबाजूला होत्या, तर शरद पवार आणि शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जून खोतकर यांच्या सीट्स डावीकडच्या रांगेत बाजूबाजूला होत्या. विमानातील आपल्या सीटवर शरद पवार बसल्यावर त्यांच्या बाजूच्या सीटवर अर्जून खोतकर बसणार…, इतक्यात पवार त्यांना म्हणाले, “तुम्ही (खोतकर) तिथे बसा, राजला इथे (माझ्या बाजूला) बसू द्या.”

पवार यांच्या या बोलण्याचा मान राखत खोतकर उजवीकडच्या रांगेत म्हणजे बाळा नांदगावकरांच्या बाजूला जाऊन बसले आणि त्यानंतर पुढच्या साधारण तास-दीड तासाच्या विमान प्रवासात शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा रंगल्या. राजकारणातील प्रत्येक गोष्ट प्लांटेड असते, हा एक गैरसमज आहे. राजकीय नेत्यांच्याही आवडीनिवडीची काही खास माणसं असतात, त्यांनाही आवडीच्या माणसांशी गप्पा मारायला आवडतं, हे आपण विसरतो. अर्थात, या गप्पांमध्ये राजकीय विषय निघालेच नसतील, असं म्हणणंही मूर्खपणाचं ठरेल.

शरद पवार आणि राज ठाकरे यांच्या गप्पा सुरु असताना त्यात थोड़ा वेळ का होईना पण सहभागी होण्याचा मोह शिवसेनेचे आमदार, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि मनसे नेता बाळा नांदगावकर यांनाही आवरला नाही. त्यासाठी सीट सोडून हे दोघे (मुंबईतल्या लोकल ट्रेनप्रमाणे) विमानातही उभे राहिले! आणि हा फोटो असा आला…

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 27, 2018 10:36 am

Web Title: real story behind raj thackrey sharad pawar photo
Next Stories
1 Good Read: मंदार भारदेंचं बघ्याची भूमिका हा बावनकशी ऐवज
2 BLOG: अविचाराने माखलेला मेंदू!
3 BLOG : भारताचा नवीन सचिन बनण्याकडे विराटची वाटचाल
Just Now!
X