सुनीता कुलकर्णी
अमेरिकेमधल्या सत्तापालटानंतरचं कवित्त्व काही संपायला तयार नाही. ट्रम्प आणि त्यांच्या अनुयायांचे खेळ सुरू असतानाच नव्या उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्या एका छायाचित्रावरून अमेरिकेत वाद रंगला आहे.

‘व्होग’ हे अमेरिकेमधलं फॅशन आणि लाइफस्टाइल या विषयाला वाहिलेलं नियतकालिक आहे. कमला हॅरिस निवडून आल्यानंतर ‘व्होग’ने फेब्रुवारी महिन्याच्या अंकाच्या मुखपृष्ठासाठी निवडलेलं त्यांचं एक छायाचित्र प्रसिद्ध केलं आहे. या छायाचित्रातून दिसतं की हॅरिस बाईंनी गडद ब्राऊन रंगाचा ब्लेझर आणि काळी पँट घातली आहे. पार्श्वभूमीवर गुलाबी आणि हिरव्या रंगाचे पडदे सोडले आहेत. दुसऱ्या छायाचित्रात हॅरिसबाई फिकट निळ्या रंगाच्या सूटमध्ये हातावर हात ठेवून उभ्या आहेत. या छायाचित्राला सोनेरी रंगाची पार्श्वभूमी आहे.

आता तुम्ही म्हणाल की असं असेल तर त्यात वाद निर्माण होण्यासारखं काय आहे? त्यांचे कपडे, उभं राहण्याची स्टाईल, चेहऱ्यावरचे हावभाव सगळं ठीकठाक तर आहे. मग अमेरिकी लोक वाद कशासाठी घालताहेत ?

तर त्यांची नाराजी रंगाबद्दलची आहे, पण कपड्यांच्या किंवा पडद्यांच्या नाही तर खुद्द हॅरिसबाईंच्याच. ते छायाचित्र नीट पाहिलं तर असं लक्षात येतं की छायाचित्रात कमला हॅरिस यांचा रंग आहे त्यापेक्षा अधिक उजळ करण्यात आलेला आहे. आणि नेमकं हेचं अमेरिकी लोकांना आवडलेलं नाही.

अनेकांनी ट्विट करून या छायाचित्राबद्दल आपली नापसंती व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर कमला हॅरिस यांचा मूळ रंग दाखवणारी छायाचित्रंही लोकांनी ट्विटरवर टाकली आहेत. यापेक्षा चांगलं छायाचित्र आम्ही काढून देतो असाही दावा अनेकांनी केला आहे. कमला हॅरिस यांचा रंग उजळ केल्याचा आरोप ‘व्होग’ने फेटाळून लावला आहे. पण त्यांची भूमिका लोकांना फारशी पटलेली नाही.

ओबामा यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कारकीर्दीत त्यांच्या पत्नी आणि तेव्हाच्या फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांची छायाचित्रे ‘व्होग’सह अनेक नियतकालिकांच्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध करण्यात आली होती. पण माझ्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत ‘व्होग’ने एकदाही माझ्या पत्नीचं, मेलेनिया ट्रम्पचं छायाचित्र आपल्या मुखपृष्ठावर प्रसिद्ध केलं नाही, अशी तक्रार गेल्याच महिन्यात ट्रम्प यांनी केली होती. त्यानंतर आता कमला हॅरिस यांच्या फोटोशॉपमुळे ‘व्होग’ वादाच्या फेऱ्यात सापडलं आहे.