चेतन दीक्षित

भूलो पप्पू, पप्पा, उसकी नानी..
अब आ गयी है स्मृती इरानी..

अमेठीच्या सर्व सामान्य जनतेच्या मनात अशीच काहीशी भावना असेल. स्वातंत्र्यानंतर केवळ दोन अपवाद वगळता सर्वकाळ काँग्रेसचीच जागा असणारी ही अमेठी मात्र पायाभूत सुविधांसाठी तळमळत होती, विकासाचा तर विषय लांबच.. मग ते रस्ते असोत, वैद्यकीय सुविधा असोत, वीज असो, पाणी असो, शिक्षण असो अथवा दैनंदिन कारभाराची कार्यालये असोत.. सगळीकडे ठणठणगोपाळ होता..
गांधी घराण्याची मनापासून पूजा करणाऱ्या ह्या अमेठीच्या वाट्याला फुले सोडा, साधं निर्माल्य सुद्धा आलं नाही. गांधी घराण्यात कोणीही जन्माला आला तरी त्याची अमेठीमधली जागा निश्चित समजली जायची. ह्याला कारण म्हणजे एक तर विरोधक नाही आणि सप-बसपा ची असलेली छुपी साथ. २०१४ ला सुद्धा आपण हे पाहिलंत आणि २०१९ मध्ये सुद्धा सप-बसपाची भूमिका आपण पाहिली आहे जिथे खुद्द मायावतींनी त्यांच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधींना पाठिंबा द्यायला सांगितलं होतं..

पण २०१९ मध्ये चक्रे फिरली..
कारण इथे अजून खंबीरपणे उभ्या होत्या स्मृतीजी..

एक साधी टीव्हीवरची अभिनेत्री पुढे जाऊन देशातील सर्वात बलाढ्य कुटुंबाशी दोन हात करून त्यांच्या सुरक्षित तिजोरीतून विजय हिसकावून घेते, ह्यापेक्षा लोकशाहीच्या सुदृढतेचा दाखला आज कुठला देणार??

हे एका रात्रीत घडलं?? शक्य आहे का??

मुळात गांधी घराण्यावर टीका करणं खूप सोप्पंय, पण त्यांना त्यांच्याच घरात घुसून आवाहन देणं, खायच्या गप्पा नाहीत..२०१४ मध्ये जेव्हा स्मृतीजींनी राहुल गांधींना उघड आव्हान दिलं तेव्हा बऱ्याच जणांना हा पब्लिसिटी स्टंट वाटला होता.. कारण राज नारायण ह्यांनी इंदिराजींना ज्याप्रमाणे आव्हान देऊन त्यांचा पराभव केला होता ते त्या आधी आणि नंतर कधीच घडलं नाही.. किंबहुना त्या विजयानंतर राज नारायण हे नाव तसे फारसे राजकीय पटलावर आले नाहीच. त्यामुळे स्मृतीजींच्या ह्या पोकळ वल्गना वाटल्या नसत्या तर नवल होतं. देशात मोदी लाट होती तरीही अमेठीत राहुल गांधींचा विजय झाला.. पण विजयाचं मार्जिन तिपटीने कमी झालं.. आधी आपल्या फर्ड्या, उत्स्फूर्त आणि ओघवत्या भाषणशैलीनं तसं स्मृतीजींनी लक्ष वेधून घेतलं होतंच, पण ह्या घटत्या मार्जिननं बऱ्याच जणांच्या भुवया वर गेल्या.. अर्थात कपाळातच..

२०१४ ची अमेठी हरून सुद्धा स्मृतीजींना शक्तिशाली खाती देण्यात आली. काही अंतर्गत कारणाने म्हणा किंवा राजकीय अपरिहार्यता म्हणा त्यांची खाती बदलत गेली. वादामुळे ते चर्चेत राहिल्या पण ह्या दरम्यान त्यांनी अमेठीकडचे लक्ष हटवले नाही..
गेल्या ५ वर्षात जेवढ्या वेळेस स्मृतीजी अमेठीत आल्या तेवढ्या वेळेस गेल्या पंधरा वर्षात निवडून आलेले खासदार आले नाहीत असा स्मृतीजींचा दावा आहे.. जो बऱ्यापैकी खरा आहे.

इथं विषय नुसता भेटण्याचा नाही तर लोकांसोबत मिसळून त्यांच्या भावना जाणून त्यानुसार पावले टाकण्याचा आहे. उगाच पन्नास हजारापेक्षा जास्त लोकांना केंद्र सरकारच्या आयुष्य विमा योजनेचा लाभ मिळत नाही; घर म्हणजे केवळ चार भिंती आणि छप्पर नसतं तर त्यासोबत पाणी, आणि वीज लागते ती उगाच मिळत नाही; नवीन शाळा उगाच मिळत नाहीत; रस्ते उगाच चांगले होत नाहीत; कृषी विज्ञान केंद्र असंच मिळत नाही; माती परीक्षण लॅब अशीच येत नाही; कॉमन सर्व्हिस सेंटर टाईमपास म्हणून येत नाही; नैसर्गिक आपत्तीमध्ये घर आणि पिकांसाठी जलद नुकसान भरपाई अशीच मिळत नाही; ई- रिक्षा, स्टील प्लांट मधील सुधारणा, प्रदेशातील वायफाय सुविधा, लोणच्याचा अमेठी ब्रँड, सिनेमा थिएटर, घरोघरी गॅस ह्या सगळ्यांसाठी किमान शंभरतरी कार्यक्रम स्मृतीजींनी आयोजित केले असतील.

हे सगळं स्मृजींनी केले, जे अर्थात आधी तिथं नव्हतंच. २०१४ च्या पराभवानंतर स्मृतीजी अमेठीमध्ये एक ट्रक भरून चपला घेऊन गेल्या होत्या. कारण तिथल्या रस्त्यांची दुरावस्था पाहता अनवाणी पायांनी लोकांनी चालणे हे कष्टप्रद होते. अमेठीजवळील एका गावाने तर ह्या २०१४ च्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. का? तर पूल बांधायच्या त्यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दशके दुर्लक्ष केलं गेलं होतं. त्याचा पाठपुरावा स्मृतीजींनी करून त्या लोकांना विश्वासात घेतले. एप्रिलमध्ये अमेठीमधील पुरब-द्वारा नावाच्या खेड्यात आग लागली तर स्मृतीजी स्वतः धावून गेल्या आणि हातपंपाने स्वतः पाणी काढून आग नियंत्रणात आण्याचा प्रयत्न केला.. ह्याचे फोटो आणि व्हिडिओ प्रचंड वायरल झाले होते. हा केवळ पब्लिसिटी स्टंट आहे म्हणू टीका सुद्धा झाली होती. पण त्याचवेळेस राहुलजी कुठे होते? ह्यावर टीकाकार मौन पाळून होते. ही घटना त्यांच्या मतदारांना स्मृतीजींच्या अजून जवळ आणायला कारणीभूत ठरली नसती तरच नवल होतं.

ह्या सर्व गोष्टीत केवळ स्मृतीजीच नव्हे तर केंद्र सरकारचे सुद्धा योगदान महत्वाचे आहे. गुजरात निवडणुकीच्या धामधुमीत अमित शाहांनी आवर्जून अमेठीत जाऊन कलेक्टर ऑफिसचे भूमिपूजन केले होते, मोदींनी शस्त्रास्त्रांच्या कारखान्याचे उदघाटन केले होते. ते काँग्रेसचे सरकार हे भूमिपूजनासाठी प्रसिद्ध होते तर हे सरकार उदघाटनाची प्रसिद्ध आहे ह्याचा अनुभव अमेठीच्या जनतेने घेतलाय आणि म्हणून हा विजय..

हा विजय ऐतिहासिक आहेच पण अतर्क्य वा अनाकलनीय नाही. किमान ज्यांनी अमेठीचे हे बदलते रूप पाहिले आहे, ते तरी हे अपेक्षितच म्हणतील. निवडून नं येता जर स्मृतीजी एवढी मजल मारू शकत असतील तर निवडून आल्यावर काय काय करतील.. ते आपण पाहूच, येत्या काळात..

एका विजयात पुढच्या विजयाचा आराखडा तयार असावा, एका पराजयाने प्रयत्नावलोकन करून मार्ग बदलायची रणनीती हवी. ह्या विचाराचे परफेक्ट उदाहरण म्हणजे २०१९ ची निवडणूक. आणि ह्या विजयातल्या जायंट किलर ठरल्या आपल्या स्मृतीजी..
अमेठी जशी भाग्यवान ठरली तशी रायबरेली अजून एका स्मृतीजींच्या अपेक्षेत असेलच.. तोही सुदिन आपल्या नशिबात लवकर येईलच कारण स्मृतीजींनीच ट्विट केलं होतं तसं, “आसमान पे सुराख होने के लीये, तबीयतसे पत्थर उठानेवाला/ली” येईलच…

“भगवान के यहा देर है, लेकिन अंधेर नही” ह्याची स्मृती अमेठीने आपल्याला दिली आहेच..
खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन स्मृतीजी…

संदर्भ – टाइम्स, बिझनेस स्टॅण्डर्ड, इंडिया टुडे, एनडीटीवी, फर्स्टपोस्ट