मनोज वैद्य, राजकीय विश्लेषक

महाराष्ट्राने देशाला नेते दिले पण राज्याला नेता नाही दिला.देशात ओदिशाचे सध्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 72 वर्षाचे आहेत. ते 2000 पासून मुख्यमंत्री आहेत.ते पदावर विराजमान झाले तेव्हा त्यांना मातृभाषासुद्धा येत नव्हती. मध्य प्रदेशचे शिवराज चौहान भाजपाचे असले तरी, त्यांनी एक प्रादेशिक नेतृत्वच प्रस्थापित केले होते. नरेंद्र मोदी हे आजसुद्धा पंतप्रधान असले तरी त्यांच्यातला पंधरा वर्षे राज्य केलेला गुजरातचा मुख्यमंत्री कायम आपली कट्टर प्रादेशिक अस्मिता दाखवत असतो. अगदी आता अलीकडच्या काळात ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमधील डाव्यांची पोलादी राजवट उलथवून टाकली. दुसरी टर्मसुद्धा मिळवली आणि राज्यात आपल्या नेतृत्वाची पाळंमुळं खोलवर रुजवली. दक्षिणेत आणि देशात इतर राज्यात अशी अनेक उदाहरणे आहेत.

महाराष्ट्रात शरद पवार एक परिपूर्ण राज्याचे नेतृत्व होते.त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी देशपातळीवर काढला होता. तरी त्याचे अस्तित्व महाराष्ट्रापुरतेच होते. त्यांना आपला महाराष्ट्र तळ हातावरच्या रेषेप्रमाणे माहिती होता असे म्हटले जाते. नोकरशाहीवर पकड, विकासाची जाण होती. पण त्यांना महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणता आली नाही.
एकदा अण्णा हजारे आपल्या शैलीत एका मुलाखतीत पत्रकारांना शरद पवार यांच्याविषयी भाष्य करताना म्हणाले, खूपच चांगले नेतृत्व पण त्याग आणि विश्वासार्हता कमी पडली. आजसुद्धा पवारांची गुगली, पवारांच्या बोलण्याला ग्रेस यांच्या कवितेप्रमाणे अनेक अर्थ असतात.त्यांनी कायम “तेल लावलेला पैलवान” अशीच प्रतिमा कायम खतपाणी घातले. जेवणात मीठ चवीलाच ठीक असते!

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात त्यांची ओळख होती.ते जागतिक पातळीवरचे चित्रकार होते. सत्तेची त्यांना भूक नव्हती. इथे शरद पवार यांच्या अगदी उलट होते. दिलदार आणि मनस्वी बाळासाहेब हे जरा कपटी, धूर्त हवे होते. तसेच त्यांचे प्रत्यक्ष निवडणुकीला उभे न राहण्याचे धोरण होते. यामुळे बाळासाहेब यांचे राजकारण त्याअर्थाने अजिबात मीठ नसल्याप्रमाणे अळणी होते. युतीत सत्ता आली पण एकहाती सत्ता मात्र ते राज्यात आणू शकले नाही.
सुप्रिया सुळे व अजित पवार आहेत यांना शरद पवारांचे, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुखांचे वारसदार म्हणून बघितले जाते. या चौघांपैकी जनमानसात कोण प्रस्थापित होईल हे येणाऱ्या काही महिन्यात स्पष्ट होईल.यातील अजित पवार यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत. तर सुप्रिया सुळे या संधी व वडिलांचे थेट पाठबळ असूनही, आपले नेतृत्व प्रस्थापित करू शकल्या नाही. गेल्या पाच वर्षात त्यांना फार मोठी संधी होती. शरद पवार या वयात जी तडफ दाखवीत आहेत.त्याचा काही अंश जरी घेतला असता तर, सुप्रिया सुळे यांचे महाराष्ट्रात एक स्वतंत्र स्थान असते.सगळं अनुकूल असताना त्यांनी आजतरी चांगली संधी गमावली आहे असे मानायला काही हरकत नाही.

सध्या महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे असे नेते आहेत,ज्यांना वारसाहक्काने रेडीमेड मिळालेल्या शिवसेनेची शक्ती माहिती आहे. त्याचवेळी त्यांना स्वतःच्या नेतृत्वातील दुर्बलता देखील माहिती आहे. त्याचा योग्य संतुलन साधत त्यांनी जे काही करता येईल ते केले आहे. शिवसेना मूलतः आक्रमक असली तरी, त्यांची प्रकृती मवाळ आहे. साहजिकच कितीही आव आणला तरी भाषण आक्रमक होत नाही. पण चिकाटी व संयम हे अंगभूत गुण राजकारणात फारच उपयुक्त आहेत.” Politics is a game of patience ” असे म्हटले जाते. याच गुणांवर त्यांनी भाजपाला साडेचार वर्षे सत्तेत राहून खूप थकवले. राज ठाकरे शिवसेनेत असताना न बोलून संयमाने किती कुरापती केल्या असतील, आपण हे लक्षात घेतले पाहिजे.

लोकसभा निवडणुकीत त्यांनी युती केली, इथपर्यंत शिवसैनिकानी सहन केले होते, पण त्यांनी त्यानंतर भाजपपुढे जें लोटांगण घातले. ते राज ठाकरे यांच्या सभांच्या पार्श्वभूमीवर सगळे शिवसैनिक आणि शिवसेनेचे हितचिंतक सुद्धा नाराज झाले. पण उद्धव ठाकरे लांबच्या शर्यतीचा घोडा आहे. परंतु राजकारणात नेहमी संधी चालून येईलच असे नाही, टायमिंगला सुद्धा तितकेच महत्व असते.उद्धव ठाकरे यांच्या “थंडा करके खाओ ” या नीतीला 23 मेनंतर आव्हान मिळू शकते. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचे यश अधोरेखित झाले, आणि भाजपा सेनेच्या जागा कमी झाल्या, तर गरम शिवसैनिकाला थंडाव्याला थांबवून ठेवणे आव्हानच असेल.

पन्नाशीचे राज ठाकरे आणि तेरा वर्षाची मनसे यांचे समीकरण मांडले तर,येणाऱ्या 23 मेला लागणारे निकालातून राज ठाकरे यांच्या इंजिनला नवीन दिशा मिळेल किंवा इंजिन कारशेडमध्ये दिसेल.महाराष्ट्रात युतीच्या जागा कमी झाल्या तर, त्याचे सारे श्रेय राज यांना मिळणार आहे. त्यानंतर येणारी विधानसभा राज ठाकरे यांच्यासाठी फार महत्वाची आहे.जर यावेळी त्यांची गणित जुळून नाही आली तर मात्र पुन्हा संधी कठीणच आहे.कारण त्यानंतर पुन्हा पाच वर्षांनी येणाऱ्या निवडणुकीत राजकारणाचे संदर्भ बदलेले असतील.

राज ठाकरे यांचा पक्ष आज महाराष्ट्रात नावालाच उरला आहे.सातत्याने त्यांचे निवडून आलेले आमदार-नगरसेवक फोडले जात आहेत. पण काही वर्षांपूर्वी वाशी येथे एका कार्यकर्ता मेळाव्यात पक्षफुटीवर भाष्य करताना ते म्हणाले होते, की एक कार्यकर्ता जरी राहिला तरी मी त्यातून लाख निर्माण करेन. सध्याच्या त्यांच्या सभांना मिळणाऱ्या प्रतिसादातून असे नक्की होऊ शकेल हे जाणवत आहे.

राज ठाकरे यांना आपले शक्तिस्थळ माहित आहे. राजकारणाची उत्तम जाण, उत्कृष्ट वक्तृत्व, पॉलिटिकल टायमिंगमध्ये त्यांचा देशात मोजक्या लोकांत गणना होईल. मग आजही त्यांना यश का नाही मिळाले याचे कारण काय हा प्रश्न उरतोच. याबाबत एका प्रसंगाची आठवण करून द्यावीशी वाटते. राज ठाकरे यांनी मनसे स्थापन केल्यावर, शरद पवार यांनी स्वतःचा स्वतंत्र पक्ष चालविण्यासाटी लवकर उठावे लागते! असा टोमणा मारला होता. एका अर्थाने त्यांना असे म्हणायचं होते की, खूप कष्ट करावे लागतात. पण राज ठाकरे यांनी हा वडीलकीचा सल्ला त्यावेळी गांभीर्याने घेतला नाही. आता त्यांच्या सल्ल्याने वाटचाल सुरु आहे असे त्यांचे विरोधक आरोप करत आहेत. त्यांना सुरुवातीला चांगलं यश मिळाले, पण नंतर ते टिकवून ठेवता आले नाही.त्यासाठी अनेक कारणे असतील पण राज ठाकरे यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे.राज ठाकरे हेसुद्धा एक कलाकार आहेत.कलाकार कोणाचा गुलाम होत नाही.अगदी कोणा व्यक्तीचा वेळेचा आणि वेळापत्रकाचाही नाही.पण यावर सुद्धा मात करता आली असती. त्यांची दुसरी फळी अगदीच सुमार होती. याबाबतीत शिवसेनाप्रमुख मात्र नशीबवान होते. त्यांच्याकडे सक्षम व निष्ठावंत वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, मनोहर जोशी इ. नेते होते. ते फर्डे वक्ते होते. पण राज ठाकरे यांची आजही हीच मोठी समस्या आहे. त्यावर मात केलीच पाहिजे आता तशी संधी सुद्धा येणार आहे.

13 वर्षात राज ठाकरे यांनी मनसेचे नेते आणि कार्यकर्ते यांना टोल नाका आंदोलन, मराठी पाट्या अशा0 काही गोष्टी वगळता,नवीन सकारात्मक उपक्रम देऊन राज्यपातळीवर 365 दिवस गुंतवून ठेवता आले नाही. तसेच सगळ्याच शहरात व गावात कुठल्याच पक्षात जागा नसलेले अनेक टुकार कायम नवीन पक्षाच्या प्रतिक्षेत असतात. अशा अनेक प्रवृतींनी मनसेचा ताबा घेतला.त्यांनी मनसेच्या नावाने दुकानदारी सुरु केली.त्यामध्ये वेळोवेळी दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे राज ठाकरे यांच्या ब्लु प्रिंटनुसार नवनिर्माण करायला आलेले कार्यकर्ते पुन्हा माघारी फिरले. त्यामुळे जे उरलेले आता कुठेच जागा नाही, तर हेच काय वाईट आहे. अशा प्रवृतीना शोधून, त्यांच्या जागा रिकाम्या करणे हे मोठे आव्हान असणार आहे.

सध्याच्या महाराष्ट्राच्या राजकीय पोकळीत, राज ठाकरे यांना स्थान निर्माण करण्याची शेवटची संधी आहे. त्यासाठी आता नवीन कार्यकर्त्यांचे रोप लावून त्याची वाट बघणे, आत्मघातकी ठरेलं. त्यासाठी युती होणार नाही या आशेने अनेक सेना -भाजपच्या मातब्बर नेत्यांनी विधानसभा निवडूणुकीची तयारी केली होती. त्यांची शोध मोहीम घेऊन योग्य त्यांना मनसेने उमेदवार केले पाहिजे.शरद पवार यांनी ज्याप्रमाणे छगन भुजबळ, गणेश नाईक इ.नेते सामावून घेतले, त्यांना टिकवून ठेवले. तशी कला राज ठाकरे यांनी आता अवगत केली पाहिजे. सेना -भाजपने जशी मनसेची फोडाफोडी केली त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे.

महाराष्ट्रात सगळ्याच पक्षात मुख्य पदावर अनेक वर्षे ठराविक नेते जागा अडवून बसले आहेत. त्यामुळे दुसरी फळी संधीच्या अभावी निराश आहेत. त्यांना जाणीवपूर्वक मनसेत आणले पाहिजे. त्यांना कामाची संधी दिली पाहिजे.राज ठाकरे यांनी आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार मांडले पाहिजेत. त्यामुळे बहुजन तरुणांना एक आशावादी नेतृत्व मिळेल.ब. मो.पुरंदरे यांच्या सावलीतून बाहेर पडून, नवीन राज ठाकरे महाराष्ट्रापुढे आले पाहिजेत. मुस्लिम तरुणांनासुद्धा काही विधायक कार्यक्रम मनसेने दिला पाहिजे.सुशिक्षित मुस्लिम युवक मनसे हा योग्य पर्याय ठरू शकतो. फक्त मनसेच्या झेंडयात निळा, हिरवा रंग असून चालणार नाही. त्या वर्गाला योग्य संदेश गेला पाहिजे .एक राज्यव्यापी अधिवेशन घेऊन नव्याने भूमिका मांडली पाहिजे. राज ठाकरे यांनी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून पुन्हा भरारी घेतली पाहिजे, असे आज महाराष्ट्रातील बहुसंख्य लोकांना वाटते आहे. महाराष्ट्राचे हित जपणारा पहिला प्रादेशिक नेता सत्तेत यावा असे शहरी व ग्रामीण जनतेला वाटते आहे.मोदी -शाह यांच्या समोर देशातील सगळेच नेते शेपूट घालून बसले असताना राज ठाकरे यांनी सडेतोड भूमिका घेतली ती प्रत्येक मराठी माणसाला भावून गेली.

राज ठाकरे यांचे राजकीय प्रवासाला सुरेश भट यांच्या काव्यपंक्ती अतिशय समर्पक आहेत.
विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही…
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही.. !!
छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला.
अजून अशी भिंत नाही.

महाराष्ट्र वाट बघतो आहे, एका नवीन दमदार नेतृत्वाची, मराठी हितासाठी सर्वसमावेशक स्वच्छ भूमिका मांडणारा.जरी चूक झाली तर दुरुस्त करणारा. आडपडदा न ठेवता पडदयावर जाहीर पोलखोल करणारा,त्या राज ठाकरे यांची नव्याने
वाट पाहतो आहे.