भारतीय दंड संहितेतील कलम ३७७ रद्द झाल्याने समलैंगिकता हा शिक्षापात्र गुन्हा राहिलेला नसला तरी समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता मिळणे अद्याप बाकी आहे. नजीकच्या भविष्यात अशा विवाहांना कायदेशीर मान्यता मिळाली तरी त्यांना समाजाने खुल्या मनाने स्वीकारणे ही आणखी पुढील कठीण पायरी आहे. या मानसिक, सामाजिक दबावामुळे समलैंगिक व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय, त्यांचे नातेवाईक ह्यांचा कल, वास्तव स्वीकारण्यापेक्षा ते दडवण्याकडे अधिक असतो. बऱ्याचदा सामाजिक दबावाखाली अशा व्यक्तीला विषमलिंगी विवाह करण्यास भाग पाडले जाते. परिणामी तिच्याशी लग्न करणाऱ्या व्यक्तीचे जीवन उध्वस्त होते. या अतिशय संवेदनशील विषयावर तितक्याच संवेदनशील पद्धतीने भाष्य करणारा मल्याळी सिनेमा म्हणजे ‘काथल द कोर’ (Kaathal the Core)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातील एका गावात हे कथानक घडते. मॅथ्यू देवासी (मामूट्टी) आणि ओमाना (ज्योतिका) या मध्यमवयीन जोडप्याभोवती हे कथानक केंद्रित आहे. मॅथ्यू आपल्या बायको आणि वडिलांसहित वडिलोपार्जित घरात राहतोय. त्याची मुलगी हॉस्टेलमध्ये राहून महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. डाव्या पक्षाचा कार्यकर्ता असलेला मॅथ्यू आपल्या राजकीय वरिष्ठांच्या आदेशानुसार ग्रामपंचायतीमधील एका प्रभागासाठी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होताच त्याची पत्नी ओमानाने घटस्फोटासाठी केलेल्या अर्जामुळे मॅथ्यूच्या वरवरून शांत दिसणाऱ्या कौटुंबिक जीवनात आणि नुकत्याच सुरु होत असलेल्या राजकीय जीवनात एक वादळ उभे राहते. “मॅथ्यू हा एक समलैंगिक पुरुष आहे” या कारणास्तव ओमानाने घटस्फोट मागितलेला असतो. त्याव्यतिरिक्त तिची मॅथ्यूबद्दल कुठलीच तक्रार नाही आणि तिला पोटगी देखील नको आहे. पण मॅथ्यू हा समलैंगिक असल्याचा तिच्याकडे कुठलाच पुरावा नाहीये. सुरुवातीला आपल्यावरील हे आरोप नाकारणारा, आपला लैंगिक कल लपविणारा मॅथ्यू आणि आपल्या नवऱ्याची कुठल्याही प्रकारे बदनामी न करता सामंजस्याने केवळ या लग्नाच्या बंधनातून स्वतः मुक्त होऊ इच्छिणारी आणि आपल्या पतीलाही त्याच्या नैसर्गिक कलाप्रमाणे जगण्यास प्रोत्साहन देणारी ओमाना हे या परिस्थितीतून कसा मार्ग काढतात हे कुठल्याही अतिरंजित किंवा अति-स्वप्नवत प्रसंगाचा आधार न घेता या सिनेमात सुंदर रित्या दाखविण्यात आले आहे.

अमिताभ बच्चन यांनी शेअर केला रेखांबरोबरचा ‘तो’ फोटो; म्हणाले, “या फोटोमागे खूप मोठी…”

ग्रामीण पार्श्वभूमी असूनही, सिनेमाच्या लेखक दिग्दर्शकांनी गावातील लोकांना सरसकट भाबडे, निष्पाप किंवा इरसाल वगैरे न दाखविता या सिनेमातील गावात नवीन विचारांचा वारा पोहोचलेला असला तरी काही लोक जुने विचार कवटाळून असणारे तर काही लोक बदल स्वीकारणारे अशी वास्तव मांडणी केलेली आहे. विशेष म्हणजे, कुठल्याही पात्राला काळ्या-पांढऱ्या रंगात न रंगवता आणि आपले मत प्रेक्षकांवर न लादता शक्य तितक्या अस्सल पद्धतीने कथा सांगून त्याचा निष्कर्ष काढण्याचे काम त्यांनी प्रेक्षकांवर सोडले आहे.

“द ग्रेट इंडियन किचन” या आपल्या सिनेमाने संपूर्ण सिने विश्वाला आपली दखल घ्यायला लावणाऱ्या जियो बेबी या दिग्दर्शकाने काथलमधे देखील गोष्ट सांगण्यातील साधेपणा हा आपला यूएसपी कायम राखत प्रभावी काम केले आहे. मामूट्टी आणि ज्योतिका ह्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री लक्षणीय आहे. कडवटपणा टाळून नात्याला पूर्णविराम देण्याचा ठाम निर्धार केलेली ओमाना, परिस्थितीवश विषमलिंगी लग्न करावं लागलेला असहाय मॅथ्यू आणि केवळ आपल्या हट्टामुळे आपल्या मुलाची आणि सुनेची होत असलेली कुचंबणा पाहून मौनात गेलेला मॅथ्यूचा बाप या तिन्ही व्यक्तिरेखा उत्तम झाल्या आहेत. सिनेमाचे संगीत, आर्ट डिरेक्शन, फोटोग्राफी या सर्व तांत्रिक बाबी देखील दर्जेदार आहेत.

मराठीतील सर्व ब्लॉग्स बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sabby parera special article on jyothika movie kaathal the core hrc