राजकीय पक्षांचा भर बाइक रॅलींवर; ‘कमाई’च्या संधीमुळे तरुणांच्या उडय़ा

‘अहो मावशी कमळावर शिक्का मारा’..‘काका हाताचा पंजा विसरू नका’.. अशी आरडाओरड करीत आणि बाइकचे हॉर्न वाजवत भरधाव वेगाने जाणाऱ्या बाईकस्वारांनी मुंबईत सध्या उच्छाद मांडला आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत जाणाऱ्या या बाइकरॅलींना राजकीय पक्षांची मात्र भारी पसंती मिळत असल्याने रॅलीत सहभागी होण्यासाठी बाइकस्वाराला दीड हजार रुपये आणि टाकी भरून पेट्रोल असा मेहनताना मिळत आहे. एकीकडे थाटात बाइक पळवण्याची संधी आणि वर कमाई यामुळे तरुणवर्ग अशा बाइकरॅलींना मोठय़ा संख्येने हजेरी लावत आहे.

निवडणुकांच्या काळात दर वेळी पक्षाकडून बाइकरॅलीचे आयोजन केले जाते. आणि या रॅलीत सहभागी होण्यासाठी मुंबईतील सार्वजनिक मंडळे, महाविद्यालयातील तरुणांना बोलावले जाते. यंदा वाढलेल्या मानधनामुळे तरुणाकडून याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. यंदा बाइकरॅलीत सहभागी होण्यासाठी राजकीय पक्षांकडून १५०० रुपये मानधन दिले जात आहे. यासोबत दुचाकीची पेट्रोल टाकी भरून देण्यात येईल, असेही पक्ष कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येते. काही दिवसांपूर्वी आशीष शेलार यांनी वांद्रे पश्चिम भागात बाइकरॅलीचे आयोजन केले होते. यात ४०० हून अधिक चेंबूर, लालबाग, माहीम या भागातील तरुण बाइकस्वार सहभागी झाले होते. पक्षाकडून १५०० रुपये दिले जात असल्यामुळे ही मुले आपल्या शेजारील आणि महाविद्यालयातील मित्रांनाही घेऊन आली होती. ‘एका दिवसासाठी १५०० रुपये दिले जात असल्यामुळे आज कॉलेजला गेलो नाही. या रॅलीच्या निमित्ताने चांगले पैसे जमा होतील,’ असे चेंबूरस्थित एका विद्यार्थ्यांने सांगितले. उमेदवाराच्या मागे चालत प्रचाराचे दिवसाला  ३०० ते ५०० रुपये मिळतात, त्यापेक्षा बाइकरॅलीत चांगली कमाई होते, अशी पुस्तीही त्या विद्यार्थ्यांने जोडली.

सकाळी १० वाजल्यापासून दाखल झालेली ही मुले सायंकाळी ५ ते ६ वाजेपर्यंत रॅलीसोबत फिरतात. रॅली सुरू झाल्यावर खूप गर्दी असते, मात्र नंतर अनेक तरुण नाव नोंदवून निघून जातात, असे या रॅलीत सहभागी झालेल्या तरुणांनी  सांगितले. वांद्रे पश्चिम या भागातील बाजार मार्गावरील ८ ते १० फूट रस्त्यावरून ही रॅली काढताना या भागातील रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. मात्र हे बाइकस्वार नियमांना तिलांजली देत रस्त्यावरून भरधाव वेगाने चालली होती. रविवारी समाजवादी पक्षाने प्रभादेवी या भागात अशाच बाइकरॅलीचे आयोजन केले होते. या तरुणांनी दुचाकीच्या आवाजाने पादचाऱ्यांच्या नाकी नऊ आणले होते.

भाजपच्या वांद्रेतील बाइकरॅलीत लालबाग येथील व्यायामशाळेतील काही तरुण आले होते. कबड्डीच्या सामन्यांचे आयोजन करण्यासाठी स्थानिक नगरसेवक मोठा निधी देत नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकावर नाराज असलेले हे तरुण भाजपच्या प्रचारसभेत सहभागी झाले. भाजपने कबड्डीच्या सामन्यांचे आयोजकत्व स्वीकारल्याचे वचन दिल्यामुळे बाइकरॅलीत सहभागी झाल्याचे या तरुणाने सांगितले.