दोन्ही मंत्री देशमुखांचा वाद चव्हाटय़ावर; पक्ष निरीक्षकांपुढे संघर्ष

भाजपच्या उमेदवारांची यादी निश्चित करताना पक्षनिरीक्षकासमोर दोन्ही मंत्री व खासदार एकमेकांच्या विरोधात वाद घालत शह-प्रतिशह देतानाचे चित्र समोर आले. त्यामुळे सोलापूर महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्यासाठी आतुर झालेल्या भाजपला पक्षांतर्गत संघर्षांचा अनुभव घ्यावा लागत आहे. पक्षाच्या बैठकीत पालकमंत्री विजय देशमुख यांच्या पुत्राला उमेदवारी देण्यासही विरोध दर्शविण्यात आल्याने या पक्षातील गटबाजी उफाळून आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

पालकमंत्री विजय देशमुख हे पालिका निवडणुकांसाठी भाजपच्या निर्णय प्रक्रियेत आघाडीवर आहेत; परंतु त्याच वेळी पक्षांतर्गत संघर्षही वाढत चालल्याने त्यांची डोकेदुखी वाढली आहे. पालकमंत्री विजय देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख तसेच खासदार शरद बनसोडे यांच्यात मतभेद आहेत. यातच पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी हेदेखील पालकमंत्री देशमुख यांच्यापासून दुरावत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या गोटात गेले आहेत. त्यामुळे पालकमंत्री देशमुख हे शहराध्यक्ष प्रा. निंबर्गी यांना डावलून परस्पर पक्षाच्या बैठका घेत आहेत. त्यातून वाढलेल्या मतभेदाचे दर्शन पक्षनिरीक्षक रघुनाथ कुलकर्णी यांनाही झाले.

गांधी नगरातील एका बडय़ा हॉटेलात मंत्री असलेल्या दोन्ही देशमुखांसह खासदार शरद बनसोडे व पक्ष निरीक्षक रघुनाथ कुलकर्णी यांची बैठक होऊन त्यात पक्षाची उमेदवार यादी निश्चित करण्याबाबत चर्चा झाली. या बैठकीत पक्षाचे शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी यांनी पालकमंत्र्यांच्या विरोधात चर्चेचा सूर लावल्याचे पक्षाच्या गोटातून सांगण्यात आले. विजय देशमुख यांच्या स्वत:च्या सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारासंघातील प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित करताना स्वत: विजय देशमुख यांनी सुचविलेल्या काही उमेदवारांच्या नावांना सुभाष देशमुख व शहराध्यक्ष प्रा. निंबर्गी यांनी विरोध केला. यात विजय देशमुख यांचे चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांच्या नावालाही विरोध झाल्याने देशमुख हे कमालीचे अस्वस्थ झाले होते. त्यांनी बैठक अर्धवट सोडून निघून जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना पक्षनिरीक्षकांनी रोखले व त्यांची समजूत काढल्याचेही पक्षाच्या वर्तुळात सांगितले जाते.

दरम्यान, काँग्रेस व राष्ट्रवादीसह भाजप व शिवसेना या चारही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांची यादी गुरुवारी सायंकाळपर्यंत जाहीर न होता रखडली होती. पक्षांतर्गत बंडखोरी होऊ नये वा उमेदवारांची पळवापळव होऊ नये म्हणून सारेच प्रमुख पक्ष दक्षता घेत असल्याचे दिसून येते.