‘मातोश्री’च्या जवळचे नितीन गडकरीही शिवसेनेवर बरसले

‘भाजपशी युती करून शिवसेना सडली, असे म्हणता, मग शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता का,’ असा सवाल करतानाच गेल्या २० वर्षांच्या सत्ताकाळात पारदर्शी व भ्रष्टाचारमुक्त कारभार केला आहे, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन जनतेसमोर सांगावे, असे खुले आव्हान देत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढविला.

‘मातोश्री’कडून नेहमी कौतुक केले जाणारे नितीन गडकरी शिवसेनेच्या विरोधात कोणती भूमिका घेतात याची उत्सुकता होती. पण गडकरी यांनी पक्षाच्या भूमिकेची री ओढत विलेपार्ले येथे झालेल्या प्रचार सभेत शिवसेनेवर सपाटून टीका केली. भ्रष्टाचारमुक्त व पारदर्शी कारभाराशिवाय मुंबईचे भवितव्य बदलू शकणार नाही, असे सांगून गडकरी म्हणाले की, ही निवडणूक भ्रष्टाचार आणि पारदर्शी कारभाराच्या मुद्दय़ावरच लढवली जात आहे. शिवसेनेचा सर्व कारभार टक्केवारीभोवती घुटमळत राहिला. मुंबईतील नालेसफाई, रस्त्यांची कामे, कचरा आदी कामे केल्याचे फक्त दावे झाले. करोडो रुपये खर्च होऊनही नाल्यांमधील गाळ तसाच राहिला आहे, रस्त्यांवरील खड्डे कमी झालेले नाहीत आणि कचराही क्षेपणभूमीत तसाच राहिला आहे. यातून केवळ नगरसेवक व त्यांच्या नेत्यांना लक्ष्मीदर्शन झाले. वैतरणा प्रकल्पाची किंमतही सुमारे ९०० कोटी रुपयांनी वाढवली गेली आणि त्या धरणातील माती खोदण्याच्या नावाखाली पैसे हडप करण्यात आले, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेच्या कारभारावर हल्ला चढवला.

भाजपशी युती केल्याने सेनेची २५ वर्षे सडली, या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना गडकरी म्हणाले की, युती कधीच प्रेमातून होत नाही. ती दोघांचीही गरज असते.

शिवसेनेला कोण बरोबर घेणार!

भाजपबाबत असूया असल्याने देशातील अन्य राजकीय पक्षांबरोबर तिसरी आघाडी करण्याचे शिवसेनेचे मनसुबे आहेत, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. याचा खरपूस समाचार घेत, देशात शिवसेनेला बरोबर घ्यायला कोण तयार आहे, असा उलट प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला. कोणीही तुम्हाला बरोबर घ्यायला तयार नाही.अखिलेश, मुलायम, ममता बॅनर्जी यांच्यापैकी कोणाबरोबर तुम्ही जाणार, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.

मुख्यमंत्र्यांची पाठराखण

नागपूर महापालिकेच्या कारभारावर  टीका होत आहे, पण नागपूरमधील रस्त्यांवर खड्डे नाहीत. तेथे पाणीपुरवठय़ाचाही प्रश्न नाही. भाजपच्या हाती सत्ता आल्यापासून टक्कवारीच्या राजकारणाला थारा नाही असा टोलाही गडकरी यांनी शिवसेनेला लगावला