मुंबई : पुढील आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत ५ ते ७ टक्के वाढ होईल, असे अनुमान ‘क्रिसिल’ या पतमानांकन संस्थेने वर्तविले आहे. सलग तिसऱ्या आर्थिक वर्षांत प्रवासी वाहनांची विक्री उच्चांकी पातळीवर पोहोचणार असून, त्यात स्पोर्ट्स युटिलिटी अर्थात एसयूव्ही वाहनांचे प्रमाण सर्वाधिक असेल, असेही पतमानांकन संस्थेने म्हटले आहे.

चालू आर्थिक वर्षात मोटारींची देशांतर्गत मागणी आणि निर्यात कमी असतानाही विक्रीतील वाढ ६ ते ८ टक्के राहण्याचा अंदाज आहे. ग्राहकांकडून एसयूव्हीला मागणी मोठ्या प्रमाणात असून, देशांतर्गत विक्रीत या वाहनांचा हिस्सा दुपटीने वाढून ६० टक्क्यांवर पोहोचला आहे. करोना संकटाच्या आधी २०१९ मध्ये तो २८ टक्के होता. पुढील काळात एसयूव्हीच्या मागणीतील वाढ कायम राहणार आहे. अनेक वाहन निर्मात्यांकडून वेगवेगळ्या किंमत श्रेणीतील एसयूव्ही बाजारपेठेत दाखल होत आहेत. त्यामुळे ग्राहकांची त्यांना पसंती मिळत आहे, असे क्रिसिलने म्हटले आहे.

हेही वाचा >>>बायजू रवींद्रन यांच्या हकालपट्टीचा भागधारकांचा कौल; मतदान अवैध असल्याचा कंपनीचा दावा

चालू आर्थिक वर्षात मोटारींच्या विक्रीत घट होत असल्याचे निरीक्षण क्रिसिलने नोंदविले आहे. ग्रामीण बाजारपेठेतून मागणीतील घसरण आणि मोटारींच्या वाढलेल्या किमती यामुळे वाहन विक्रीत घट होत आहे. मागील ३ ते ४ वर्षांत कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने कंपन्यांनी वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. याचबरोबर सुरक्षा व प्रदूषणविषयक नवीन मानकांचे पालन करावे लागत असल्यानेही मोटारींच्या किमती वाढत आहेत, असे क्रिसिलने नमूद केले आहे.

निर्यातीच्या आघाडीवरही अशीच स्थिती आहे. आर्थिक वर्ष २०१९ मधील सुमारे १७ टक्क्यांच्या घसरणीच्या तुलनेत विद्यमान आर्थिक वर्षात प्रवासी वाहनांची निर्यात १४ टक्क्यांपर्यंत घटण्याचा अंदाज आहे. आगामी वर्षात हाच घसरणीचा कल कायम राहू शकेल.

पुढील आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत ५ ते ७ टक्के वाढ अपेक्षित आहे. मात्र, त्यात एसयूव्हीची मागणी दुपटीने वाढून १२ टक्क्यांवर पोहोचेल. हायब्री़ड, इलेक्ट्रिक यांसह विविध तंत्रज्ञान पर्यायांसह नवीन एसयूव्ही सादर होत असल्याने मागणीत वाढ होत आहे.– अनुज सेठी, वरिष्ठ संचालक, क्रिसिल रेटिंग्ज