वृत्तसंस्था, नवी दिल्ली

देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या भावाने गुरुवारी सार्वकालिक उच्चांकी पातळी गाठली. मुंबईच्या झवेरी बाजारातील घाऊक व्यवहारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७० हजार ४७० रुपयांवर पोहोचला. किरकोळ बाजारात त्याने कर आणि अन्य घटकांच्या समावेशासह त्याने ७१ हजारांची पातळी ओलांडली आहे.

अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांच्या व्याजदर कपातीला अनुकूल वक्तव्यामुळे जगभरातील वायदे सौद्यात सोन्याने उसळी घेतल्याचे दिसून आले. जागतिक धातू वायदे मंच ‘कॉमेक्स’वर ४ एप्रिलला पहिल्यांदाच सोन्याचा भाव प्रतिऔंस (अर्थात २८.३५ ग्रॅमसाठी) २,३०० डॉलरवर पोहोचला. चांदीही प्रति औंस २७.०५ डॉलरवर व्यवहार करत होती. मागील सत्रात चांदीचा भाव २६.२५ डॉलरवर बंद झाला होता.

हेही वाचा >>>व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी

वस्तू वायदा बाजार मंच एमसीएक्सने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याचा भाव गुरुवारी बाजार सुरू होताना प्रति १० ग्रॅम ६९ हजार ८६८ रुपये होता. नंतर तो उच्चांकी पातळीवर पोहोचून खाली घसरला. तो ६९ हजार ८०१ या दिवसभरातील नीचांकी पातळीवर आला. सोन्याचे जूनमध्ये संपणारे वायदे ६९ हजार ९०८ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचले, अशी माहिती वस्तू वायदे बाजारमंच एमसीएक्सने दिली.

गेल्या सहा सत्रांत सोन्याच्या भावात घोडदौड कायम आहे. एमसीएक्स आणि कॉमेक्सवर सोन्याने उच्चांकी पातळी गाठली आहे. अमेरिकेतील एडीपीची बिगर कृषी रोजगाराची अपेक्षेपेक्षा चांगली नोंदवली गेलेली आकडेवारी आणि अमेरिकेतील सेवा क्षेत्राची घसरण या बाबी असूनही सोन्याच्या भावातील तेजी कायम राहिली, अशी माहिती कमॉडिटी विश्लेषक भाविक पटेल यांनी दिली.

मुंबईच्या सराफ बाजारात घाऊक व्यवहारात चांदीचा भावही किलोमागे १,००० रुपयांनी वाढून ८२,००० रुपयांपर्यंत पोहोचला. मागील सत्रात तो प्रति किलो ८१,००० रुपयांवर होता.

फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी चालू वर्षात व्याजदरात कपातीचे ठोस संकेत देणारे वक्तव्य केले आहे. यामुळे सोन्याच्या भावात सुरू असलेली तेजी कायम राहण्यास मदत झाली आहे.- भाविक पटेल, कमॉडिटी विश्लेषक, ट्रेडबुल सिक्युरिटीज