मुंबई: भारतातील सोन्याची मागणी सरलेल्या मार्च तिमाहीत वार्षिक तुलनेत आठ टक्क्यांनी वाढून १३६.६ टन नोंदवली गेली, असे जागतिक सुवर्ण परिषदेने मंगळवारी स्पष्ट केले. अर्थात रिझर्व्ह बँकेकडून झालेल्या सोन्याच्या खरेदीचाही मागणीतील वाढीत प्रमुख योगदान राहिले.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सरलेल्या तिमाहीत सोन्याच्या सरासरी किमतीत ११ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे मूल्याच्या दृष्टीने भारतातील सोन्याची मागणी या जानेवारी ते मार्च तिमाही कालावधीत वार्षिक आधारावर २० टक्क्यांनी वाढून ७५,४७० कोटी रुपयांवर गेल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेने अहवालात म्हटले आहे. परिषदेने २०२४ च्या पहिल्या तिमाहीतील जागतिक मागणीचा कल स्पष्ट करणारा अहवाल मंगळवारी प्रसिद्ध केला. ज्यात भारताची एकूण सोन्याची मागणी, दागिने आणि गुंतवणूक या दोन्हींसह, या वर्षीच्या जानेवारी ते मार्चमध्ये १३६.६ टनांवर गेली आहे, जी वर्षापूर्वी याच कालावधीत ती १२६.३ टन अशी होती. यापैकी दागिन्यांची मागणी ९१.९ टनावरून ४ टक्क्यांनी वाढून ९५,५ टन झाली आहे. एकूण गुंतवणुकीची मागणी (वळी, नाण्यांच्या स्वरूपात) ३४.४ टनावरून १९ टक्क्यांनी वाढून ४१.१ टन झाली.

हेही वाचा >>> ‘गूगल’मध्ये पुन्हा नोकरकपातीचे वारे; प्रमुख संघातील कर्मचाऱ्यांना लवकरच नारळ

जागतिक सुवर्ण परिषदेचे भारतातील प्रादेशिक मुख्याधिकारी, सचिन जैन यांच्या मते, मार्चमध्ये किमती ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचल्या असतानाही देशातील मजबूत आर्थिक वातावरण सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीसाठी पोषक होते. मार्च तिमाही संपल्यानंतर विक्रीत मंदी मात्र आल्याचे ते म्हणाले. या वर्षात भारतात सोन्याची मागणी ७०० ते ८०० टन राहण्याची अपेक्षा जैन यांनी व्यक्त केली आहे. २०२३ मध्ये देशातील सोन्याची मागणी ७४७.५ टन होती.

हेही वाचा >>> निफ्टी’ची ऐतिहासिक उच्चांकी झेप, मात्र नफावसुलीने सत्राअंती घसरण! ‘सेन्सेक्स’ही ७५ हजाराला स्पर्श करून माघारी

जोयआलुक्कासची अक्षय्य तृतीयेनिमित्त दागिने खरेदीवर सूट

मुंबईः दागिन्यांच्या विक्रीतील प्रमुख नाममुद्रा असलेल्या जोयआलुक्कासने अक्षय्य तृतीतेयाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष योजना घोषित केल्या आहेत. यामध्ये ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या हिरेजडित मौल्यवान दागिन्यांच्या खरेदीवर २,००० रुपये मूल्याचे गिफ्ट व्हाउचर्स ग्राहकांना दिले जाईल. येत्या ३ ते १२ मे या कालावधीत वैध असलेल्या या योजनेत, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर १,००० रुपये मूल्याचे गिफ्ट व्हाउचर दिले जाईल. अक्षय्य तृतीयेनिमित्त पारंपरिक मोहकता आणि आधुनिक प्रवाह यांचा संगम असणारी दागिन्यांची विस्तृत मोठी श्रेणीही सादर करण्यात आली आहे.

रिलायन्स ज्वेल्सकडून दागिन्यांची ‘विंध्य’ श्रेणी

मुंबई: मुहूर्ताला खरेदीची परंपरा लक्षात घेता, रिलायन्स ज्वेल्स या आधुनिक सराफ पेढीने अक्षय्य तृतीयेनिमित्त दागिन्यांची विशेष श्रेणीचे अनावरण केले आहे. प्रतिष्ठित ‘ज्वेल्स ऑफ इंडिया’ मालिकेतील नववी श्रेणी म्हणून मध्य प्रदेशच्या समृद्ध कलात्मक परंपरेपासून प्रेरीत होऊन ‘विंध्य’ ही दागिन्यांची रचना दाखल करण्यात आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिने रिलायन्स ज्वेल्सच्या वाराणसी येथील दालनांत या विशेष श्रेणीचे नुकतेच अनावरण केले. विंध्य श्रेणीत बारीक कलाकुसर असलेले कंठहार ते अतिसुंदर बांगड्यांपर्यंत सोने व हिरेजडित आभूषणांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India s gold demand rises 8 percent in jan march despite increase in prices print eco news zws