पीटीआय, नवी दिल्ली

देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादन वाढीचे प्रतिबिंब मानल्या  जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या फेब्रुवारीमध्ये ५.७ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीतून स्पष्ट झाले. हा देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जातो. खाण क्षेत्राच्या जोमदार कामगिरीमुळे औद्योगिक उत्पादन निर्देशांक चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) जाहीर केलेल्या आकडेवारीवरून, सरलेल्या फेब्रुवारीमध्ये खाण उत्पादनात ८ टक्क्यांची दमदार वाढ झाली. गेल्यावर्षी याच महिन्यात या क्षेत्रात वाढीचा दर ४.८ टक्के होता. निर्मिती क्षेत्रातून उत्पादनवाढ ५ टक्के राहिली, जी आधीच्या वर्षीच्या याच महिन्यातील ५.९ टक्क्यांवरून घसरली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्यात ८.२ टक्के वाढीवरून फेब्रुवारीमध्ये वीजनिर्मिती क्षेत्राचा वाढीचा दरही ७.५ टक्क्यांवर घसरला आहे. तसेच भांडवली वस्तूंच्या विभागातील वाढ फेब्रुवारी २०२४ मध्ये १.२ टक्क्यांपर्यंत घसरली आहे, जी वर्षापूर्वी याच कालावधीत ११ टक्क्यांवर होती. या वर्षीच्या फेब्रुवारीमध्ये प्राथमिक वस्तूंच्या उत्पादनात ५.९ टक्के वाढ झाली आहे, मात्र मागील वर्षीच्या ७ टक्क्यांच्या तुलनेत तीही घसरली आहे.

हेही वाचा >>>टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ

वर्ष २०२३-२४ च्या एप्रिल-फेब्रुवारी कालावधीत, औद्योगिक उत्पादन निर्देशांकातील वाढ ५.९ टक्क्यांवर पोहोचली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत नोंदवल्या गेलेल्या ५.६ टक्क्यांहून अधिक राहिली आहे. निर्देशांकाने या आधी ऑक्टोबर २०२३ मध्ये ११.९ टक्क्यांची उच्चांकी पातळी नोंदवली होती, त्यांनतर पुढे नोव्हेंबर २०२३ मध्ये २.५ टक्के, डिसेंबरमध्ये ४.२ टक्के आणि जानेवारी २०२४ मध्ये ४.१ टक्क्यांपर्यंत त्यात घसरण दिसून आली.